नशीब भाग - ५४

फुजी फिल्म कंपनीचा डिएस ५०५ अंकित प्रतिमा ग्राहक - प्रग्रा (कॅमेरा) - विषयी फुजी जपानचा शोध - नियोजन अभियंता माहिती सांगत होता. निकॉन कंपनीने फुजी करता हा प्रग्रा तयार केला होता. त्यात वापरलेला CCD प्रतिमा घटक (इमेज सेन्सर) हजार बाराशे मधून एक हाती येत होता. अजून उत्पादन प्रक्रिया विकसीत झालेली नव्हती (१९९४). १३ लाख चित्रपेशीचा (१. ३ मेगा पिक्सेल) तो प्रतिमा घटक होता. चित्र फीत तुलनेत संवेदन क्षमता ASA 800/3200. वजन 1.65 kg (DS-505A) (भिंग नसताना). मेमरी कार्ड रिडर CR-500. मेमरी कार्ड HG-15 (15 MB) 5 चित्रे क्षमता. मी दोन मेमरी कार्ड विकत घेतली होती. तर कार्ड रिडर मध्ये मेमरी कार्ड टाकून त्यातील साठवलेल्या प्रतिमा संगणकावर घेऊन फोटोशॉप चौथी आवृत्तीने संपादन व संयोजन करून पिक्टोग्राफी ३००० मुद्रण यंत्राने ए५, व ए४ अश्या मापाची छापील प्रतिमा तयार होत असे. संगणकातून तयार झालेली प्रतिमा माहिती पिक्टोग्राफीच्या विशेष लेसर लिखाण व्यवस्थेने डोनर कागदावर लिहिली जात असे. डोनर कागद निवड केलेल्या मापात कापला जात असे त्याच घटकेला रिसीव्हर कागद तेवढ्याच मापात कापला जाऊन त्यावर वाफेचा फवारा होत असताना डोनर कागद त्यावर घट्ट दाबून बसवला जात असे. पुढे हे जोडलेले कागद १२० अंशाने गरम केलेल्या कापडी रुळावरून जाताना अदृश्य प्रतिमा दृश्य होत असे त्यालाच इमेज फिक्सिंग म्हटले जाते. त्यानंतर उपकरणाच्या आत डोनर व रिसीव्हर कागद वेगळे केले जातात व छापील प्रतिमा बाहेर येते हे सगळे दोन मिनिटात घडते. अशा तयार झालेल्या प्रतिमेवर पाण्याचा किंवा प्रकाशाचा कोणताही परिणाम होत नाही. त्या छपाई प्रक्रियेत कोणते ही रसायन, शाई, रंगाचा वापर न करता फक्त १लीटर डिस्टिलड पाणी तीन दिवसाकरता वापरले जात होते. ज्याचा उपयोग डोनर - रिसीव्हर कागद काही वेळा करता घट्ट धरून ठेवण्या करता केला जात होता. त्या काळात त्या छपाई यंत्राला प्रदूषण रहित सर्वोत्कृष्ट साधन म्हणून मान्यता मिळाली होती.

फुजीक्स - निकॉन डिएस ५०५ प्रतिमा ग्राहक भिंगा शिवाय. फुजी पिक्टोग्राफी ३००० छपाई यंत्र.
(सर्व चित्रे मोठ्या आकारमानात क्रमाने पाहण्यासाठी कोठल्याही चित्रावर टिचकी मारून सरकचित्रदर्शन सुरू करावे. )

त्या आमच्या पहिल्या भेटीला फुजी विक्रेत्याने इतर होतकरू ग्राहकांना आमंत्रण दिले होते. संरक्षण खात्यातील एकाने तो नवीन अंकित प्रग्रा विमानातून छाया चित्र घेण्या करता वापरता येईल का म्हणून विचारले होते. विक्रेत्याने होकार व आश्वासन देण्याचा प्रयत्न केला. जपानी शोध - नियोजन अभियंता मिष्किल हसत होता. खरे तर त्याने ते शक्य का नाही हे समजवून सांगायला हवे होते पण त्याने मौन पाळले. मला राहवले नाही, मी लगेच ते शक्य नसल्याचे पटवून दिले. १. ३ मेगा पिक्सेलच्या प्रतिमा घटकावर विमानातून खालची २ मीटरची वस्तू एका पिक्सेल एवढी असणार, प्रतिमा म्हणून काहीच दिसणार नाही. एक सूक्ष्म चौकोन दिसणार. आधुनिक स्कॅनिंग पद्धतीने विमानातून व उपग्रहाने पृथ्वीचे छायाचित्रण केले जाते व त्याचे संगणकाने छायाचित्र तयार केले जाते. असो.

