नशीब माझे - भाग - १२

सकाळी जरा उशीराने माझ्या तोंडावर गार पाण्याचे थेंब पडल्याने मला जाग आली. नंतर कळले ते थेंब मुद्दाम उडवले होते. मित्राची बायको त्या चिमुरडीला उचलण्या करता खाली वाकली होती. समोर दिसणारा नजारा आगळा वेगळा आनंद देऊन गेला. पण मी सावध होतो. तिने गोड लडिवाळ हसत मला विचारले " चहा, कॉफी का . . ? अशाच थाटात होते. मी - "जे द्याल ते आनंदाने घेईन. तुम्ही काय चांगले बनवता ?"  ति - "अहो मी तुम्हाला आवड विचारली !"  मी - "गरम काय आहे ते बघायचे व खिशात पैसे असतील तर घ्यायचे हीच आवड उरली आहे"  ति - "तुम्ही फारच अरसिक आहात".

आता तिला मी काय सांगणार, ८ पलंगी वातावरणाची रोजची सकाळ आणि ही सकाळ ह्यांच्या तुलनेत मी अडकलो होतो. माझा कलाकार मित्र कामा निमित्त बाहेर गेला होता दुपारच्या जेवणा पर्यंत परतणार होता. मी वर्तमान पत्र चाळत असताना तिने ही कॉफी म्हणत माझे लक्ष वेधले, समोरचा नजारा थोडा जास्तच आकर्षक होता. तिने खाली वाकून कप माझ्या हातात दिला. स्वतः:चा कप उचलून पाय दुमडीत समोरच्या सोफ्यावर बसली. मी कॉफीचे कौतुक केले. ती - "चांगली फक्त कॉफीच, तुम्ही पुरुष इतके कंजूष आहात ना !" मी - "गैरसमजूत होणार नसेल तर सकाळचा नजारा व आता जो बघतो आहे तो फारच गोड लोभस होता व आहे." ती फार छान लाजली व गोड खळखळून हसली. तेव्हा ते हास्य मला निरागस वाटले.

तिला उत्सुकता होती म्हणून मी माझे आजवरचे मुलींच्या बाबतीतले माझे अनुभव सांगितले. त्या दोघांचे कसे जमले असेल हे समजण्याची उत्सुकता मला होतीच. त्या भेटी ते प्रसंग सांगताना ति चक्क लाजत मुरडत नखरे करत जुन्या आठवणी सांगण्यात मग्न होती. आजी - माजी विद्यार्थी मेळाव्यात त्यांची भेट झाली होती. त्या काळच्या स्कर्ट फॅशनचा गैर फायदा घेऊन ह्या मित्राने तिच्यावर दबाव आणला होता. कलाकार मित्र पदवीधर होता त्यामुळे चांगली नोकरी होती. हिला त्या घटकेला सगळे आकर्षक वाटले. शरीर संबंध वाढत गेले. परिणाम व्हायचा तो झाला. तडजोड म्हणून दोघांच्या आप्तांनी लग्नाला मंजुरी दिली. त्यांचे गांव नोकरी सोडून त्यांना लहान मुलीला घेऊन ह्या नवीन जागेत यावे लागले, वगैरे ती सांगत होती. तेवढ्यात तिची मुलगी रडत उठली. आम्ही भूतकाळातून वर्तमानात आलो.  

संध्याकाळी त्याचे अजून काही मित्र गोळा झाले छान मैफिल जमली. रात्री उशीर झाल्याने त्या मैफिलीतील एका वयस्काला सोबत म्हणून मित्र सोडायला गेला. मी त्या एक वर्षाच्या मुलीला सोफ्यावर झोपवले. त्या पोरीने माझे बोट घट्ट धरून ठेवले होते. अजून मित्र परतला नव्हता. कसेबसे सांभाळत त्या चिमुरडीला घेऊन मी गादीवर आडवा झालो. तिची आई पार्टिशनाच्या मागे जाऊन नवर्‍याची वाट बघत थांबली होती. खूप उशिरा बाहेरचे दार वाजले, तिने सावकाश दार उघडले. त्या शांत स्वच्छ वातावरणात मी दारूंचा वास लगेच ओळखला.  थोड्याच वेळात दबल्या आवाजातल्या तिच्या वेदना व त्याची जबरदस्ती बाहेर समजण्या इतपत वाढली. पण नंतर सारे काही शांत झाले. त्याचे मोठ्या आवाजात घोरणे सुरू झाले. ति तोंडात रुमाल घालून बराच वेळ हुंदके देत बाल्कनीत उभी होती. मी लहानपणाचा मार अजून विसरलो नव्हतो. त्या नवरा बायकोच्या भांडणात मी नाक खुपसणे योग्य वाटले नाही.

झोपेने केव्हा घेरले कळले नाही. सकाळी ऊन तोंडावर आल्याने जाग आली. बाहेर मी जागा झाल्याची चाहूल तिला लागली. मित्र कामानिमित्त बाहेर गेला होता. कसेबसे हास्य तोंडावर आणीत तिने गरम कॉफी करते म्हणून सांगितले. मी वर्तमानपत्र चाळत बसलो होतो. कॉफीचा एक कप माझ्या हातात देत तिचा कप घेऊन ति समोर सोफ्यात बसली, नजारा केविलवाणा होता. तिला खूप काही सांगायचे होते, मला पण समजून घ्यायचे होते. माझा प्रश्न होता मीच का ? शेवटी काय - - नशीब माझे - भेटू भाग १३