प्रा. प्र. ना परांजपे : एक संवाद

अंकसमिती

प्रा. प्र. ना. परांजपे

शुद्धलेखनाविषयी जागरूकता, मराठी प्रतिशब्द निर्मिती व त्यांचा उपयोग, तसेच मराठीचा प्रचार ही मनोगत आणि मनोगतींची काही वैशिष्ट्ये आहेत. या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे एक नाव म्हणजे प्रा. प्र. ना. परांजपे.  प्र. ना. परांजपे यांनी पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुखपद भूषविले आहे. मराठीचा सर्वांगीण विकास करणे; लोकव्यवहार आणि ज्ञानव्यवहारामध्ये मराठीचा वापर वाढविणे; तसेच मराठी लोकांच्या भाषिक गरजा पुरविणे ही उद्दिष्टे समोर ठेवून स्थापन झालेल्या 'मराठी अभ्यास परिषद' ह्या संस्थेचे ते अध्यक्ष; तसेच संस्थापक सदस्य आहेत. मराठी अभ्यास परिषदेतर्फे प्रकाशित होणार्‍या 'भाषा आणि जीवन' ह्या त्रैमासिकाचे ते प्रमुख संपादक आहेत. त्यांची अनुवाद, कथालेखन आणि संपादनपर पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. 'कविता दशकाची', 'कविता विसाव्या शतकाची' ह्या संपादित प्रकल्पांचे ते संयोजक होते. प्र. ना. परांजपे यांच्याशी दिवाळी अंकाच्या निमित्ताने दूरध्वनीद्वारे साधलेला हा संवाद मनोगतींना रोचक आणि उद्बोधक वाटेल ह्यात शंका नाही.

 

१. विविध वृत्तवाहिन्यांवरील इंग्रजीचा वाढता वापर पाहता व याच भाषेतून ज्ञान व माहिती घेणारी नवी मराठी पिढी पाहता मराठीचे मराठीपण टिकवण्यासाठी काय करावे लागेल?
विविध वृत्तवाहिन्या, चित्रपट आणि मालिका यामधील मराठीकडे संदर्भ म्हणून किंवा त्यापासून इतरांनी शिक्षण घेण्यास योग्य असे मराठी म्हणून बघू नये याची जाणीव लोकांना व्हायला हवी. पण या माध्यमांचा वाढता प्रभाव बघता, या वाहिन्यातून चांगल्या मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा असे वाटत असेल तर त्याकरता प्रथम लोकांची तशी मागणी असावी. सध्या यामध्ये लेखन करणारे मुख्यत: इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले तरूण तरूणी अधिक आहेत. कारण तिथे लागणारा 'स्मार्टनेस' हा फक्त इंग्रजी माध्यमानेच येतो असे लोकांनी गृहीत धरले आहे. त्यामुळे त्यांची मातृभाषा मराठी असली तरी तिचे पुरेसे शिक्षण त्यांनी घेतलेले नसते. लोकांना काय हवे आणि काय आवडेल या तर्कांवर आणि अनेक इतर मुद्द्यांच्या आधारे हे लेखन आणि वाहिन्यांचे प्रक्षेपण सुरू असते. कारण त्यांचा मुख्य हेतू करमणूक हाच आहे. तेव्हा वाहिन्या किंवा इतर माध्यामातून सुरू असणार्‍या मराठीच्या अयोग्य वापराविषयी लोकांनी तक्रार करायलाच हवी. लोकांनी ते वारंवार कळवले तर संबंधित अधिकार्‍यां त्यावर उपाययोजना करणे भाग पडेल. या उपाययोजनेत वाहिन्यांकरता काम करणार्‍या सर्वांकरता मराठीचे वर्ग घेण्यात यावे हा पहिला पर्याय आहे.

२. आपले लेखन 'शुद्ध' नाही, हेही अनेकांना माहीत नसते. तसे विचारल्यास 'ऱ्हस्व'चे 'दीर्घ' आणि 'दीर्घ'चे 'ऱ्हस्व' केल्यास काय फरक पडतो असेच विचारले जाते, अशा पिढीला मराठी कसे शिकवावे?
शालेय अभ्यासक्रमातून आपण पुरेसे शिक्षण देऊ शकलो नाही त्याचा हा परिणाम आहे. बोलीभाषा, प्रमाणित भाषा आणि शुद्धलेखन यांचा परस्परसंबंध लोकांना कळलेला नाही. असे का झाले त्याची कारणे अनेक आहेत आणि त्यामागे इतर अनेक गोष्टी आहेत. पण त्याविषयी बोलण्यापेक्षा आता पुन्हा मराठीचे शिक्षण देणे हाच एक उपाय त्यावर आहे. आधी चांगलं काय आहे आणि का आहे ते या पिढीला पटवून द्यायला हवे. चांगलं मराठी आणि प्रगल्भ मराठी अशा दोन्ही स्वरूपांच्या वर्गांची आखणी करायला हवी. त्यासाठी लोकांनी, संघटनांनी पुढे यायला हवे.

