नशीब त्यांचे - भाग २३

१९७७ चा तो काळ, तुम्हाला बातमी आठवत असेल तर कळेल. आबादान शहरातील सिनेमा रेक्सचे दरवाजे बंद करून ४५० लोकांना कसे जिवंत जाळले ही बातमी पण वाचली असेल. कोणी, कसे, का हे सगळे वादग्रस्त मुद्दे आहेत. त्यामुळे एन्कौंटर, धरपकड, नोकरीतील बढती मिळवण्याचा खटाटोप ह्यात पोलिस व गुप्तचर विभागाने खूप मनलावून (?) काम करण्याचे ठरवले होते. आम्ही दोघे त्यात अडकलो होतो. आमच्या विरोधकांनीच त्या गुप्तचर विभागाला आमचे नाव कळवले होते. ही माहिती पर्सनल विभाग प्रमुखाने आम्हाला दिली.

योगायोग बघा जिल्हा पोलिस कार्यालयात तो गुप्तचर अधिकारी आम्हाला पुन्हा भेटला. पुढील दोन महिन्यात सगळे परवाने आम्हाला मिळाले. भारतीय दूतावासाचे परवाने अजून मिळाले नव्हते. मी घरच्यांना काहीच कळवले नव्हते. माझ्या पासपोर्टचा पत्ता ज्यांचा दिला होता त्यांनी घर बदललेले होते. माझी माहिती मिळण्यास उशीर झाला होता. मधल्या काळात कंपनीत एक चांगला प्रसंग घडला.

एडी करंट क्लचचे नियंत्रक कोणत्या कारणाने जळतात हे मी शोधून काढले होते. त्यात मोटारोलाचे थायरीस्टर व व्ही डी आर (व्होल्टेज डिपेन्डंट रेझीस्टर) वापरले होते त्यांचे माहिती पत्रक वाचताना समुद्र पातळी व हवेतील बाष्पाशी संबंधीत क्षमता गुणांकातील (डी रेटींग फॅक्टर) फरक दाखवला होता. नियंत्रकातील थायरीस्टर व व्ही डी आर हे ४०० व्होल्ट क्षमतेचे होते. क्लच १८० ते २०० व्होल्ट क्षमतेचा होता. खोरामदार्रेह गाव समुद्र पातळी पासून ७००० फूट उंच होते, क्षमता गुणांक फरकाने थायरीस्टर व व्ही डी आर हे ६०० ते ८०० व्होल्ट क्षमता असणारे वापरणे आवश्यक होते. मी हे पत्राद्वारे कंपनी प्रमुखाला कळवले. त्याने त्याच्याच नावाने एक नवीन पत्र तयार करून इंग्लंड च्या हिनन ड्राइव्ह ह्या कंपनीला पाठवले. उपाय सुचवल्या बद्दल त्या कंपनीने आभार मानीत १५० थायरीस्टर व व्ही डी आरचे एक पार्सल आमच्या कंपनीला मोफत पाठवले. त्यात माझा उल्लेख नव्हता. पण तेव्हा माझा पगार १०,००० झाला. २५०० च्या मानाने सात महिन्यात १०,००० पगार, बरीच मजल गाठली होती.

नंतरच्या महिन्यात ३५,००० देऊन नवीन कोरी पेकान (हिलमन) चार चाकी गाडी घेतली. १५ दिवसातच गाडीचा अपघात करून पैसे मिळवता येतात हे शिकलो. तेहरान च्या रस्त्यावर गर्दीत एकाने गाडी माझ्या समोर आणली व मुद्दाम ब्रेक लावला, माझ्या गाडीने मागून थोडा धक्का दिला. पोलिस आला, परदेशीय बघून लगेच नुकसान भरपाईचे २५० समोरच्या गाडी चालकाला देण्यास सांगितले. पुण्यातले पोलिस ह्याला मुळीच अपवाद नाहीत त्यामुळे मला पुण्यात असल्या सारखेच वाटले होते.

१ मे १९७८ इराणी पद्धतीने माझे लग्न झाले. लग्नाला लग्न कार्यालयातला एक प्रतिनिधी भले मोठे पुस्तक घेऊन आला होता त्यात बर्‍याचजणांनी बर्‍याच ठिकाणी सह्या केल्या आम्ही दोघांनी सह्या केल्या. त्या रात्री मेहमानसार्‍यात (गेस्टहाउस) सगळ्यांना पार्टी दिली. तेहरानच्या गुरुद्वारा जवळ एका सरदाराचे मिठाईचे दुकान होते तिथून आम्ही १५ किलो गुलाब जाम आणले होते. काही पारंपरिक इराणी मिठाई व खाण्याचे पदार्थ देखील होते. समारंभात दारूची मागणी सुरू झाली. " आमच्यात लग्नाला मिठाई वाटतात व तलाक झाला की दारू पिऊन धुंद होतात ", असे सांगून मी सगळ्यांना गार केले. सगळ्यांना गुलाबजाम प्रकार खूप आवडला होता. दोन महिन्यात कंपनीने एक ६०० स्क्वेअर फुटाचा फ्लॅट त्यांच्या कामगारांना देतात तो दिला. पण मी कामगार नव्हतो, एक अनुभवी तंत्रज्ञ असूनही दर्जा कमी दाखवण्याचा एक प्रकार, भारतीयांना वागणूक देण्याची इराणी पद्धत. माझ्यासारखे काम करणारे इराणी माझ्या पेक्षा जास्त पगार घेत असत शिवाय गॅरेज व बगीचा असलेल्या बंगल्यात राहत होते. ह्याच्या अगदी विरुद्ध आपण भारतात परकीयांना सगळ्या क्षेत्रात नसता पाहुणचार करण्यात पुढाकार घेतो, हे जागोजागी दिसते.

एकदा बिस्किट प्रकल्पात क्रमांक तीनच्या उत्पादन शृंखलेत एक मोठा स्फोट झाला. माझा त्या प्रसंगाशी काही संबंध नव्हता तरीही सगळ्यांनी ह्या दोषावर उपाय शोधण्याचे मला आव्हान केले. मी माझ्या पद्धतीने उपाय शोधला व आवश्यक दुरुस्ती करून दाखवली. कसे ? - भेटू भाग - २४.