नशीब भाग - ५६

स्टुडिओच्या त्या नवीन छोट्या जागेत बरीच मोठी कामे करण्याची संधी आम्हाला मिळाली. सुरुवात झाली ती एका सरकारी संस्थेतून. माझी बायको एका ओमानी लग्नाच्या चल चित्रफितीचे संपादन आत करत असताना त्या लग्नातील नवरा-बायको जोडी ते संपादन बघत होते. त्या बाईने एका विशेष नाच प्रसंगाला नवऱ्याला बाहेर जायला सांगितले. तो बाहेर येऊन माझ्या जवळ बसला होता. मी एका जाहिरातीचे व्ही सी डी मुद्रण सुरू केले होते. त्याला त्याचे आश्चर्य होते. त्याने त्याला असलेल्या अडचणी मला सांगितल्या. तो एका सरकारी संस्थेत प्रसिद्धी व संकलन विभागात आधिकारी होता. त्या संस्थेजवळ शे दोनशे व्ही एच एस चित्रफितीचा साठा होता. त्या चित्रफितीचे संपादन करून व्ही सी डी बनवण्याऱ्या व्यवस्थेचा खर्च एका कंपनीने २५ हजार रियाल सांगितला होता. व्यवस्था नको असल्यास चित्रफितीचे संपादन करून प्रत्येक व्ही सी डी चा खर्च ५०० रियाल होता. त्या अधिकाऱ्याने माझी मदत मागितली. ती सगळी माहिती संपादन करून व्ही सी डी बनवण्याची व्यवस्था मी माझ्या मुलाच्या मदतीने बनवून दिली. त्या काळात १९९९ व्ही सी डी प्रकाराचे नावीन्य होते पण मुद्रण व्यवस्था दुर्मिळ होती. आम्ही जी व्यवस्था बनवली होती त्यात आयमॅक संगणकाला फायर वायरच्या साहाय्याने अंकित प्रक्रिया साधन (डिजीटाइझींग इंटरफेस) जोडले होते. व्ही एच एस चित्रफिती चालक (व्ही सी आर) त्या अंकित प्रक्रिया साधनाला जोडला होता. आयमॅक मध्ये ऍडॉब प्रिमिअर हा चलचित्र संपादक (व्हिडिओ एडिटर) संपादना करता होता. ह्या व्यवस्थेला ३ हजार रियाल खर्च झाला होता. आमचे २ हजार रियाल प्रशिक्षण व साधने जुळणीचा खर्च आम्हाला मिळाला होता. एकही इंग्रजी शब्द न समजणाऱ्या ओमानी खेड्यातल्या तरुणांना चित्रफितीचे संपादन कसे करायचे व प्रत्येक व्ही सी डी कशी तयार करायची ह्याचे प्रशिक्षण माझ्या मुलाने त्यांना समजणाऱ्या तुटक्या फुटक्या हिंदी - मराठी भाषेतून दिले होते. पुढे सहा महिने ओमान टीव्हीचे आधीकारी ह्या विभागाकडून त्यांना लागणाऱ्या व्ही सी डी तयार करून घेत असत.

ऍपल आयमॅक संगणक

एका महत्त्वाच्या सरकारी वाचनालयाचा एक सल्लागार माझ्या स्टुडिओत छायाचित्र संपादना करता आला होता. तो झांजीबार प्रदेशातील इतिहासाची माहिती गोळा करत होता. त्याच्या कडून फार महत्त्वाची माहिती मला समजली. त्या प्रदेशातील जनतेला इंग्रज राजवटीत कशी वागणूक दिली जात असे ती छाया चित्रे मला बघायला मिळाली. त्या चित्रांची स्वच्छता व सुबकता मी वाढवून दिली होती. झांजीबारी जनतेला माणुसकीने वागणूक देऊन मनुष्य म्हणून त्यांचे हक्क मिळवून देण्यात तिथल्या स्थानिक भारतीयांचा खूप मोठा व महत्त्वाचा वाटा होता. त्या इतिहास संपादकाबरोबर अजून काही जाणती महत्त्वाची मंडळी पण होती (त्यांचे अंगरक्षक स्टुडिओ बाहेर उभे होते). त्यांनी मला वाचनालयातील पुस्तके, चित्रफिती वगैरे अंकित (डिजीटाईज्ड) करण्या करता काय खर्च येईल असे विचारले. मी त्यांना बाहेरून अंकित करून घेण्या पेक्षा तशी व्यवस्था वाचनालयाची असावी असे सुचवले. त्यातल्याच एकाने विचारले होते की अंकित झालेली माहिती संगणकावर वाचकाला दाखवता येईण्याची सोय असेल का? माझा मोठा मुलगा ते सगळे ऐकत होता, त्याने ऍपल टीसीपी आयपी व इथर्नेट पद्धतीने संगणकाचे नेटवर्क कसे करता येते ते समजावून सांगितले. मी व मुलाने मिळून त्यांना अंकित व्यवस्था व संगणकाचे नेटवर्क ह्याचा साधरण खर्च काय असू शकेल ह्याची कल्पना दिली. ति जमलेली मंडळी त्यांचे काम संपवून निघून गेली. आम्ही त्या प्रसंगाला विसरण्याचा प्रयत्न केला. आहो रोज कुणीतरी आम्हाला पिडायला येत असत बडबड करून निघून जायचे, ही मंडळीपण त्यातलीच असावी!