३. विशी-बाविशीतील तरुणांचे मराठी लेखन (वाक्यरचना, शुद्धलेखन किंवा नेमकी अभिव्यक्ती) सुधारण्यासाठीच्या उपाययोजना काय असू शकतात?
आधी सांगितले त्याप्रमाणे लोकजागृती आणि मराठीचे शिक्षण देणे हाच उपाय आहे. मराठी अभ्यास परिषदेसारख्या इतर काही संघटना पुढे याव्यात. बोलीभाषा/व्यावहारिक, आणि प्रगल्भ भाषा यांचा अभ्यासक्रम असावा. शालेय मराठी, पदवी मराठी आणि वाचकांच्या दृष्टीने सुलभ आणि प्रगल्भ मराठी अशा सर्व पातळ्यांवर मराठीचे वर्ग चालवावे. मराठी अभ्यास परिषदेने याचे वर्ग काढण्याचा विचार केला होता, पण विद्यार्थी मिळणे, जागा मिळणे, मनुष्यबळ मिळणे आणि होणारा खर्च - अशा अनेक अडचणी त्यात आल्या. पण या प्रश्नाचे महत्त्व पटले तर लोकजागृती, संघटनांचा सहभाग आणि सरकारी मदत याने यातून मार्ग नक्की निघेल.

४. वृत्तपत्रातील मराठी ही (शुद्धलेखन, वाक्यरचना, शैली) साधी-सोपी सुगम राहिलेली नाही. व्यवहारातही मी तिची मदत केली, तिने मला खाली दाखविले अशी हिंदीच्या प्रभावाखालील वाक्यरचना सर्रास केली जाते. इतर भाषेतले शब्द अधिकाकाधिक वापरले जातात. असा इतर भाषेचा प्रभाव असणारे मराठी टाळावे का? टाळता येईल का? आणि कसे?
आज भारतात लोकांना किमान तीन भाषा तरी येत असतात. अशा वेळी मोठ्या शहरातून भाषांची सरमिसळ टाळणे अवघड आहे. शहरातूनच काय खेड्यातूनही ती टाळता येणार नाही अशीच परिस्थिती आहे. भाषा प्रवाही असते आणि म्हणून टिकून राहाते. तेव्हा अशी सरमिसळ होणे (कोड स्विचिंग) नैसर्गिक आहे. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत. मराठीचा वापरच कमी होईल अशीही भीती व्यक्त होते आहे. पण हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा प्रभाव असणारी वाक्यरचना केली म्हणून मराठी भाषेला धोका निर्माण होईल असे मला तरी वाटत नाही. भाषेच्या अभ्यासाविषयी लोकजागृती करणे हे महत्त्वाचे काम आहे. मराठीचे अध्यापन सुधारायला हवे. त्यामुळे अनेक प्रश्न सुटू शकतील. परभाषेतले शब्द मराठीत यायला काही हरकत नाही; अशाने भाषा समृद्धच होते. 'भाषा आणि जीवन' मध्ये एक पानपूरक होते. त्यात गावातील स्त्रिया एकमेकींशी बोलत होत्या असे दाखविले होते. त्यात एक स्त्री म्हणाली 'आम्हाला चहा देतात आणि त्यांना कोका कोले देतात.' शब्दांचे असे मराठीकरण आवश्यक आहे.

५. तरुण; तसेच काही 'जाणकार'ही म्हणतात की शुद्धलेखनाचे नियम शून्य असावेत. याला समाधानकारक उत्तर काय?
असे मत असणार्‍यां मी जाणकार मानत नाही. शुद्धलेखनाच्या नियमांशिवाय कोणत्याही भाषेचे अस्तित्त्व कसे असेल?

