नशीब त्यांचे - भाग १९

प्रौढ इंग्रज बिस्किट प्रकल्पाचा वीज दुरुस्तीवाला ( इलेक्ट्रिशियन ) होता त्याला इलेक्ट्रॉनिक्सची फारच कमी माहिती होती. परंतु ३५ वर्षाचा ह्याच बिस्किट प्रकल्पाचा ब्रिटन मधला अनुभव होता, दुरुस्ती कामाचा तितकाच त्रास देण्याचा देखील. मला वीज दुरुस्तीची फारच कमी माहिती आहे अशी कबुली देत, झाडावर चढवत, त्याच्याशी मी मैत्री केली, जेणे करून त्याचा माझ्या कामात त्रास कमी होईल. मुंबईत बसून मुलाखतीत एका पट्ट्याची मोटर जळली नसल्याचे सांगणारा मीच होतो, हे कळल्या पासून त्याला माझ्या अनुभवाची थोडी फार कल्पना होती. शिवाय एडी करंट कॉन्स्टंट टॉर्क योजना, जी यांत्रिक लाटणी, साचे यंत्र व जाळीदार पट्ट्यावर वापरात होती, मी त्याला सोप्या भाषेत समजवून सांगितली होती, म्हणून आमची मैत्री लवकर जमली.

त्याच्या कडून मला त्याच्या ३० पानी कराराची माहिती मिळाली, त्यातून मी बरेच काही शिकलो. भारतीय असण्याचे दु:ख मला त्या घटकेला प्रथमच जाणवले (रक्तदोष असावा).  त्याचे ह्या कंपनीशी कंत्राट ब्रिटिश सरकारी यंत्रणेतून झाले होते. मुलाखतीतून एकदा निवड झाल्यावर सरकारी प्रतिनिधी लंडनहून, इराणमधल्या दूतावासातून नाही, ह्या कंपनीच्या खर्चाने खोर्रामदार्रेहला दोन दिवस भेट देऊन गेला. नुसताच कंपनी परिसर नाही तर आजूबाजूचा परिसराची पाहणी केली. लंडनला परतल्यावर करारपत्र तयार झाले, ह्या कंपनीच्या स्वाक्षर्‍या झाल्या आणि मगच हा बाबा इथे येऊ शकला होता.

करारपत्राची प्रत त्याने मला दाखवली. "मी गीतेवर हात ठेवून खरं सांगतो की - हे एका भारतीयाने दुसर्‍या फक्त भारतीय विषयी शंका ह्या जन्मसिद्ध हक्काचे पालन करणार्‍यांच्या करता -"  असो - सात दिवसात कोणता व किती नाश्ता, दुपारच्या / रात्रीच्या जेवणात काय व किती असावे ह्याची यादी. राहती जागा कशी असावी, जागेत खुर्ची, टेबल, पलंग, गादी, उशी, चादरी, ब्लॅन्केट, टॉवेल, साबण, शांपू सगळ्याची यादी. कामाचे तास, ३० दिवसाचा २५,००० पगार. स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, ठरलेल्या वेळेनंतर दर तासाच्या पगाराच्या दीडपट हिशेबाने वेगळा मोबदला. महिन्यातून एकदा दोन रात्री व दिवस तेहरानला पंचतारांकित हॉटेल मध्ये कंपनी खर्चाने वास्तव्य, त्या करता चालकासोबत गाडीने येणे जाणे. ९० दिवसा नंतर १५ दिवसाची पगारी सुट्टी व तेहरान - लंडन परतीचे तिकीट, प्रवास विम्यासहित. मला पुढची अक्षरे दिसेनाशी झाली. माझ्या तोंडाकडे बघून तो चकीत झाला होता. माझे एकपानी करारपत्र ऐकून त्याला धक्काच बसला होता. कारण तो भारतीय नव्हता, एक इंग्रज कामगार होता.

असे काही भारतीय सरकारी यंत्रणेतून घडू शकेल असा विचार करणे गुन्हा ठरेल अशी परिस्थिती आहे. पुढील ५० पिढ्या असे करारपत्र न घडण्या करता तन मन धनाने प्रयत्न करतील ह्याची मला खात्री आहे.असो, दोन महिन्याने त्या इंग्रजाचा करार संपला. माझ्या कामाचे समीक्षण झाले पगार दुप्पट झाला, तुम्हीच बघा त्या इंग्रजाच्या तुलनेत किती पटीने कमी होता. इंग्रजाला परतीचे तिकीट दिले गेले. जाताना तो रडला, माझ्या कडून, मोफत असूनही, इलेक्ट्रॉनिक्स शिकणे सोडून माझ्याशी फक्त दुश्मनी केली, ह्याचे त्याला दु:ख होते. - भेटू भाग - २०.