नशीब माझे - - भाग - ७

नोकरशाहीत नोकरी करणे हा एकच पर्याय मानणार्‍या माझ्या आप्तांना व्यवसायातले फायदे समजून
घेण्याची इच्छाच नव्हती. पोती भरून धान्य, विजेची उपकरणे, गॅस शेगडी हे सगळे मी ५०० रुपयाच्या
गुंतवणुकीवर सुरू केलेला व्यवसायातून कमावले होते. तरीही मी नोकरी करावी हे रडगाणे रोज असायचे.
कटकटी वाढू लागल्या मी फक्त रात्री घरात येत असे. सकाळी लवकर निघून जात असे. घरातल्या
मोठ्यांसमोर अंडरस्टॅन्डींग मान्य केले. रोजच्या कटकटीला कंटाळून एकदाचा व्यवसाय बंद केला.

१९७१ गांव सोडून मुंबईत भावा कडे आलो. विमान विरोधी तोफांचे इलेक्ट्रॉनिक नियंत्रकाचे भाग
जुळवणीचे काम मिळाले. तिथे प्रथम मराठी - गैरमराठी वादाचा वाइट अनुभव घेतला. कंपनीत त्या
विभागात मीच एक मराठी होतो, मॅनेजर व इतर केरळी होते. माझी कामातली सफाइ व कामाचा वेग
बघून काम मिळाले होते. मी जोडलेले भाग सगळ्या चाचणीत पास होत असत. पण पगार मात्र
इतरांपेक्षा कमीच होता. ६ महिन्यात ती कंपनी सोडली.

१९७२ एका खर्‍या हितचिंतकाने मला इलेक्ट्रॉनिक शिक्षण संस्थेत नोकरी मिळवून दिली. माझ्या जवळ
कूठलेच प्रमाण पत्र नव्हते. कामातील सफाई व कामाची समज म्हणून काम मिळाले. इलेक्ट्रॉनिक
लॅबच्या उपकरणांची देखरेख, दुरुस्ती व संबंधीत प्रयोगांची बांधणी असे काम होते. संस्थेचा कर्मचारी होतो
म्हणून वाचनालयातील कोणतेही पुस्तक सहज उपलब्ध होते, भरपूर वाचन केले. इथे थेअरी व प्रॅक्टीकल
ह्यातला फरक व थेअरीचे अवास्तव महत्त्व जाणवू लागले. माझ्या सारख्या प्रॅक्टिकल माणसाला थेअरी
म्हणजे शब्दांची कसरत वाटू लागली. इलेक्ट्रॉनिक उपकरणांची व भागांची थेअरी समजवताना
प्राध्यापकांचा गोंधळ मला लवकर समजू लागला. विद्यार्थी शंका व माहिती करिता माझ्याकडे येऊ लागले.
मी पटकन प्रात्यक्षिक दाखवून समजवू शकत होतो. विद्यार्थी सहज समजू शकत होते. परिणाम वाईट
झाला. प्राध्यापक मंडळी मला दोन हात दूर ठेवू लागले. प्राध्यापकांनी जे विद्यार्थी माझ्याशी बोलताना
बघितले असतील त्यांना त्रास द्यायचे सुरू केले. मी १५ - २० मिनिटात विद्यार्थ्यांच्या समोर उपकरण
उघडून दुरुस्त कसे केले जाते ह्याचे प्रात्यक्षिक दाखवायला सुरुवात केले. पण प्राध्यापकासमोर दुरुस्त
करणे टाळायचो. हा प्रकार एका प्राध्यापकाच्या लक्षात आला. तो स्वतः  त्याला माहीत नाही अशी कबुली
देऊन विद्यार्थ्यांच्या बरोबरीने दुरुस्तीचे प्रात्यक्षिकं बघायला मुद्दाम हजर असायचा.

मी उपकरणे लॅबमध्ये दुरुस्त केल्याने मुख्य कार्यालयातील काही महाभागांची बाहेरील कमाई थांबली, ते
वेळोवेळी मला त्रास देण्याचे प्रयत्न करायचे.

विद्यार्थ्यांना ऑसिलोस्कोप व आतील भागांचे कार्य समजावे म्हणून प्रत्येक भाग सुटे करून एका ३फूट रुंद
२फूट उंच तक्त्यावर मी जोडले होते. संस्थेला भेट देणार्‍यांना ते एक मुख्य आकर्षण ठरले होते. त्या
अवधीत जे प्राचार्य होते ते माझे नेहमी कौतुक करीत असत.

अशा एकेक घटना घडत होत्या. त्याच संस्थेच्या नवीन प्राचार्याने मला नोकरीतून काढून टाकले.
ते कसे?? पाहूया पुढील भागांत. एक मात्र खरं शिक्षित धेंडांची प्रमाणित घाणेरडी वृत्ती मी फार जवळून
अनुभवली. पुन्हा तेच अहो दोष माझा होता, असल्या कचर्‍यात सांभाळून घेणे मी शिकलो नाही - - नशीब माझे - भेटूया - भाग - ८       
http://dtrskills.blogspot.com ला जरूर भेट द्या. मी ध्वनी मुद्रित केलेली गोड भजने ऐकायला मिळतील.