६. मराठी परिभाषा; विशेषतः सरकारी व समीक्षेचीही, एवढी बोजड का? साध्या-सोप्या मराठी भाषेत समीक्षा लिहिण्यास, सरकारी आदेश, परिपत्रके लिहिण्यास कुठली अडचण आहे?
साधे-सोपे मराठी ऐवजी आपण चांगले मराठी असे म्हणू या. तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मी दोन भागात देतो. प्रथम सरकारी भाषेकडे बघू या.
१९६० पासून राज्यकारभारात मराठीचा वापर सुरू झाला. पण तयार करण्यात आलेली परिपत्रके, एकंदर पत्रव्यवहाराची पद्धत यावर ब्रिटिश राजवटीचा प्रभाव दिसतो. त्यावेळी वापरलेली भाषा ही ग्रांथिक भाषा आहे. त्यावेळी ती तयार करण्यास मराठी भाषासल्लागार समिती होती. आता ती आहे नाही माहिती नाही. पण मला असे वाटते की दर दहा वर्षांनी नियमितपणे सरकारी पुस्तके, पत्रके, नियमावली यांत वापरले जाणारे शब्द, शब्दप्रयोग यांचे भाषासमितीकडून मूल्यमापन व्हावे. त्यामुळे व्यवहारात वापरली जाणारी मराठी त्यात दिसेल. तहसीलदार, आयएएस ऑफिसर्स, राजकारणी आणि मंत्री यासर्वांनी मराठीचा आग्रह धरावा. मला नक्की आठवते की वसंतदादा पाटील मराठीचा असा आग्रह धरत. महाराष्ट्रात काम करणार्‍या अमराठी व मराठी अशा दोन्ही सरकारी ऑफिसर्सना योग्य शिक्षण देण्यात येईल याची व्यवस्था करावी. मराठीचे वर्ग गरजेनुसार आखावे. पण हे सर्व करण्यास सरकारकडे इच्छाशक्ती नाही. सरकारी भाषा सोपी करा असे म्हणणे योग्य आहे.
आता दुसरा मुद्दा आहे समीक्षेची बोजड भाषा. मी म्हणेन की समीक्षेची भाषा क्लिष्ट आहे असा ग्रह करून घेण्यापेक्षा चित्रकला, शिल्पकला, तंत्रज्ञान या क्षेत्रांप्रमाणे समीक्षा हे सुद्धा एक स्पेशलाइज्ड क्षेत्र आहे आणि तिची वेगळी परिभाषा आहे हे ध्यानात असू द्यावे. आपल्या समीक्षेवर पाश्चात्त्य समीक्षेचा प्रभाव आहे. पण आपली भाषा जशी प्रगत होईल तसे नेमके पारिभाषिक शब्द निर्माण होतील. समीक्षेवर त्याचा परिणाम होईलच. पण ती भाषा ही पारिभाषिक भाषा आहे, तिचे हे वेगळेपण ध्यानात असू द्यावे म्हणजे बोलीभाषा, दैनंदिन व्यवहाराची भाषा आणि समीक्षेची भाषा यात गल्लत होणार नाही.

७. 'प्लेन इंग्लिश'च्या धर्तीवर 'साधी-सोपी मराठी'ची चळवळ का रूजत नाही? साध्या-सोप्या मराठीचा आग्रह लोकप्रिय का होत नाही? साध्या-सोप्या मराठीचा वापर कसा वाढवता येईल?
साधे सोपे पेक्षा आपण चांगले मराठी असे म्हणू या. मराठी शब्द वापरायचा हा निश्चय केला म्हणून परभाषेतल्या एखाद्या शब्दाकरता अवघड मराठी शब्द तयार करण्यापेक्षा सोपा प्रतिशब्द शोधणे अथवा त्या शब्दाचे मराठीकरण करून वापरणे याचा प्रचार व्हावा. कारण अर्थ समजणे, माहिती कळणे महत्त्वाचे आहे. मराठीत एकाच अर्थाच्या विविध छटा असणारे शब्द निर्माण करायला हवेत. उदाहरण द्यायचे झाले तर इंग्रजीमध्ये 'प्रेसिडेंट' आणि 'चेअरमन' असे दोन शब्द आहेत. पण मराठीत आपण 'अध्यक्ष' हाच शब्द वापरतो. 'प्रोफेसर', 'रीडर' आणि 'लेक्चरर' करता वेगळे शब्द मराठीत आहेत पण प्राध्यापक हाच शब्द जास्त रूळला आहे. दुसर्‍या भाषेतील शब्दांच्याप्रमाणे अर्थच्छटा दाखवणारे नेमके शब्द मराठीत निर्माण व्हायला हवेत. 'उत्तरवसाहतवाद' हा शब्द याच प्रयत्नातून निर्माण झाला आहे. पण असे शब्द नुसते निर्माण होऊन भागत नाही तर ते शब्द वापरात रूळणे हे जास्त आवश्यक आहे. त्याकरता मराठीचा पुरेसा परिचय, शिक्षण आणि वापर वाढायला हवा. ते जेव्हा होईल तेव्हा चांगले मराठी लोकप्रिय होईल. लोकजागृती, सरकार, लोकनेते, लेखक, प्रकाशक या सर्वांकडून मराठी बोलणे, लिहिणे, आणि मराठीचा आग्रह धरणे यादृष्टीने अधिकाधिक प्रयत्न व्हायला हवेत.