मि. ईस्टवूडचे साहस

सौरभ पांडकर

(पृष्ठ ३)

"वेल.... काही नाही. एवढंच! हा माझा फोन फोन नंबर, नॉर्थ वेस्टर्न १७४३. आणि परत राँग नंबर लागणार नाही याची काळजी घे!"

तिने अगदी प्रेमानं त्याच्याकडे पाहिलं. एकाचवेळी तिच्या डोळ्यात पाणी तर ओठांवर हसू दिसत होतं.

"मी तुला कधीच विसरणार नाही... खरंच रे! कधीच विसरणार नाही."

"असू दे. चल, मी येतो आता. मला वाटतं..... "

"काय?"

"अजून एकाने काहीच फरक पडणार नाही, नाही का? "

ती पुन्हा एकदा त्याच्या मिठीत शिरली. क्षणभरच तिचे ओठ त्याच्या ओठांवर टेकले.

"मला तू खूप आवडतोस रे! आणि काहीही झालं तरी तू सुद्धा मला कधीच विसरणार नाहीस, हो ना?"

अँथनीने निग्रहाने तिला बाजूला केलं नि तो पोलिसांबरोबर जायला निघाला.

"मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. आणि मला वाटतं या तरूण स्त्रीला तर तुम्हाला अटक करायची नाहीये, हो ना?"

"नाही सर. त्याची काही आवश्यकता नाही."

"या सौजन्याबद्दल तरी स्कॉटलंड यार्डचं कौतुक केलं पाहिजे!" असं मनात म्हणतच अँथनीने जिना उतरायला सुरुवात केली.

खाली काचेच्या दुकानात मात्र, मघाची ती म्हातारी बिलकूल दिसत नव्हती. क्षणभरच अँथनीला मागच्या दरवाजामागे काही हालचाल जाणवली. कदाचित दारामागे उभं राहूनच ती काय घडतंय ते पाहत असावी.

पुन्हा एकदा कर्क स्ट्रीटच्या अस्ताव्यस्त पसार्‍यात आल्यावर अँथनीने एक दीर्घ श्वास घेतला नि दोघांमधल्या बुटक्या ऑफिसरशी बोलायला सुरुवात केली.

"आता काय इन्स्पेक्टर....? मला वाटतं इन्स्पेक्टर हाच तुमचा हुद्दा आहे, हो ना?"

"होय सर. हेर-इन्स्पेक्टर वेरॉल. आणि हा, हेर-सार्जंट कार्टर."

"हे बघा इन्स्पेक्टर वेरॉल. मला वाटतं आता खरं काय ते सांगायची वेळ आली आहे. आणि त्याप्रमाणे वागायची देखील! मी काही हा कॉनरॅड.. काय बरं त्याचं नाव? ... नाही. तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे माझं नाव अँथनी ईस्टवूड आहे आणि पेशाने मी एक लेखक आहे. आणि आता जर माझ्याबरोबर माझ्या फ्लॅटवर येण्याची कृपा तुम्ही केलीत तर तुमचं समाधान होण्या‌इतपत माझी ओळख मी पटवून दे‌ऊ शकेन."

दुसरं काही नाही तरी ज्या तर्‍हेने अँथनीने वस्तुस्थिती सांगितली त्यावरून त्या दोघांनाही त्याचं म्हणणं जरा पटल्यासारखं दिसलं. इन्स्पेक्टर वेरॉललाही थोडी शंका वाटू लागली होती मात्र सार्जंट कार्टर काही हार मानण्यास तयार नव्हता.

"खरं काय ते कळेलच पण ती स्त्री देखील तुम्हाला कॉनरॅड म्हणूनच हाक मारीत होती हे तुमच्या लक्षात असेलच!" कार्टर हेटाळणीच्या सुरात म्हणाला.

"अच्छा, ते होय? मी हे नक्कीच मान्य करेन की मी तिच्या घरी कॉनरॅड नावाची व्यक्ती म्हणूनच गेलो होतो, मात्र ती माझी एक खाजगी बाब आहे."