उद्धवा अजब तुझे... योग कसे जुळून आले होते बघा. स्टुडिओच्या परवान्याची तसेच माझ्या व बायकोच्या कामाच्या परवान्याची कागदपत्रे काही विरोधकांनी पाच महिन्या करता परवाना मुख्यालयातून गायब केली होती. एकदाचे परवाने हातात आले, आम्ही सात महिन्यानंतर स्टिडिओचे उद्घाटन केले व कायदेशीर काम सुरू केले. मधल्या काळात इतरांनी आमची साधने बघण्याच्या उद्देशाने भेटी दिल्या, आम्ही तयार केलेल्या जाहिरातीचे शब्द जसेच्या तसे वापरून व डायसब्लिमेशन छपाई यंत्राने आमच्या आधी अंकित स्टुडिओ सुरू करण्याचे प्रयत्न केले, पण यशस्वी झाले नाहीत.                      

मी हा स्टुडिओ सुरू होण्या अगोदर छाया - चल चित्रणाची जी साधने वापरत होतो ती साधने स्टुडिओ मालकाला कमी किमतीत विकू शकलो. त्यामुळे अंकित स्टुडिओ जरी सुरू झाला नव्हता तरीही आमची कमाई सुरू ठेवू शकलो होतो. स्टुडिओत १९९५ ते १९९९ सकाळी ८ ते रात्री ११ मी काम करत असे. एक ही दिवस स्टुडिओ बंद न करता सतत काम केले. बऱ्याचदा दुपारी तिथेच थोडा वेळ झोप घेत असे. दुपारचे जेवण बायको घेऊन येत असे मुलांना शाळेत नेणे आणणे ति करत असे. तिच्या चल - छाया चित्रणाचे काम संध्याकाळी सात नंतर सुरू होत असे ते रात्री १ ते २ पर्यंत चालत असे. स्टुडिओत मुलांना बसवून मी तिला कामाच्या जागी सोडत असे मग काम संपले की ति फोन करून तिला घरी नेण्या करता बोलवत असे.          

स्टुडिओतील प्रकाश योजनेचा एक वेगळा प्रयोग मी केला होता. ओसराम कंपनीचे मेटल हलाईड दिवे वापरून स्टुडिओची प्रकाश योजना मी तयार केली होती. परंतु सहा महिने प्रयत्न करून देखील आठ दिव्यांचे एक सारखे प्रकाश रंग न मिळाल्याने ति योजना बंद करून क्षणिक प्रकाश व्यवस्था विकत घेतली. छाया चित्रातील रंग व मूळ रंग छटा साम्य टिकवण्या करता प्रकाश रंगाचा एक सारखेपणा अत्यंत आवश्यक असतो. स्टुडिओ असल्याने मोठी महत्त्वाची कामे मिळणे सहज शक्य झाले होते. अग्निशामक प्रशिक्षण केंद्राचे चल - छाया चित्रणाचे काम मी केले. तेल विहिरीवरील रिग जुळवणीतील सुरुक्षा चित्र फितीचे काम एका पुणेकराने मिळवून दिले होते. ओमान एअरचे १९९७ चे कॅलेंडर चे छाया चित्रण काम मी केले. विमान धावपट्टी वर जाऊन उड्डाण व जमिनी वर येण्याचे चित्रण झाल्या वर गैरसमजुतीमुळे पोलिस मला तुरुंगात टाकायला निघाले होते. संबंधीत अधिकाऱ्याने योग्य विभागाला सूचना देण्यात उशीर केल्याने तसे घडले होते.

