नशीब भाग - ५७

ओमान मधील समुद्र किनार्‍याला चिकटून असलेले अल दुकम हे मासे गोळाकरणार्‍यांचे एक छोटेसे गाव. त्या गावात एके दिवशी एका नावाजलेल्या कंपनीने भली मोठी अवजड यंत्र सामुग्री आणली व त्या रेताड जागेत एक प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले. प्रकल्प अधिकार्‍याची बायको वेळ घालवण्याचे एक साधन समजून रोज चल चित्रण करीत होती. काही दिवसांनी त्या चित्रणाचे महत्त्व जाणवायला लागले. पण चित्रणाची योग्य काळजी घेतली जात नव्हती. प्रकल्प होता झिंगा शेतीचा (ष्रिंप फार्मींग). एके दिवशी त्या कंपनीच्या मालकाला त्या प्रकल्पाची प्रगती सरकार दरबारी दाखवणे आवश्यक झाले. ६, ७ महिन्याचे चित्रण मिनी डिव्हीच्या ३६ चित्र फितीमध्ये बंदिस्त होते, त्याचे संपादन करणे आवश्यक झाले. माझे नाव त्या प्रकल्प अधिकार्‍याला कोणीतरी कळवले होते. माझ्या कामाच्या अनुभवाची चौकशी झाली व त्या  एन्टीएससी प्रथेच्या ३६ चित्र फिती माझ्या हातात दिल्या गेल्या. एकूण ३५ तासाचे चित्रण झालेले होते व अजून ४ तासाचे करावे लागणार होते. माझ्या सोनी टीआरव्ही ७२० चलचित्र ग्राहकाने एन्टीएससी प्रथेचे ते सगळे चित्रण शांत बसून मी नीट बघितले. त्या सगळ्या चित्रणाला ५ मिनिटाच्या मर्यादित वेळेत बसवण्याची कसरत करायची होती. एक प्रायोगिक संपादीत चलचित्रण संगणकावर दाखवायला घेऊन गेलो. सगळ्यांनी त्या चित्रणाचे कौतुक केले. मग त्यात अरेबिक, इंग्रजी भाषेत संवाद तसेच पार्श्वसंगीत मुद्रण करण्याचे ठरले. त्या काळात मी मुलाकरता आयबुक जी४ संगणक नुकताच विकत घेतला होता. त्यावर फायनल कट प्रो ह्या चलचित्र संपादकाचे प्रयोग आम्ही सुरू केले होते. त्या चल चित्र संपादकाच्या साह्याने आम्ही त्या झिंगा शेतीचे काम पूर्ण करून दिले होते. 

ह्या संपादनाच्या कामात माझ्या व मुलाच्या कौशल्याचा अभिमान वाटावा असे काही प्रसंग घडले. अरेबिक व्हॉईस ओव्हर करता ओमान एफेमचा अनुभवी कलाकार आमच्या घरी आला होता. एका फक्त आयबुक संगणकासमोर माइक न ठेवता त्याला बोलायला सांगितल्यावर तो रागावला होता. त्याला फक्त स्टुडियोत बसून ध्वनी मुद्रण करतात एवढेच माहीत होते. पण आमची ती नवीन व्यवस्था समजून घेणे त्याला आवडले. फायनल कट प्रो च्या खिडकीत चलचित्र बघत भाष्य करण्याचे त्याला नावीन्य होते. दोन तासाच्या मेहनतीनंतर छान आवाजात ध्वनी मुद्रण झाले.  २०० वॉटच्या ध्वनी व्यवस्थेतून त्याने त्याच्या आवाजाची पाहिली ओळ ऐकली आणि तो आ वासून ते पाच मिनिटाचे भाष्य ऐकत होता. त्याने स्वत:चे कान धरले आणि मला मिठी मारली. त्यानंतर ते प्रायोगिक चलचित्रण मालकाला दाखवले, त्याने आमचे कौतुक केले. १० दिवसाने तो प्रकल्प अधिकारी इंग्रजी व्हॉईस ओव्हर करायला त्याच्या बायकोबरोबर आमच्या घरी आला होता. तिला त्या ओमान्या सारखेच आमच्या त्या संगणक ध्वनी व्यवस्थेचे आश्चर्य वाटले होते. ते नवरा-बायको जर्मन भाषेतून एकमेकांशी बोलत होते. आम्ही ते संपादनाचे काम किती कमी पैशात केले होते, जर्मनीत किती मोजावे लागणार होते, वगैरे. माझा मुलगा हसला व त्या जोडप्याला त्याने जर्मन भाषेतूनच ऐकवले "नशीब माझे व माझ्या बाबाचे, आम्ही भारतीय आहोत अशीच वागणूक मिळणार!" ति दोघे एकदम चपापली होती. त्यांना मुलाला जर्मन भाषा येते ह्याचे आश्चर्य वाटले होते.