"एक बनाव! नाही का?" कार्टर म्हणाला. "मात्र काही झालं तरी तुम्हाला आमच्या बरोबर यावंच लागेल. ती टॅक्सी थांबव जो!"

लवकरच एक टॅक्सी थांबवण्यात आली आणि तिघेही आत शिरले. अँथनीने एक शेवटचा प्रयत्न केला आणि त्यातल्या त्यात समजूतदार अशा इन्स्पेक्टर वेरॉलशी बोलायला सुरुवात केली.

"हे बघा इन्स्पेक्टर, माझ्या फ्लॅटवर तुम्ही आलात आणि मी खरं सांगतो आहे की नाही याची खात्री केलीत तर तुम्हाला असा काय तोटा होणार आहे? वाटलं तर आपण टॅक्सी थांबवून ठेवू. पाच मिनिटंसुद्धा लागणार नाहीत."

वेरॉलने त्याच्याकडे शोधक नजरेनं पाहिलं.

"ठीक आहे तर, " तो अचानक म्हणाला. "विचित्र वाटलं तरी मला वाटतं, तू खरं बोलत आहेस. त्याचबरोबर चुकीच्या माणसाला पकडून ने‌ऊन, पोलिस ठाण्यात आम्हाला स्वत:चं हसं करून घ्यायचं नाहीये. तुझा पत्ता काय आहे? "

"४८ ब्रँडनबर्ग मॅन्शन. "

वेरॉलने डोकं पुढे केलं आणि ओरडून टॅक्सी ड्रायव्हरला पत्ता सांगितला. त्यांचं ठिकाण ये‌ईपर्यंत ते तसेच शांतपणे बसून होते. ठिकाण येताच कार्टरने गाडीबाहेर उडी घेतली नि वेरॉलने अँथनीला त्याच्या मागून येण्यास खुणावले.

"हे बघ, उगाच देखावा करण्याची काही गरज नाहीये. आपण सहजच आल्यासारखे आत जा‌ऊया. जणू काही अँथनी त्याचे काही मित्र घरी घे‌ऊन आला आहे."

अँथनीला या सूचनेनं खूपच हायसं वाटलं आणि एकंदरीतच गुन्हे अन्वेषण खात्याबद्दलचं त्याचं मत सुधारण्यास बराच हातभार लागला. पुढे वाटेतच त्यांना रॉजर भेटला. इमारतीत राहणार्‍या लोकांची हरप्रकारची कामे करण्यासाठी त्याला नेमण्यात आले होते.

"गुड इव्हिनिंग रॉजर" ऍंथनी उद्गारला.

"गुड इव्हिनिंग मि. ईस्टवूड! " तो आदराने म्हणाला. सर्व भाडेकरूंमधल्या ह्या स्वतंत्र वृत्तीच्या ईस्टवूडशी त्याचे नेहमीच पटत असे.

एक पाय जिन्यात ठे‌ऊन अँथनी क्षणभर उभा राहिला नि सहजपणे म्हणाला,

"बरं रॉजर, मला एक गोष्ट सांग, मी या ठिकाणी किती दिवस राहत आहे? आताच काही वेळापूर्वी माझ्या या दोन मित्रांशी मी या बाबतीत चर्चा करत होतो."

"अं, एक मिनिट सर.... मला वाटतं आता जवळजवळ चार वर्षं होत आली असावीत."

"अगदी मी म्हटल्याप्रमाणे!"

अँथनीने दोघांकडेही एक विजयी दृष्टिक्षेप टाकला. कार्टर कुरकुरला, वेरॉलच्या चेहर्‍यावर मात्र स्मिताची एक रेषा चमकून गेली.

"ठीक आहे सर पण समाधान होण्या‌इतपत ठीक नाही म्हणता येणार. मला वाटतं आपण वर जा‌ऊया."

वर जा‌ऊन अँथनीने आपल्या लॅच कीने फ्लॅट उघडला. त्याचं घरकाम करणारा सीमार्क घरी नव्हता ही त्यातल्या त्यात एक जमेची गोष्ट होती. नाहीतरी कमीत कमी लोकांना या प्रकरणाबद्दल कळेल तेवढं बरं होतं.