एका मोठ्या घरची काळी वर्तुळाकार बया स्टुडिओत तिच्या मदतनीस बाईबरोबर चांगला चेहरा करण्याकरता आली तीन तास प्रयत्न करून देखील तीच्या पसंतीचा चेहरा न झाल्याने ति माझ्या वर चिडली. माझ्या स्पॉनसरचा फोन क्रमांक मलाच विचारून माझी अरबीतून तक्रार सुरू केली. पैसे न देता उठून निघून गेली. काही वेळा नंतर तिची मदतनीस बाई पैसे घेऊन आली सगळे पैसे दिले व छाया चित्रे घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी स्पॉनसर मला भेटला, त्याने चक्क तिलाच धमकी दिली होती की पैसे दिले नाहीस तर तिचे फोटो बाहेर काचेवर लावले जातील वगैरे. नंतर एका इंग्रज बयेला अपमान करून घेण्यात मजा वाटली. मी सकाळी मुद्दाम माझ्या जबली (सलाला भागात राहणार) गायक मित्राच्या कामा करता लवकर स्टिडिओत आलो होतो तो शेजारी बसला होता आणि वर्तमान पत्रातील त्याची मुलाखत दाखवत होता. ती इंग्रजी बया आत आली. तिच्या समोर एक भारतीय गळ्यात पट्टा न बांधता खुर्चीवर बसलेला तिला खटकले होते. "तुझा स्टुडिओ प्रमुख कुठे आहे त्याला बोलाव. तुला एका लेडीशी कसे वागायचे माहीत नाही". मी मुद्दाम खुर्ची वरून न उठता तिला विचारले तिला काय हवे होते. तिला ओळखपत्रात लागणारे छाया चित्र काढून हवे होते. "मी इथला मालक आहे आणि तुझ्या सारख्या उद्धट बायकांचे छाया चित्र काढत नाही. कृपया बाहेर जा". ती शिव्या पुटपुटत बाहेर निघून गेली. ह्या इंग्रजांना नसलेल्या लाजलज्जेचा अति गर्व असतो. असेच एक आयरिश बाईचे झाले.

तिचा नवरा आयरिश मंडळामुळे मला ओळखत होता. स्टुडिओत लहान मुलांना व बायकोला छायाचित्राकरता घेऊन आला होता. मुलांची चित्र त्यांना आवडली होती. दुसऱ्या दिवशी फोटोशॉपने त्या चित्रात तिला बदल करून हवे होते. ते बदल केल्यावर तिने वाद घायला सुरुवात केली. मी सरळ सांगितले "तुझा नवरा आणि मी बघून घेऊ, मला बायकांशी वाद घालणे आवडत नाही". ति बया बिथरली "यू मेल शुव्हनिस्ट पिग" "मॅम, पिग खाणारे असेच बोलू शकतो, ह्या पेक्षा चांगले शब्द तोंडात येणार नाहीत ही खात्री होती". " मी उद्यापासून बाहेर उभेराहून तुझ्या दुकानात कोणाला येऊ देणार नाही" तिने धमकी देण्याचा प्रयत्न केला. "जरुर, मी माझी प्रसिद्धी करण्या करता सकाळी नाश्ता व इंग्रजी चहा जरुर देईन". दोन दिवसा नंतर तिचा नवरा आला, त्याच्या बायकोला छान सुनावल्या बद्दल धन्यवाद व चित्रांचे पूर्ण पैसे देऊन गेला.

त्या काळात एका नवीन प्रयोगाला मी सुरुवात करून दिली संरक्षण खात्याच्या एमारतीच्या जमिनीच्या मोजमापाचे, प्रगती पटाप्रमाणे रोज होणाऱ्या कामाचे थोडे चलचित्रण मी सुरू केले होते. हे  काम  पण  एका  पुणेकराने  दिले  होते. इमारतीचा कंत्राटदार गुजराथी होता त्याने मला बदलून ते काम एका गुजराथी माणसाला दिले पण नंतर तीन मोठ्या इमारतीची पूर्ण प्रगती चित्र फीत मी बनवून दिली होती. त्यानंतर एबीबी कंपनीच्या २५० मेगा वॉट जनरेटरला जोडलेल्या सुपर चार्जर उपकरणाच्या दुरुस्तीची प्रशिक्षण चित्र फीत मी तयार केली.   - क्रमश: