मुंबईला विळखा परप्रांतीयांचा

महाराष्ट्र दिनानिमित्त मटा मध्ये आलेला विशेष लेख. माहितीसाठी आणि चर्चेसाठी इथे देत आहे.

मटामधील मूळ लेख : मुंबईला विळखा परप्रांतीयांचा

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला आज 46 वर्षे झाली, मुंबई महाराष्ट्रात राहावी, यासाठी 105 हुताम्यांनी रक्त सांडले. आज मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईत महाराष्ट्र कोठे आहे, असा प्रश्न मराठी माणसाला भेडसावत आहे. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात मराठीचा टक्का मात्र कमालीचा घसरला आहे. 1 कोटी 30 लाख लोकसंख्येच्या मुंबईत 28 ते 30 लाखाच्या आसपास मराठी असावेत. याचा दुसरा अर्थ मुंबईत परप्रांतीयांची संख्या 1 कोटीच्या घरात पोचली आहे. मुंबईतील परप्रांतीयांच्या धबडग्यात मराठी माणसाची घुसमट होत आहे.


मुंबईवरील परप्रांतीयांच्या लोंढ्यांचा धोका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फार पूवीर् ओळखला. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि मुंबईतील मराठी माणसाने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले. मुंबई महापालिकेची सत्ता दिली आणि मंत्रालयावर भगवा फडकतानाही मुंबईतील मराठी माणसानेच शिवसेनेला ( युतीला ) मोठी साथ दिली. मुंबईवर गेली 25-30 वर्षे सातत्याने आदळणारा परप्रांतीयांचा लोंढा काँग्रेसने कधी रोखला नाही. पण पाच वर्षांसाठी सत्तेवर असलेल्या शिवसेना- भाजपलाही परप्रांतीयांचे लोंढे थोपवता आले नाहीत.


मंत्रालय, महापालिका, पोलिस आणि प्रशासनात बहुसंख्य कर्मचारी मराठी असताना मुंबईत परप्रांतीयांची संख्या फुगली कशी या प्रश्नाचे उत्तर मराठी माणसालाच द्यावे लागेल.


परप्रांतीयांचे लोंढे रोखण्याची राज्यर्कत्यांकडे इच्छाशक्ती नाही हे स्पष्टच आहे. झोपडपट्ट्या आणि परप्रांतीय यांच्याकडे राजकीय पक्ष व्होट बँक म्हणून पाहतात. रेशनिंग ऑफिसमधे मराठी कर्मचारी असूनही परप्रांतीयांना रेशन कार्ड मिळवण्यात अडचण पडत नाही. मुंबईतील बहुंसख्य रिक्षाचालक उत्तर भारतीय आहेत. मुंबईचे रस्ते ठाऊक नसूनही त्यांना सहज लायसन्स मिळते. ते देणारे आरटीओमधील अधिकारी मराठीच. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील आणि विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था पूर्वी मुंबई पोलिसांकडेच होती. तीही आता केंदाच्या सुरक्षा दलाकडे आणि ते सर्व कर्मचारी-अधिकारी अमराठी. त्यांचा मराठी मातीशी आणि मुंबईशी सुतराम संबंध नसल्याने ते स्थानिक मुंबईकरांशी कसे परकेपणाने व अरेरावीने वागतात त्याचा अनुभव वारंवार येतो.


पोलिस दलात मराठी वर्चस्व. पण आयपीएसची पॉवरफुल लॉबी नॉनमराठी. वाकोल्यात मराठी आणि उत्तर भारतीयांमध्ये संघर्ष झाला, तेव्हा पोलिसांनी परप्रांतीयांची बाजू घेतल्याचा आरोप झाला. बस वा लोकलमधून प्रवास करताना परप्रांतीयांच्या खचाखच गर्दीतून मराठी माणसाला वाट काढावी लागते. महापालिका वा सरकारी हॉस्पिटलातील सवलतीच्या उपचारांचा लाभ घेणारे अमराठीच अधिक असतात. सरकारी सवलती मिळवून उभारलेल्या मराठी राजकारण्यांच्या खाजगी शिक्षणसंस्थांत परप्रांतीयांना सहज प्रवेश मिळतो. या शहरात मराठी भाषेत बोलणारे लोक अपवादानेच दिसतात.


रेल्वे स्टेशनच्या बाहेर रस्ता अडवणारे विक्रेते कोण आहेत, दूध, मासे आणि आंब्याच्या पेट्या घेऊन गल्लोगल्ली फिरणारे कोण असतात, बारबालांपासून ते फेरीवाल्यांपर्यंत किंवा भिकाऱ्यांपासून ते गुन्हेगारांपर्यंत मुक्तपणे वावरणारे कोण आहेत, याचे उत्तर सर्वांना रोज अनुभवातूनच मिळत आहे. परप्रांतीयांनी गर्दीच नव्हे तर मुंबई बकाल केली आहे, हे कटु सत्य आहे.


मिठी, दहिसर, पोयसर या नद्या किंवा उपनगरातील नाल्यांवर अतिक्रमणे करणारे कोण आहेत, एसआरए योजना राबवताना कोणाला दूर फेकले जात आहे आणि त्या जागी उभ्या राहणाऱ्या उत्तुंग उमारतीतीतील फ्लॅटमधे कोण राहायला येत आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरेही मराठी माणसाला ठाऊक आहेत.


एक कोटी परप्रांतीयांना सामावून घेणाऱ्या मुंबईला 26 जुलै 2005 च्या जलप्रलयानंतर एकाही राज्याने मदत पाठवली नाही. केंदाला 70 हजार कोटी रूपयांचा महसूल देणाऱ्या मुंबईत महाराष्ट्र शोधावा लागत आहे. पण व्होट बँकेचा विचार करणाऱ्या राजकीय पक्षांना ना खेद ना खंत अशी स्थिती आहे.


.............................


सारेच कसे अमराठी?


मुख्य सचिव : डॉ. डी. के. शंकरन


अप्पर मुख्य सचिव : नवीन कुमार


मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव : सुभाष लाला


पोलिस महासंचालक : पी. एस. पसरिचा


मुंबई महापालिका आयुक्त : जॉनी जोसेफ


मुंबई पोलिस आयुक्त : अनामी रॉय


निवडणूक आयुक्त : नंदलाल


मुख्य निवडणूक अधिकारी : यू. पी. एस. मदान


एसआरए सीईओ : देबाशीष चक्रवर्ती


एमएमआरडीए जॉइंट कमिशनर : टी. चंदशेखर


मुंबई दूरदर्शन संचालक : मुकेश शर्मा


मुंबई फायर ब्रिगेड चीफ : ए. डी. झंडवाल


मुंबई आकाशवाणी संचालक : सतीश सोनकर


एमटीएनएलचे कार्यकारी संचालक : एम. एस. राणा


बेस्ट जनरल मॅनेजर : स्वाधीन क्षत्रिय


सिडको मॅनेजिंग डायरेक्टर : अशोक सिन्हा


सेंट्रल रेल्वे जनरल मॅनेजर : व्ही. के. कौल


वेस्टर्न रेल्वे जनरल मॅनेजर : राजकमल राव


मुंबई वेधशाळा संचालक : डॉ. वीर भदम


ठाण्याचे पोलिस आयुक्त : डी. शिवानंदन


ठाणे महापालिका आयुक्त : संजय सेठी