टा‌ईपरायटर अजूनही सकाळच्याच जागी पडला होता. कार्टर टेबलापाशी गेला आणि त्या कागदावरचं शीर्षक त्यानं वाचलं. ’दुसर्‍या काकडीचे रहस्य’ हळू आवाजात तो उद्गारला.

"मी एक कथा लिहतोय." अँथनीने थंड आवाजात सांगितलं.

"हा अजून एक चांगला मुद्दा आहे सर," वेरॉल खिजवत म्हणाला. "पण मला एक सांगा, ’दुसर्‍या काकडीचे रहस्य’ हा नक्की काय प्रकार आहे? "

"तोच तर सगळा वैताग आहे ना. या सगळ्या प्रकरणाला ही कथाच कारणीभूत आहे."

कार्टर आता अँथनीकडे बारका‌ईने पाहू लागला. त्याने डोकं हलवलं आणि कपाळावर हात मारून घेतला.

"गरीब बिचारा! त्याच्या डोक्यावर नक्कीच काहीतरी परिणाम झालाय." तो हळूच पुटपुटला.

"सभ्य गृहस्थांनो, आता जरा मुद्द्याकडे वळूया का? ही बघा माझ्या नावाने आलेली पत्रं, माझं बँकबुक आणि संपादकांशी केलेला हा पत्रव्यवहार. तुम्हाला अजून काय पुरावा पाहिजे आहे?"

अँथनीने दिलेली कागदपत्रं वेरॉलने तपासून पाहिली.

"माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझं समाधान झालं आहे. अजून कशाची आवश्यकता नाहीये. पण केवळ माझ्या जबाबदारीवर तुला मोकळं करता येणार नाही. असं दिसतंय खरं की मि. ईस्टवूड या नावाने तू इथे राहत आहेस पण तरीदेखील कॉनरॅड फ्लेकमन आणि अँथनी इस्टवूड ह्या दोन्ही एकच व्यक्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही झालं तरी तुझ्या फ्लॅटची तपशीलवार तपासणी, तुझ्या बोटांचे ठसे आणि मुख्यालयाला एक फोन या गोष्टी मला कराव्याच लागणार आहेत."

"हा तुमचा एक बराच वेळखाऊ कार्यक्रम दिसतो आहे." अँथनी म्हणाला. "तरीदेखील माझ्याबद्दल जी काही गौप्य माहिती असेल ती तपासण्यास माझी परवानगी आहे."

इन्स्पेक्टरच्या चेहर्‍यावर आता हास्य पसरलं. हेर असूनही नि:संशय तो एक चांगला माणूस होता.

"मी इकडे माझं काम करेपर्यंत तुम्ही कार्टर बरोबर जरा त्या खोलीत बसाल का सर? "

"ठीक आहे" अँथनी अनिच्छेने म्हणाला. "पण याच्यात थोडा बदल करता येणार नाही का?"

"म्हणजे?"

"आपण जरा छानपैकी व्हिस्की, सोडा वगैरे घे‌ऊन त्या खोलीत बसू, तोवर आपला मित्र कार्टर झडती घ्यायचं काम करेल."

"तुम्ही म्हणाल तसं सर..... "

"मग असंच करुया!"

लवकरच एखाद्या मुरलेल्या अधिकार्‍याप्रमाणे कार्टरने खोलीची तपासणी करायला सुरुवात केली. दोघंजण शेवटच्या खोलीकडे निघताच त्याने फोन उचलला आणि मुख्यालयाचा नंबर फिरवायला सुरुवात केली.

"हा प्रकार एवढाही काही वा‌ईट नाहीये" आरामशीरपणे व्हिस्की, सोडा वगैरे आपल्या बाजूला मांडत, इन्स्पेक्टर वेरॉलची जमेल तेवढी सरबरा‌ई करत अँथनी म्हणाला.

"तुम्हाला हवं असेल तर आधी मी व्हिस्की पितो, जेणेकरून तिच्यात विष टाकलं नसल्याची तुमची खात्री हो‌ईल."

परत एकदा इन्स्पेक्टरच्या चेहर्‍यावर हसू उमटलं.