नशीब त्यांचे - भाग २४

कोणत्याही प्रकारचा बिघाड झालेल्याचा शोध घेताना मी त्या वस्तूच्या अपेक्षित कामाची ओळख करून घेतो. कोणते व किती भाग त्यात वापरले आहेत. प्रक्रिया घडण्याचा क्रमवार आलेख ती वस्तू वापरणार्‍या व्यक्तीकडूनच  समजून घेतल्याने दोष शोधून काढणे सोपे होते असा माझा अनुभव आहे.

बिस्किट प्रकल्पात प्रत्येक शृंखलेच्या ७ शेगड्या (ऑइल फायर्ड बर्नर) होत्या. प्रकल्पातील बाकी तीन शृंखला कार्यरत असताना क्र.३ शृंखलेतील ३ शेगड्या नीट काम करीत होत्या, चौथी शेगडी पेटवताना स्फोट घडत होता. मी प्रकल्पात काम सुरू केल्यापासून क्र.३ शृंखला बंदच बघितली होती. माझ्या आधी तीन वर्ष हा दोष काढण्याचे प्रयत्न झाले होते परंतु दोष समजू शकले नव्हते. तेव्हाचा तो चौथा स्फोट होता.

नेहमी शेगडी चालक शेगडी क्रमांक १ पासून पेटवायला सुरुवात करीत असे, मी त्याला क्र. ७ पासून सुरू करायला सांगितले. क्र. ७ च्या नियंत्रक पेटितंच शेगडीला आवश्यक असणार्‍या हवा पुरवठा पाइप वर दाब सूचक होता. मी शेगडी दुरुस्ती पथकाला क्र. १ च्या नियंत्रक पेटीत नव्याने हवा दाब सूचक बसवायला सांगितले. बाकीच्या तीन ही शृंखला सुरू असताना तिसर्‍या शृंखलेतील क्र.७ ची शेगडी सुरू केली. नंतर क्र.१ची शेगडी सुरू केली. क्र.७ ते क्र. १ शेगडीत १०० फुटांचे अंतर होते. क्र.१ शेगडीच्या हवा दाब सूचकात क्र. ७च्या सूचकापेक्षा कमी दाब दाखवत होते. मला दोष समजला. हवेचा प्रवाह कमी झाल्याने अपेक्षित दाबापेक्षा कमी दाब मिळाल्याने  शेगडी पेटत नव्हती मग कामगार ती पेटवण्याचा प्रयत्न करताना न जळलेल्या इंधनाचा साठा शेगडीत जमा होत असे, मग ते इंधन पेट घेत असे व मग त्याचा स्फोट होत असे. तुमची दुचाकी सुरू करताना कार्ब्युरेटर साफ नसला की काही वेळा फटाके फुटल्याचा आवाज येतो तोच प्रकार त्या शृंखलेत झाला होता. फक्त कारणे वेगळी होती. मोठी बैठक झाली, चारही शृंखलांच्या पाइपची जाडी कमीजास्त करून सगळ्या २८ शेगड्यांना अपेक्षित हवेचा दाब मिळेल ह्याची सोय केली गेली. बिस्किट प्रकल्पातील कामगार माझे समर्थक बनले, कारण उत्पादनात वाढ झाली, जास्त कामगारांना नोकरी मिळाली.

दोन प्रसंग मोठे मजेशीर घडले. एसफहान भागातून एक हुशार मुलगा वीज दुरुस्ती पथकात कामाला आला होता. त्याने माझ्याशी ओळख वाढवली. त्याला माझ्या कडून इलेक्ट्रॉनिक शिकायचे होते. माझ्या सगळ्या इराणी मित्रांनी मला सावध केले होते. एखादी गोष्ट शिकणे आणि अनुभव मिळवणे खूप फरक असतो. इनमिन महिनाभर तो माझ्या कडे शिकत होता. " ह्या परदेशीला काढून टाका मी एक इराणी त्याचे काम सहज करून शकतो " असे त्या इराण्याने कंपनीत सांगायला सुरुवात केले. बिस्किट उत्पादन गटाच्या लोकांना ते खटकले त्यांना माझ्या कामाचा अनुभव चांगलाच जाणवला होता म्हणून त्यांनी मला मुद्दाम एक आठवडा सुट्टी घ्यायला लावली. मी सुट्टी संपवून आलो सगळ्यांनी मोठ्या आवाजात माझे स्वागत केले. तो एसफहानी मुलगा ३ दिवसात कोणाला न सांगता कंपनी सोडून पळून गेला होता. इराण मधील परिस्थिती क्रांतीकारी चळवळीमुळे बिघडायला सुरुवात झाली होती. पुन्हा दोन महिन्यांनी दुसरा इराणी आव्हान म्हणून माझ्याकडे शिकायला आला. त्याला इलेक्ट्रॉनिक शिकवण्याऐवजी काम काय आहे कसे करावे लागते हे मी दाखवायला सुरू केले. १५ दिवसातच त्याने जमणार नाही म्हणून कबुली दिली व वीज दुरुस्ती पथकात काम सुरू केले.

शनिवार दर आठवड्याचा पहिला दिवस, त्या दिवशी पहाटे ४ ला उत्पादन गट प्रमुख माझ्या घरी गाडी पाठवायचा व मला यांत्रिक लाटणी, साचा, शेगड्या त्यातील साखळी पट्ट्याचे वेग नियंत्रण नीट साधेस्तोवर त्याच्या बरोबर सगळीकडे फिरवायचा. मग ६ वाजता पहिल्या पाळीचे कामगार आपापल्या जागेवर येऊन कामावर नियंत्रण मिळवायचे. असे केल्याने गुरुवार पर्यंत उत्पादन सुरळीत होत असे. तो गट प्रमुख ताजी बारबारी रोटी गरम करून, चहा, लोणी, त्याच्या घरचा खास गुलकंद असा नाश्ता माझ्या करता तयार ठेवत असे. हे असे व्यवस्थित एकसंध काम सुरू झाले की दिवसभर मी बाकीच्या विभागातून भटकत असे. प्रत्येक विभागातील गट प्रमुख मुद्दाम मला बोलवून त्यांचे तांत्रिक प्रश्न सोडवून घेत असत.

सगळ्या विभागांचा मिळून एक उत्पादन प्रमुख होता. तो मला नेहमी भटकताना बघत असे. कंपनीच्या एका बैठकीत त्याने मला काढून टाकण्याचा प्रस्ताव प्रकल्प प्रमुखाला पाठवला. प्र.प्र.ने ऊ.प्र.ला सहा महिन्यातील उत्पादन, यंत्रणेचे कार्य तास व दुरुस्ती तासाचा तक्ता दाखवला. त्यात माझी मदत फार मोलाची होती असे दाखवून दिले. त्याच बैठकीत उत्पादन गट प्रमुखांना बोलावून त्यांचे माझ्या विषयीचे मत विचारले, प्रत्येकाने माझे समर्थन केले होते.

इराणची क्रांती यशस्वी झाली असा भास सगळ्यांना झाला. परदेशी कामकर्‍याना चले जावं प्रकार सुरू झाला. मला इराणी बायकोमुळे फारसा त्रास नव्हता. पण बरेच काही घडले-बिघडले ? - भेटू भाग - २५.