त्या प्रसंगाला सहा महिने झाले असतील तेव्हा एका नावाजलेल्या कंपनीचा अधिकारी आम्हाला भेटायला आला. त्याने वाचनालयातील माहितीला अंकित (डिजीटाईज्ड) करण्या करता काय खर्च येईल असे विचारताच मला धक्का बसला. आम्ही सुचवलेल्या व्यवस्थेचा खरोखरीच गांभीर्याने शोध सुरू झाला होता. त्या अधीकाऱ्याला रीतसर खर्चाचा हिशेब व पावत्या हव्या होत्या. आम्ही दोन दिवसाने हिशेब तयार केले, वाचनालयाशी मर्यादित अंकित व्यवस्था व नेटवर्क खर्च २ लाख रियाल असेल असे सांगितले. त्या अधिकाऱ्याने आम्हाला वेड्यात काढले, त्याने अशा कामाचा हिशेब कसा असतो ते आम्हाला समजावून सांगितले, ते फारच धक्का दायक होते. अप्रगत देशातून मुख्यत: आफ्रिकी प्रदेशातून ओव्हर इन्व्हॉइसींग कसे केले जाते व कसे आम्हा भारतीयांना त्यात फसवले जाते त्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. त्या वाचनालयाच्या कामाचा प्रकार तसाच झाला होता. दोन परदेशीय कंपन्यांनी त्या कामाचा २ कोटी खर्च दाखवला होता. आहो ५ संबंधित अधिकाऱ्यांना हिशेबाच्या १० टक्के कामाचे रीतसर कागद मिळण्या करता आधी द्यावे लागणार होते. मला प्रश्न होता २ लाखाचा खर्च २ कोटी दाखवणार कसे? सगळेच धक्के देणारे होते. आम्ही दिलेल्या व्यवस्थेत काही विशेष साधने, ऍपल संगणक व नेटवर्क सर्व्हर जे इथरनेट तारांनी जोडलेले होते. दोन कोटीच्या हिशेबात त्यांनी एक विशेष इमारत, फायबर ऑप्टीक चे जाळे, टेबल-खुर्च्या, कपाटे, खास जुळणी केलेले संगणक वगैरे पसारा दाखवला होता. ह्या सगळ्याचा निष्कर्श काय तर सरकारने "अंकित वाचनालय प्रकल्प" नाकारला. त्याचे कारण अंगरक्षक सोबतीला घेऊन मला भेटलेली मंडळी त्या प्रकल्पाचे सल्लागार होते. माझा फायदा शून्य. सल्लागार मंडळींना त्यांचा पगार मिळाला, कदाचित चांगले काम केल्याचे प्रशस्ती पत्र त्यांना मिळाले असणार.

सोनिचा व्हीएक्स ७०० मिनी डीव्ही चलचित्र ग्राहक (व्हिडिओ कॅमेरा)

ऍपलचा आयबुक संगणक.

१९९८ पर्यंत आम्ही एस व्ही एच एस पद्धतीचे चलचित्र ग्राहक (व्हिडिओ कॅमेरा) वापरत होतो. एकदा एका आयरिश माणसाने आमच्या स्टुडिओत सोनिचा व्हीएक्स ७०० मिनी डीव्ही चलचित्र ग्राहक (व्हिडिओ कॅमेरा) दाखवायला आणला. डीव्ही प्रतिमा दर्जा एस व्ही एच एस प्रतिमा तुलनेत अतिशय चांगला होता. तो चलचित्र ग्राहक फार कमी किमतीला आम्हाला मिळाला. त्याच काळात मोठ्या मुलाकरता मी ऍपलचा आयबुक संगणक घेतला होता त्यातील फायरवायर व सोनीचे आयलिंक डीव्ही चलचित्र संपादन फार सोपे झाले. पण त्या चलचित्र ग्राहकातील ६० मिनिटाची चित्र फीत आमच्या कामाला कमी होती. आम्हाला दोन तास सलग चलचित्र मुद्रण सोय आवश्यक होती. मग सोनीचा टीआरव्ही ७२० हा अंकित चलचित्र ग्राहक (व्हिडिओ कॅमेरा) आवडला त्यात ९० मिनिटाची डिव्ही ८ चित्रफीत वापरता येत असे. त्याला ५ इंचाचा एल्सीडी दर्शक (मॉनिटर) होता व ५ तास चालणारी बॅटरी होती. २० पट फेर भिंग (झूम लेन्स) होते व सगळ्यात महत्त्वाचे पाल / एंटीएस्सी दोन्ही प्रकारची मुद्रण व्यवस्था होती. ह्या चलचित्र ग्राहक (कॅमेऱ्याची) ही सोय वापरून मी मोठ्या मुलाच्या मदतीने एका फार महत्त्वाच्या चित्र फितीचे संपादन केले होते. क्रमशः