नशीब त्यांचे - भेटू भाग - २५

माझी मदत वेळोवेळी हक्काने ज्यांनी घेतली ते नशीब त्यांचे होते पण मी
मदतीची अपेक्षा करणे हा माझा दोष ठरत होता. ह्यालाच म्हणतात शिकलेला,
जीवनाचा अभ्यास केलेला, इथे परीक्षा, पास / नापास, नाही इथे प्रमाणपत्रे. 
शिकवलेला / शिक्षित नव्हे.

कंपनीचा सॅन्डोझ औषध प्रकल्प तेहरानला
होता. औषध चाचणी शाळेतील स्पेक्ट्रोफोटोमिटर एकदा बिघडला. दुरुस्तीचे
प्रयत्न झाले आणि मग ते काम मला दिले गेले. मी ती वस्तू प्रथमच बघितली
होती. सवयी प्रमाणे माहिती मिळवली. त्या प्रयोग शाळेत एक विशेषज्ञ होता.
त्याचे वागणे इंग्रजी बोलणे पुणेरी होते. तो पाकिस्तानी असल्याचे चार
तासानंतर चहा पिताना समजले. त्याने मला स्पेक्ट्रोफोटोमिटर चा वापर व
क्रमवार क्रिया व्यवस्थित समजावून सांगितली.

औषधातील निर्धारित मूळ
रसायनाचा नमुना एका कप्प्यात ठेवून गुणदर्शक शून्यांवर स्थिर करावा,
दुसर्‍या कप्प्यात ज्या औषधाची चाचणी करायची असते त्याचा नमुना ठेवून
चाचणी क्रिया सुरू होत असे, तसा निष्कर्ष आलेखपत्रावर लेखीत होत असे. त्या
आलेखाच्या निरीक्षणातून औषधाच्या दर्जातील तंतोतंत फरक समजत असे. तो
विशेषज्ञ १० दिवस सुट्टीला गेला असतांना त्या उपकरणात बिघाड झाला होता. 

कोणतीही
वस्तू उघडणे व जैसेथे बंद करण्याचा माझा वयाच्या १० वर्षापासूनचा दांडगा
अनुभव त्यामुळे ते उपकरण मी उघडले. निरीक्षणात दिसले ते सगळे काही
जागच्याजागी होते परंतु अपेक्षित बदल नियंत्रकावर (पोटेन्शीयोमीटर / पॉट)
मूळ कंपनीने केलेल्या खुणा हलवलेल्या दिसून आल्या. त्या उपकरणाचा नकाशा
नसल्यामुळे दोन तास चाचपडत बसलो मग एकएक भाग लक्षात येऊ लागला व पाच
तासानंतर ते उपकरण व्यवस्थित अपेक्षित काम करू लागले. त्या नंतर केव्हाही
बिघाड झाल्यास मी खोरामदार्रेत बसून तेहरान मधले ते उपकरण तिथल्या वीज
दुरुस्तीवाल्याच्या मदतीने दुरुस्त करण्यात यशस्वी ठरलो.

त्याच
प्रकल्पात औषधी गोळ्यांच्या पट्ट्या बनवणार्‍या यंत्रात बिघाड झाला. दर
१५० पट्ट्या नंतर २० पट्ट्यातल्या गोळ्या साच्यात चिरडल्या जायच्या.
तासाला हजार पट्ट्या ह्या हिशोबाने खूप मोठे नुकसान होत असे. महिनाभर
यांत्रिक व इलेक्ट्रॉनिक दुरुस्ती पथकात वाद झाले दोषारोप झाले. शेवटी मला
ते काम दिले गेले. पहिले दोन तास मला तिथल्या इराणी पथकाने मदत करायचे
टाळले. ते उत्पादन गट प्रमुखाच्या लक्षात आले त्याने मला त्याचा खास
मदतनीस दिला. तो बिघाड मोटर बसवलेल्या ब्रेकचा होता. सगळ्यांनी मला वेडे
ठरवले. मी त्यांच्या दुरुस्ती प्रमुखाला सगळे समजावून सांगितले त्याला
माझे म्हणणे पटले. मोटरवर नवीन ब्रेक पॅड लावण्यात आले. चूक तिथेच झाली
होती. ब्रेक बसवताना फिलर गेजने निर्धारित अंतर ठेवणे तो दुरुस्तीवाला
विसरला होता. मी त्याला तसे करायला लावले. त्या ब्रेकचे नियंत्रण एका खूण
निरीक्षक इलेक्ट्रॉनिक उपकरणाने होत असे, त्यात थोडासा गोंधळ केला होता.
त्याचे संयोजन कसे असावे ह्याचे प्रात्यक्षिक मी त्यांना समजावून
सांगितले. ते यंत्र व्यवस्थित सुरू झाले व तासाला १५०० पट्ट्या तयार
होण्याचा वेग गाठू शकले. हाच प्रकार इंजेक्शन्च्या बाटल्या भरणार्‍या
यंत्रात होता, तेही दुरुस्त करण्यात मला यश मिळाले.

१९८० च्या
सुरुवातीला कंपनीत काम करणार्‍या सगळ्या भारतीयांना परतावे लागले. मी
एकटाच उरलो होतो. एक विनोदी  तर दुसरा जीवघेणा प्रसंग घडला. मीच नाही तर
इराणी सहकारी वाचलो, हे नशीब त्यांचे - भेटू भाग - २६.