ज्योतिष- भविष्याच्या पाऊलखुणांचा मागोवा

प्रकाश घाटपांडे

ज्योतिष हे शास्त्र की थोतांड? व्यवसाय की कला? विरंगुळा की डोकेदुखी? गरज की चैन? भरवशाचे की बेभरवशी? उपयुक्त की उपद्रवी? तारक की मारक? अशा अनेक प्रश्नांची मालिका चालू होते. त्यांची उत्तरे ही व्यक्ती, समाज, काल, स्थल, मानसिकता यानुसार बदलत जातात. पोपटवाल्या ज्योतिषाकडे जाणारा गरीब सामान्य माणूस आणि astroconsultant कडे जाणारा उच्चविद्याविभूषित माणूस यांच्या मानसिकतेत फरक काय? भविष्यात काय घडणार आहे याची चिंता, उत्कंठा ही अनादि कालापासून चालत आलेली आहे. अनंत काळापर्यंत ती चालत रहाणार आहे. भविष्यात डोकावण्याचे वेगवेगळे मार्ग, पद्धती या माणसाच्या भौतिक विकासाबरोबर बदलत गेल्या. इंटरनेटवर ज्योतिषाचे दुकान मांडून बसलेले ज्योतिषी आणि पोपटवाला ज्योतिषी एकाच शहरात बघायला मिळतात. मार्ग कुठले का असेना, मुक्कामाचे ठिकाण तर एकच आहे ना! भविष्यात काय वाढून ठेवलयं? लोकसाहित्य, कला, संस्कृती यात याच्या पाउल खुणा उमटलेल्या दिसतात. बघूया थोडे त्या विषयी.

राजज्योतिषी
पूर्वी राजे राजवाड्यांच्या काळात दरबारी राजज्योतिषी असे. राजघराण्यातील लोकांच्या पत्रिका तयार करणे, पंचांग तयार करणे, वर्षफल सांगणे, राज्यावर शत्रुपीडा, अवर्षण, अतिवृष्टी, वादळ इत्यादी काही अरिष्ट येणार असल्यास त्याचे ज्योतिषाधारे ज्ञान प्राप्त करुन घेउन त्यावर काही तांत्रिक परिहारक उपाययोजना करणे, मुहूर्त पाहणे, ग्रहणाचे गणित करणे, शकून, स्वप्न आदिंचा अर्थ राजाला सांगणे अशी कामे राजज्योतिषी करीत असे. कालगणना करण्यासाठी घटिकापात्र व घंगाळ त्याच्या ताब्यात असे. घंगाळ म्हणजे पाण्याची साठवणूक करणारे एक विशिष्ट प्रकारचे मोठे भांडे. त्यात पाणी विशिष्ट पातळीपर्यंत भरले जाई. त्यात एक विशिष्ट आकाराचे छिद्र असलेले एक छोटे पात्र असे. त्याला घटिका पात्र म्हणत. त्यातून पाणी हळू हळू आत शिरत असे. ते पूर्ण भरले की बुडत असे. तेव्हा घटिका भरली असे म्हणत. त्यासाठी स्वतंत्र माणूस नेमला जाई. २४ तास म्हणजे ६० घटिका, १ तास म्हणजे २|| (अडीच) घटिका व एक मिनिट म्हणजे २|| पळे, एक सेकंद म्हणजे २|| विपळे. उज्जैन ला वेधशाळा होती. तेथे वालुकायंत्र, छायायंत्र अशी कालमापनाची विविध यंत्रे असत. जगभरात वेगवेगळ्या पद्धतीच्या कालगणना आहेत. इजिप्तमध्ये पिरॅमिडच्या टोकाची छाया कशी पडते यावरुन दिवस किती गेला व किती राहिला हे ठरवत असत. म्हणजे एक प्रकारचे छायायंत्रच झाले. युरोपमध्ये वेधशाळांच्या मदतीने ज्योतिषीलोक ग्रहगतीचा अभ्यास करीत असत व ग्रहणादिंविषयी भाकिते वर्तवीत असत. वेधशाळांना राजाश्रय असे. जोहानीज केपलर (इ.स. १५७१ -१६३०) या खगोलशास्त्रज्ञाला तत्कालीन परिस्थितीत फलज्योतिषावर उदरनिर्वाह चालवावा लागत असे. त्याला त्या परिस्थितीचा कमालीचा उबग आला होता. तो एके ठिकाणी म्हणतो, ''फलज्योतिष ही ज्योति:शास्त्राची ( म्हणजे खगोलशास्त्राची ) बदलौकिक कार्टी आहे, पण तिच्याविना तिची बिचारी आई (म्हणजे खगोलशास्त्र ) एका वेळच्या अन्नाला देखील महाग होते!" पुढे काही कालानंतर ज्योति:शास्त्राला खगोलशास्त्र असे नाव पडले आणि ज्योतिष हा शब्द फक्त 'फलज्योतिष या अर्थाने वापरला जाऊ लागला.

