नशीब माझे - - भाग - ६

कन्याशाळे करता ४ फूट उंच ३ फूट रुंद दीड फूट खोल असा कनसोलचे सुतारकाम मी एकट्याने पूर्ण केले. सगळ्या उपकरणांची जोडणी पूर्ण झाली. कनसोल सुरू झाला. माझे कौतुक झाले पण माइकच आवाज पातळीचा दोष हळूहळू वाढू लागला. माइक केबल ५ फुटापेक्षा जास्त लांबीची वापरल्यास आवाज वाढताना शिट्ट्या वाजायच्या. ह्या दोषावर उपाय शोधण्याचे खूप प्रयत्न केले. टिका करणारेच आनंदाने पुढे धावले. पण कंत्राट ठरल्या प्रमाणे शाळेने कंसोल बनवण्याचे माझे पैसे दिले.

काही वर्षांनी त्या दोषाचा उपाय मला सापडला. कमी रोधकाचे ( लो ईंपीडन्स ) माइक, एक्स. एल. आर. पद्धतीची माइक केबल आणि ईंपीडन्स मॅचिंग ट्रान्सफॉरमर वापरल्यास हा दोष काढता येतो, ही माहिती १९६७ ला मला मिळाली नाही - - नशीब माझे.

१९६८ ला मी रेडिओ दुरुस्तीचे दुकान सुरू केले. मोठ्या भावाने त्या काळात ५०० रुपयाची मदत केली. पाण्याचे पाइप कापून ४ पाय‍र्‍यांच्या ५ शिड्या वेल्ड करून आणल्या, त्यात दीड इंच जाड ८ फूट लांबीच्या लाकडी फळ्या टाकल्या. रेडिओ व इतर सामान ठेवण्याचे रॅक तयार केले. त्याच पद्धतीने बसण्याची जागा, कामाचे टेबल वगैरे छान जुळवाजुळव केली. रोज एक दोन रेडिओ येत असत पण कमाई करण्याच्या धंद्यात मी अजून मुरलो नव्हतो. त्यात मला आठवत नसलेले, काका  / काकू कंपनी दुकानाचा पत्ता शोधीत यायचे, मी त्यांच्या खांद्यावर कसा खेळलो होतो हे वर्णन करण्याचा विफल प्रयत्न करीत असत. कारण, मी कमी पैशात त्यांचा जळलेला रेडिओ दुरुस्त करून द्यावा. असल्याच एका काकाने पैसे देण्याचे चक्क नाकारले, म्हणे त्यांनी मला खांद्यावर बसवून दर सुट्टीला मला गोळ्या बिस्किटे खायला घातली होती. मी "काका मी आता खांद्यावर बसायला तयार आहे. पण तुमच्या पायात दम नाही आणि खिशात पैसा नाही." जे कधी घडले नाही ते सांगण्याचा उद्देश मला समजला आहे. जेव्हां पैसे घेऊन याल तेव्हाच रेडिओ दुरुस्त होईल.

एके दिवशी शेजारी राहणारा इसम रेडिओ घेऊन आला, म्हणतो "सकाळ पासून चालू होता, थोड्या वेळापूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण सुरू झाला नाही, जरा बघता का ?" मी सवयी नुसार सांगितले सेवा शुल्क द्यावे लागेल. तो "हो, हो जरूर !" मी रेडिओ लगेच उघडला, स्विच दुरुस्त करून रेडिओ सुरू केला, "सर १५ रुपये
झाले". तो कडाडला " दोन मिनिटाच्या कामाचे १५ रुपये ?". मी "माझे सेवा शुल्क द्यावे लागेल, नाही तर रेडिओ बंद स्थितीत घेऊन जा" बाकी शेजारी मध्यस्थी करायला पुढे सरसावले. मी नमत घेऊन विचारले तुम्ही किती देणार ? त्याने ३ रुपये भिरकावले. मी जोडलेल्या वायर काढून टाकल्या बंद अवस्थेत रेडिओ परत केला, माझ्या खिशातून दोन रुपयाचे नाणे काढून त्याचा हातात ३ + २ असे ५ रुपये ठेवले आणि त्या जमलेल्या गर्दीला ओरडून सांगितले "मी दारात आलेल्या भिकार्‍याला ५ रुपये देतो. पुन्हा माझ्या दारात भीक मागायची नाही." त्या वेड्याने ते ५ रुपये घेतले नाही, पण शिव्या घालितं रेडिओ घेऊन गेला.

दोन महिन्यानंतर माझ्या एका मित्राला घेऊन तो शेजारी व त्याची बायको माझ्या दुकानात आले. त्याच्या बायकोने बोलायला सुरुवात केली "माफ करा, त्या रेडिओला आम्ही विक्रेत्याकडून दीड महिन्यानंतर दुरुस्त करून आजच आणले, ४५० रुपये द्यावे लागले . . . " मी माझ्याच डोक्यात मारून घेतले - - नशीब माझे - -
भेटूया - - भाग - ७       डी. टी. आर. स्किल्स डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम ला जरूर भेट द्या. मी ध्वनी मुद्रित केलेली गोड भजने ऐकायला मिळतील,