नशीब हे शिकलो - ४८

मायक्रोफिल्म सेवा कंपनीत मी १९९१ - ९२ काम केले. जून १९९२ पासून मी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला अर्थात परवाना ओमानी मित्राचा होता त्याचा १५० रियाल सहयोग हक्क दर महिना मी देणार होतो. इथून एक नवा अनुभव सुरू झाला. खिशात एक पैसा भांडवल नसताना परदेशात व्यवसाय कसा करायचा हे एकेक प्रसंगातून मी शिकत होतो. मला दर महिना ५०० रियाल कमावणे आवश्यक होते.

मस्कतच्या गणपती उत्सवात एका मुंबईकराची ओळख झाली होती. त्याने एकदा त्याच्या कंपनीत महत्त्वाच्या छाया चित्रांचा संच बनवण्याचे काम दिले. त्याच दिवशी रात्री त्यांच्या फर्निचर शोरूम मधील फर्निचरची छायाचित्रे मी घेतली, काम रात्री एकला संपले. पाहाटे ३ ला एक फोटोलॅब काम सुरू करित असे तिथे जाऊन ५० मध्यम आकाराची छायाचित्रे तयार करून घेतली. लगेच ४० की.मी. अंतरावर असणार्‍या विमान तळावर त्या मित्राच्या हातात सकाळी सात वाजता मी ती छायाचित्रे दिली. त्याची वेळ मी पाळली म्हणून त्याने माझे कौतुक केले. दुबईच्या नव्याने ऊघडणार्‍या एका मोठ्या हॉटेलचे फर्निचरचे कंत्राट त्याच्या कंपनीला मिळाले. त्याच कंत्राटा करिता मी वेळेवर फोटो दिल्याने कंपनीच्या मालकाने माझे कौतुक केले. ते काम बघून कंपनीने मला जाहिरात पुस्तिकेला आवश्यक असणारी छायाचित्रे तयार करण्याचे काम दिले.

काही महिन्यांनी ह्याच कंपनीने व्यवसाय संयोजन, विलिनीकरण, आंतर्राष्ट्रीय गुणवत्ता वगैरे विषयांचे पाच दिवसाचे शिबीर आयोजीत केले होते. ह्या शिबिराला बर्‍याच इतर कंपन्यांचे अधिकारी प्रशिक्षण घेण्याकरिता हजर होते. प्रशिक्षण देणार्‍या गटात त्या त्या विषयातले तीन नामांकित सल्लागार तीन वेगळ्या देशातून आले होते. मला त्या पाच दिवसाचे रोज आठ तासाचे चलचित्र मुद्रणाचे काम मिळाले होते. हे माझे नशीब. त्या संधीचा मला फार फायदा झाला. पैशात मोबदला चांगला मिळालाच पण अमोल सल्ला रोज ऐकायला मिळाला. तिथे एक आंतर्राष्ट्रीय व्यावसायिक कोणत्या अपेक्षेने व योजनांनी एक व्यवसाय बहूदेशिय पातळीवर कसा उभा करतो हे शिकलो.

त्या शिबिरांतल्या चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणाच्या काळात प्रशिक्षण गटातला वयस्क सल्लागार माझ्या बरोबर जेवायला येऊन बसला. त्याने माझी विचारपूस केली. मी पण संधीचा फायदा घेत त्याला एक प्रश्न टाकला. "एक आंतर्राष्ट्रीय व्यावसायिक ग्राहकाच्या भावना, स्थानिक रिती रिवाज, नीती-अनीतीला त्याच्या व्यवसाय संयोजनात किती महत्त्व देतो?" मी फक्त एक चलचित्रकार म्हणून त्या प्रशिक्षणात उभा नसून कान देऊन नीट ऐकतो आहे हे त्याला जाणवले होते. त्याने माझी पाठ थोपटली. त्याने हसत एका वाक्यात उत्तर दिले. "त्या सगळ्याचा उपयोग करून जास्त फायदा कसा मिळवता येई हाच एकमेव उद्देश असतो, असावा." वाचकहो, समझदारोको इशारा काफी है! तो वयस्क सल्लागार ब्रिटिश होता.

ह्याच कंपनीतून मला एकदा चलचित्र, छायाचित्र व ध्वनी व्यवस्थेचे काम मिळाले मी ६ चॅनल कसर विकत घेतला, २०० वॉट्चा ऍम्प्लीफायर, दोन ऑडिओ टेक्नीकाचे माइक व स्टॅन्ड विकत घेतले, एक्सेलार केबल विकत घेतल्या व ते काम आम्ही  - मी, बायको, दोन्ही मुलांनी मिळून पूर्ण केले. सगळ्यांनीच आमचे कौतुक केले. अजून महाजालाचे जाल मस्कतला पसरले नव्हते त्यामुळे चलचित्र, छायाचित्र व ध्वनी व्यवस्थेची माहिती फक्त मासिकातून मिळवण्याचे खूप प्रयत्न केले. बर्‍या पैकी माहिती मिळवली.

मी गेले काही दिवस शब्दगारवाच्या कामात व माझ्या ह्या ब्लॉगची टेम्प्लेट बदलण्यात गुरफटलो गेलो. १२/१२/२००९ च्या रात्री महाराष्ट्राला भूकंपाचा धक्का बसला व जून १९९० चे दिवस एकदम आठवले. त्या वर्षी बायको दोन्ही मुलांना घेऊन ईराणला गेली होती. मी मस्कतला होतो रात्री दूरचित्रवाणीचा कार्यक्रम बघत बसलो होतो व इतक्यात इराणला भूकंपांचे हादरे बसले असून भागाचे वर्णन दाखवायला सुरुवात झाली व आभर गावाचे नाव ऐकले आणि मला काय करावे सुचेना कारण अभार गावापासून १० की. मी. अंतरावर बायकोच्या आईचे घर आहे. मला फोन करणे शक्यच नव्हते. तरीही दोनदा फोन फिरवून बघितला इराणचा कोड फिरवताच व्यस्त संदेश  मिळत होता. पण बातमी पुन्हा लक्ष देऊन ऐकली जागेचा नकाशा दाखवला तेव्हा समजले अभार जवळील डोंगरात व पलीकडच्या भागात कैक गावे नाहिशी झाली होती तिथे असलेल्या मोठ्या धरणाचे बरेच नुकसान झाले होते. परंतु अभार गाव सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले होते.

मला रात्री केव्हा झोप लागली समजले नाही. पण सकाळी उठून पुन्हा दूरचित्रवाणी च्या बातमीत काही दिसेल का ह्याचा शोध घेतला. हेलीकॉप्टरने घेतलेली चलचित्रफित बघायला मिळाली त्यात ति सगळा परिचित भाग सुरक्षित दिसला तोच एक दिलासा. परंतु त्या धरणापासून एका सरळ रेषेत २०० ते ५०० वस्तीची कैक लहान खेडी नाहिशी झालेली दिसत होती. त्या खेड्यां मधून मी कितीतरी वेळेला प्रवास केला होता. आम्ही त्या झाडीतून सुटीच्या दिवशी भटकायला जात होतो.तीन दिवसा नंतर बायको-मुलांचा आवाज ऐकायला मिळाला, मी लगेच १० दिवसाची सुटी घेऊन इराणला गेलो बायको-मुलांना घेऊन परतलो, कंपनीने नोकरीतून काढण्याचा त्या महिन्यातील दुसरा हादरा दिला होता. पण मी सावरलो होतो - क्रमश: