नशीब हे शिकलो - भाग ३५

मी शाळेत शिकत असताना मोठ्या भावाचे कपडे माझ्या मापाचे करण्याच्या प्रयत्नात शिवण काम, कापड बेतण्याचे काम व नंतर त्यातून कपड्याची नवीन पद्धत ( फॅशन ) कशी घडवता येईल, हे थोडे आईने, थोडे शिंप्याने तर थोडे पुस्तकातून शिकलो. पुढे पूर्ण सूट व सगळ्या प्रकारचे कपडे शिवण्याचा व्यवसाय पण केला. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या दुरुस्तीचा व्यवसाय पण केला. प्रत्येक व्यवसायातील कलाप्रकार मी आत्मसात केला, बर्‍याच गोष्टी सहज शिकता आल्या व त्यात कौशल्य मिळवता आले. चित्रग्रहणाचा (फोटोग्राफी) अनुभव कृष्ण-धवल चित्राच्या रासायनिक छपाईच्या कामात मदतनिसाचे काम करून मिळवला होता.

१९७७ला इराणला गेल्या पासून शैक्षणिक प्रमाणपत्र मिळवणे सोपे झाले. विदेशी प्रशिक्षण पोस्टाने मिळणे शक्य झाले. मूळ कारण खिशात पैसा आला होता. अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनीयाचे आय.सि.एस. चे इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे ६ वर्षाचे प्रशिक्षण मी १८ महिन्यात पूर्ण केले. कारण जो अभ्यासक्रम होता त्याच्या पेक्षा जास्त पुढचे काम मी रोज करत होतो. त्यांच्या संशयाला उत्तर देताना तसे मी पुरावे दिले होते. दर महिन्याला ५ पुस्तिका येत असत त्यातील ८० ते १०० प्रश्नांची उत्तरे मी दोन दिवसात पाठवीत होतो. त्यामुळे व्यवस्थापक संशयित झाले होते. माझ्या कामाच्या प्रतिमांचा एक संच मी त्यांना पाठवला होता. १९७९ ला इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे प्रमाणपत्र मिळवले. त्याच काळात एका प्रसंगाने चित्रग्रहणाचे (फोटोग्राफी) वेड लागले.    

एकदा कंपनीच्या एका सहकार्‍याने चहा फराळाला माझ्याच बरोबर काही सहकार्‍यांना पण बोलावले होते. त्याने चित्रग्रहणाचा (फोटोग्राफी) विषय सुरू करून नवीन खरेदी केलेला एक महागडा प्रतिमा ग्राहक (कॅमेरा) दाखवायला कपाटातून बाहेर काढला. बाकी सहकारी चकीत होऊन नुसते बघत होते. मी मात्र पुढे होऊन तो प्रग्र हाताळण्याची परवानगी मागितली. त्याने माफी मागून मला न देता कपाटात ठेवून दिला. " आता तुझ्या जवळ पैसे येतील मग तू विकत घेऊ शकतोस." मी खरोखरच मनावर घेतले.

१९७८ ला पहिला शिनॉन प्रतिमा ग्राहक (कॅमेरा) १२६०० रुपयात तेहरानला घेतला होता. तेहरान ते खोराम्दार्रेह ३०० की.मी. अंतरात ३ चित्र रिळे संपवली होती. गावातल्या स्टुडिओवाल्याशी त्यामुळे फार चांगली ओळख झाली होती. माझी काही चित्रे मोठी करून त्याने दुकानात काचेच्या मागे लावली होती. दोन प्रसिद्ध मासिकांचा सभासद झालो. आय.सी.एस. युके चित्रपत्रकारीतेचे प्रशिक्षण पोस्टा द्वारे सुरू केले, एक प्रमाणपत्र असावे म्हणून. शिनॉनचा प्रग्र (कॅमेरा) व माझे ध्वनिमुद्रण उपकरण भारतात एका संस्थेला भेट म्हणून दिले. मग ओळीने कॅननचे ए.एल. - एव्ही - एटी असे प्रग्र (कॅमेरा) घेतले, प्रत्येक प्रग्र चे वैशिष्ट्य त्याच्या, मर्यादा, हाताळणे शिकलो व मग ते विकले.

एका प्रतिमा चित्राला आवश्यक असणारा प्रत्येक मुद्दा लक्षात यावा म्हणून प्रयोग सुरू केले, ते समजल्यावर प्रग्र ची बनावट पद्धत, बनावटीचे धातू त्याचे परिणाम ह्याचा अभ्यास सुरू केला. मग भिंग, झरोका, पडदा, क्षप्र ह्या प्रत्येकाची सर्व प्रकारची माहिती परस्पर संबंध व त्याचे प्रयोग हा अभ्यास सुरू केला. बायकोने व नातेवाईकांनी मला ह्या बाबतीत वेडा म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली होती. एकदा आव्हान स्वीकारले, मग शक्यतेच्या शक्य होईल तेवढ्या मर्यादा वाढवल्या, ध्येय एकच प्रतिमा चित्रकारितेचा काढा करून रोज पिणे व त्या धुंतीत आनंद मिळवणे. म्हणूनच कॅनन ए१चा पूर्ण संच हॉन्गकॉन्गला घेऊ शकलो. पण इराणला परिस्थितीचा होणारा बदल जाणून किंमत चांगली मिळताच पूर्ण संच विकून टाकला. पेन्टॅक्सचा एक छोटा संच विकत घेऊन भारतांत परतलो. त्या काळात सुमारे ७०० चित्र रिळे छपाई सुलभ ( निगेटिव्ह्ज ) व ३०० पारदर्शीत रिळे ( ट्रान्स्पेरन्सीज ) चा साठा जमला होता, अजूनही  बाळगून आहे. 

[ भिंग (लेन्स), झरोका (ऍपरचर), पडदा (शटर), क्षप्र (फ्लॅश) प्रग्र (प्रतिमा ग्राहक) ]

मी कधीच कोणत्याच स्पर्धेत नाव दिले नाही, देत नाही, देणार नाही. फार लहान होतो तेव्हा पासून वडिलांचा, मोठ्या भावाचा, बहिणीचा ( तिघे व्यवसायी कलाकार होते ) वेगवेगळ्या विषयातील स्पर्धेतून झालेला अपमान की अवमान मला नाण्याची दुसरी बाजूच दाखवते व दिसते. ते स्पर्धेचे नियम, ते प्रमुख पाहुणे, ते परीक्षक, ते बक्षीस . . . सगळे घोळकर जय हो. वाचकहो हे झाले माझे अनुभव, निश्चित तुमचे ह्या पेक्षा वेगळे असणार, असावेत.

कॅनन / सिअरस चा ८ मी.मी. चलचित्र ग्राहक ( मूव्ही कॅमेरा ) विकत घेतला. प्रत्येक लहानसहान भागाची माहिती मिळवली, एकमेकांशी असलेले संबंध समजून घेतले मग चलचित्र पद्धतीचा वापर व त्याचे प्रयोग सुरू केले. हा चलचित्र ग्राहक सिडनीला गेलो असताना विकून टाकला, कारण व्हिडिओ ग्रहण पद्धतीच्या आगमनाची चाहूल ओळखली. सिडनी वास्तव्याची फसवी आमिषे बघून  मी फसलो होतो. स्वत:ला सावरताना १९८३ उजाडले. पाहू या मस्कत ओमानला काय मिळवू शकेन ? नशीब हे शिकलो - भाग ३६