ग्रामजोशी
पूर्वी गावात भिक्षुकी करणाराच ज्योतिषीही असे. हा गावकीचा ज्योतिषी कम भिक्षुक कम धर्मशास्त्री. यांना ग्रामजोशी म्हणतात. खेडेगावात भिक्षुकी करणारा ब्राह्मण समाज 'वासरात लंगडी गाय शहाणी' या न्यायाने पंचांगाद्वारे लग्न, मुहुर्त, सत्यनारायण पूजा, अभिषेक, नावरास काढून देणे, धार्मिक कृत्यांचा व्यवहारपयोगी अन्वयार्थ काढून देणे इत्यादि कामे करत असतो. लोक त्याला त्या मोबदल्यात धान्य, भाजीपाला, दूध, पैसे इत्यादि देतात. ही एक प्रकारची बलुतेदारीच म्हणा ना! त्यावर त्याची गुजराण चालते. त्यामुळे पंचांग हे ज्योतिषी कम भिक्षुकाचे पोटापाण्याचे साधन बनले. कर्मसंकट आले की कायदेशीर कचाट्यातून पळवाटा शोधून मार्ग काढणारा वकील आणि धर्मसंकट आले की त्यावर धर्मशास्त्रीय तोडगा काढून सुटका करणारे धर्ममार्तंड एकाच प्रकारचे. संकटाचे उपद्रवमूल्य किती? यावर मोबदला ठरतो आणि मोबदला किती मिळणार यावर पळवाटा व तोडगे यातील अन्वयार्थ व फेरफार ठरतात. खेडेगावात मूल जन्माला आल्यावर अशा ग्राम जोशाकडून मुलाचे जन्म-नांव काढून घेत असत. ग्रामजोशी पंचांगातून त्या दिवशीचे नक्षत्र पाहून अवकहडा चक्रावरून नावाचे आद्याक्षर सांगत असे. चू, चे, चो, ला, ली, लू, डा, डी अशा अक्षरातून तो एखादे अक्षर सुचवत असे. मग त्या अक्षरावरून डामदेव, चोमदेव अशी निरर्थक नांवेसुद्धा जन्मनांव म्हणून ठेवली जात. किंबहुना, एखाद्या बाईचे मूल जगत नसेल तर निरर्थक वाटणारी नावेच जाणीवपूर्वक ठेवली जात. या पद्धतीमुळे जन्मतारीख किंवा जन्मवेळ कुठेही नोंदलेली नसली तरी जन्मनांव पक्के लक्षात रहात असल्यामुळे त्या नावावरून अवकहडा चक्रातून जन्मनक्षत्र व जन्मरास कोणती ते कळते. सोयरिक जुळवळण्याच्या वेळी यांचा सल्ला घेतला जातोच. हा संवाद पहा-
"काका येक काम हुतं."
"'बोला."
"सोयरीक जुळवायची हुती"
"काय नांव?"
"इसारले का काका? मी बाबू डोंगरा"
"अरे तुझ नाही! तुझ्या पोराचं." काका खेकसतात.
"खंडू."
"अन पोरीचं?"
"इंदी."
काका हातांच्या बोटांवरील पेरांवर अंगठयाने गणित करत सांगतात.
"नाही जमत."
"नाही जमत? कसं नाही जमत? अहो मामाचीच प्वार हाये. शिकल्याली बी हाये. आमचा ठोंब्या यव्हाराला लई कच्चा. म्हन्ल प्वार तरी जरा शिकल्याली करावी. श्येतात बी कामाला चांगली आहे. आजकाल येटाळन्यांना बी कुठं मान्स मिळत्यात. आपला घरचा मानुस असल्याला बरा. म्हनून म्हन्लं औन्दा द्यावा उडवून बार. बरं मंग जलमनावावरून नसंन जमत तर मंग चालू नांवावरून पघा. तिला अलका बी म्हन्त्यात. पघा पघा जरा बाडात. काही तरी तोडगा असनंच की."

काका परत पंचांगात बघतात व जुळत असल्याचे सांगतात. कारण बाबू डोंगऱ्याला तीच पोरगी सून म्हणून करायची आहे हे त्याने ताडलेले असते. राहिला फक्त जुळतंय की नाही हे बघण्याचा सोपस्कार. मग कशाला जुळत नाही म्हणून सांगा? शेवटी लग्न आपल्यालाच लावून द्यायचं आहे. काकांनी मुहूर्त काढून दिला की त्याचा उपयोग पत्रिका छापण्यासाठी काहीतरी दिनांक व वेळ द्यावी लागते म्हणून होतो. प्रत्यक्षात त्या मुहूर्तावर लग्न कधीच लागत नाहीत. प्रत्यक्ष लग्नाची वेळ व मुहूर्त यातील अंतर कितीही तासांचे असू शकते. मुलीच्या मामाने मुलीला घेउन यावे असे सतरावेळा लाउडस्पीकर वर सांगितल्यावर जमेल तशी ती बोहल्यावर उभी रहाते. मुहूर्त टळून गेल्याचा ना काकांना खेद ना व‍ऱ्हाडी लोकांना. शेवटी व‍ऱ्हाडी मंडळींच्या सोयीनेच लग्न लागते.