ह्या नंतर वर्ष २०००, एक प्रसंग असा घडला की त्यातून जीवनात कोणत्या गोष्टीला प्राधान्य व कोणत्या जागी स्वाभिमान कसा सांभाळावा ह्याची फार छान शिकवण देऊन गेला. एका महत्त्वाच्या मोठ्या ओमानी घराण्यातील महिलेने माझा अंकित छायाचित्र क्षेत्रातील अनुभव पाहून मला तिच्या करता एक विशेष अंकित छायाचित्र व्यवस्था तयार करण्याची जबाबदारी दिली होती. इमारतीत वापरात असणार्‍या नक्षीदार लाकडी सामानाचा कारखाना तिच्या मालकीचा होता. लाकडावर नक्षीकाम / सुतारकाम करणारे कलाकार राजस्थान, केरळा, गुजराथ व उत्तर प्रदेशातून आणले होते. तिला त्या कामाचे नकाशे व छाया चित्रे जतन करून हवी होती. मी व मोठ्या मुलाने मिळून साधनांची यादी तयार केली. ऍपल जी५ संगणक, २२ इंचाचा सीआरटी दर्शक (मॉनिटर) आणि फेजवन अंकित प्रतिमा ग्राहक (कॅमेरा) त्याच्या साहाय्याने ३५ मेगा पिक्सेलची फार उच्च दर्जाची अंकित प्रतिमा तयार करण्याची क्षमता होती. नकाशे व नक्षीकामाच्या प्रतिमांचा दर्जा चांगला असावा म्हणून त्या प्रतिमा ग्राहकाची निवड आम्ही केली होती. आम्हाला त्या प्रतिमा ग्राहकाची संपूर्ण माहिती होती पण प्रत्यक्ष वापरातील त्रासाचा अनुभव नव्हता. मी १९९६ला जर्मनीत फोटोकीना प्रदर्शनात फक्त दोन दिवस तो प्रतिमा ग्राहक हाताळला होता. प्रतिमा ग्राहक विकत घेण्या अगोदर सुरक्षा म्हणून दुबईहून विक्रेत्याला प्रात्यक्षिक दाखवायला बोलावले होते. विक्रेता अरबीच होता. त्याला आम्ही त्या प्रतिमा ग्राहकाचा उपयोग कसा करणार हे समजलेच नाही. आमची चर्चा रंगात आली असताना त्या कारखानदार महिलेकडे तिचा अरेबिक मासिक चालवणारा मित्र आला होता तो मध्ये पचकला. ते प्रतिमांचे संच जमवण्याचे काम करण्या करता ह्या साधनाची गरजच नाही असे मत त्याने मांडले. त्याच्या डोक्यात मासिकाला लागणारा साधा प्रतिमा वाचक (स्कॅनर) घोळत होता. अहो त्याला काय गुळाची चव कळणार?
      
सकाळी ११ वाजता सुरू झालेली ति चर्चा संध्याकाळी ६ वाजता संपली. मी व मुलाने ति सगळी व्यवस्था कशी चालणार हे त्या दोन अरबांना कळू दिले नाही. विक्रेत्याला उपकरण विकण्यात फायदा असल्याने तो प्रतिमा ग्राहक विकून पैसे घेऊन निघून गेला. मासिक मालकाने त्या कारखानदार महिलेला उगीचच शंका ग्रस्थ केले. शेवटी त्या बयेने तिचा अरबी रंग दाखवला. तिने चक्क सांगितले ते अंकित चित्रण कोणीही गाढव करू शकेल, तेव्हा तिला आमची गरज नाही. असला अपमान मला नवीन नव्हता. मी जास्त काही बोललो नाही. गाढव शोधण्यात तिला यश मिळो असे सांगून त्याच क्षणी संबंध तोडले. वर्षानंतर त्या बयेची मुलगी  त्या प्रतिमा ग्राहकाचे पुस्तक घेऊन आली तिला माझी मदत हवी होती. म्हणजेच अजून त्यांचा गाढव शोध सुरू होता.

२००१ मध्ये माझ्या आईच्या शेवटच्या घटका सुरू झाल्या होत्या म्हणून मोठ्या भावाने भेटायला बोलावले होते. माझा पासपोर्ट स्टुडिओ मालकाजवळ होता. त्याने मला पासपोर्ट देणे नाकारले. त्याच आठवड्यात आईचा देहान्त झाला. सगळ्या नातेवाईकांनी माझ्यावर तोंड सुख घेतले. माझे व स्टुडिओ मालकाचे चांगलेच भांडण झाले. तेव्हा मला चांगलाच धक्का बसला. एका दुसर्‍या ओमान्याला स्टुडिओ सकट ५० हजार रियालला मला विकण्याची चर्चा त्याने सुरू केली होती म्हणून त्याने माझा पासपोर्ट देण्याचे नाकारले होते. क्रमश: