मराठी विरुद्ध तमिळ

इथे तमिळ मुली भरपूर आहेत आणि त्यांच्याशी बरंच छान जमवूनही घेता येतंय मला आणि म्हणूनच की काय पण खूप तमिळ मैत्रिणी इथेही झाल्या आहेत आता. मराठी-तमिळ शिकण‌शिकवणं अगदी मजेत चाललेलं असताना कुठे, कशी आणि कोणती माशी शिंकली माहित नाही, पण सॉल्लिड भांडण झालं आहे आमच्यात आता. कारणच तसं आहे..

"वेधा ( माझ्या नावाचा त्यांच्या बोलण्यातून झालेला अपभ्रंश ! ), तमिळ मिगच्चिरन्द मोळि । मराठी अन्द अळक सिरन्द मोळि इल्ल । " !!!!! ( तमिळ खूपच अप्रतिम भाषा आहे. मराठीत त्यामानाने काहीच अप्रतिम नाही. )
"तमिळ अप्रतिम मान्य पण म्हणून मराठी अप्रतिम नाही? !!! अरे, कोण आहे रे तिकडे? मुसक्या बांधा या सर्वांच्या आणि अंधार कोठडीत नेऊन डांबा तर..."

अशी सुरूवात झाली भांडणाला आणि ती इतकी पराकोटीला पोहोचली आहे की मैत्री बाजुला ठेवून आम्ही आता बाह्या सरसावून आमनेसामने उभ्या आहोत ! त्या त्यांच्या तमिळमध्ये काय आहे ते सांगणार तर आम्ही त्याच्या तोडीस तोड/त्याहून सरस  मराठीत काय आहे ते सांगणार आहोत. अगदी भक्तीगीत/भावगीत, प्रणयगीतांपासून ते विरह / विरक्ती गीतापर्यंत, शास्त्रीय संगीतापासून ते आधुनिक संगीतापर्यंत, जाहिरातींपासून ते चित्रपटांपर्यंत, ..., हिरोहिरोईन-व्हीलन्स.. इतकंच काय अगदी पाकक्रिया सुद्धा उतरणार आहेत या भांडणात.. अशा विविध स्तरांवर हल्ले होणार आहेत एकमेकांवर. देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल मे है....

आम्हां मुलींमधला हा जंगी मुकाबला २६ जानेवारीला होणार आहे. मराठीवर पूर्ण विश्वास तर आहेच माझा, तो फक्त सबळ पुराव्याने सिद्ध करून दाखवायचा आहे. तुम्हा सर्वांचा आशिर्वाद आहे, हे गृहित धरलेलं आहेच मी. दोन्ही गटांची जोरदार तयारी चालू आहे. मला तयारीत काही अडचण आल्यास तुम्ही मदत करालच हा विश्वास वाटतो, कराल ना मदत?