मराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत

अरुण फडके

मराठी शुद्धलेखनाच्या प्रचारार्थ गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेले श्री. अरुण फडके हे मुद्रितशोधक आणि व्याकरणतज्ज्ञ आहेत. मराठी लिहिताना शुद्धलेखनाची अडचण जाणवल्यास त्याचे त्वरित निराकरण व्हावे ह्या उद्देशाने त्यांनी इंग्रजी पॉकेट डिक्शनरीच्या धर्तीवर "शुद्धलेखन तुमच्या खिशात" ह्या खिशात मावणार्‍या पुस्तिकेची निर्मिती केली. ह्याव्यतिरिक्त, मो. रा. वाळिंबे लिखित 'मराठी शुद्धलेखन प्रदीप' ह्या पुस्तकाचे पुनर्लेखन आणि संपादन केलेली सुधारित आवृत्ती; 'मराठी शुद्धलेखनाच्या महत्त्वाच्या जागा' हे पुस्तक; तसेच 'मराठी लेखनकोश' ही त्यांची इतर प्रकाशित पुस्तके. मराठी साहित्य महामंडळाच्या लेखनविषयक नियमांची मांडणी त्यांनी केली आहे. सुमारे २३ वर्षे मुद्रणव्यवसायक्षेत्रात काम केलेल्या श्री. फडके ह्यांनी मुद्रितशोधनाच्या दृष्टीने मराठी लेखनाचा अभ्यास केला आहे. मराठी शुद्धलेखनाच्या प्रचारार्थ त्यांनी शाळा, महाविद्यालये व सरकारी कचेर्‍यांमध्ये व्याख्याने दिली व शुद्धलेखनाचे अभ्यासवर्ग घेतले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने तयार केलेल्या व सध्या प्रचलित असलेल्या मराठी व्याकरण व शुद्धलेखनविषयक नियमांतील त्रुटी दाखविणारा, तसेच उपाययोजना सुचविणारा लेख श्री. अरुण फडके ह्यांनी अंकसमितीच्या विनंतीला मान देऊन मनोगताच्या दिवाळी अंकासाठी दिला, ह्याबद्दल अंकसमिती त्यांचे आभार मानते.

सदर लेखातील नव्या नियमांबद्दल वाचकांनी त्यांची मते कृपया ह्या लेखाला प्रतिसादाच्या स्वरूपात अथवा श्री. अरुण फडके ह्यांना arunphadake@gmail.com ह्या पत्त्यावर विरोपाने पाठवावीत.

मराठी शुद्धलेखनाच्या बाबतीत आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती तशी होण्याची दोन महत्त्वाची कारणे मला दिसतात, ती अशी - १) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ह्या संस्थेने १९६२ आणि १९७२ ह्या दोन वर्षांत मिळून मराठी शुद्धलेखनाचे जे १८ नियम केले, ते करताना मराठीच्या प्रकृतीकडे नीट लक्ष दिले गेले नाही. तिची प्रकृती पाहण्याच्या धोरणात धरसोड झाली. २) हे नियम होऊन आज सुमारे ४५ वर्षे झाली. तरीही आजसुद्धा हे १८ नियम कोणत्याही पातळीवर शिकवण्याची सोय आपल्या शिक्षणपद्धतीत नाही. ह्या ४५ वर्षांत लक्षावधी शिक्षक तयार झाले आणि त्यांनी आजपर्यंत कोट्यवधी विद्यार्थ्यांना शिकवले. जी गोष्ट शिक्षकांनाच शिकवली गेलेली नाही, ती गोष्ट ते विद्यार्थ्यांना कशी शिकवू शकतील? ह्या नियमांचा योग्य तो प्रसार करण्याची सुरुवात वेळीच झाली असती, तर हे नियम शिकवताना, शिकवणारी व्यक्ती आणि शिकणारी व्यक्ती ह्या दोघांनाही येणार्‍या प्रामाणिक अडचणी कधीच लक्षात आल्या असत्या, आणि वेळीच उपाययोजना झाली असती. असो.

ह्या नियमांमधील सर्व त्रुटींविषयी सविस्तर लिहिणे जागेअभावी शक्य होणार नसल्यामुळे विशेषतः र्‍हस्व-दीर्घ ह्या बाबींच्या नियमांमधील काही त्रुटींचे विवेचन मी आता करणार आहे. परंतु त्यापूर्वी, र्‍हस्व-दीर्घाच्या सर्वच नियमांना लागू होणारा असा एक मुद्दा मला आधीच मांडायचा आहे, तो असा-

सर्वलागू मुद्दा
- नियम क्र.५, हा र्‍हस्व-दीर्घाचा पहिलाच नियम करताना तो 'मराठीची प्रकृती' पाहून केला गेल्याचा उल्लेख ह्या नियमात आहे. मात्र पुढे; सामासिक शब्द, साधित शब्द, शब्दातील उपान्त्य इकार व उकार, अनुस्वारयुक्त इकार व उकार, जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार, सामान्यरूपे ह्यांसंबंधीचे नियम करताना 'मराठीच्या प्रकृतीचा दृष्टिकोन' पूर्णपणे डावलला गेला आहे. सद्यःस्थितीत हे नियम बहुसंख्य लोकांना असमाधानकारक वाटण्याचे आणि लेखनात चुका होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. गेल्या सात वर्षांत मी मराठी शुद्धलेखनाचे १००पेक्षा अधिक वर्ग महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरांतील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी घेतले. त्यांतील प्रत्येक वर्गात नियमांमधील ह्याच बाबी; शिकवताना मला, आणि शिकताना प्रशिक्षणार्थींना; त्रासदायक वाटत होत्या, आजही वाटत आहेत, हे मी निश्चितपणाने सांगू शकतो. मराठीच्या नियमानुसार न चालणारा संस्कृत शब्द 'संस्कृतमधून मराठीत आला आहे, हे ओळखायचे कसे' ह्या प्रश्नाला आपल्याकडे काहीही उत्तर नाही. हे ओळखता न येणे, आणि तरीही तो मराठी शब्दाच्या लेखनापेक्षा वेगळ्या पद्धतीने लिहावा लागणे, हीच ह्या सर्वांमधील प्रमुख आणि प्रामाणिक अडचण आहे. पहिल्या नियमाप्रमाणेच इतर सर्व नियमांमध्येही 'मराठीची प्रकृती' तेव्हाच पाहिली गेली असती, तर प्रचलित नियम आज एवढे गैरसोईचे वाटले असते, असे मला वाटत नाही. असो. आता महामंडळाच्या काही असमाधानकारक नियमांचे सविस्तर आणि सोदाहरण विवेचन करतो-

नियम क्र.५चा उत्तरार्ध
- नियम क्र.५चा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध सांगताना मराठीच्या प्रकृतीची धरसोड झालेली दिसते. ह्या नियमाचा पूर्वार्ध असा आहे - मराठीतील तत्सम इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत. उदा.- कवी, मती, गुरू, वायू. इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा. उदा.- पाटी, विनंती, जादू, पैलू. व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे र्‍हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत. उत्तरार्धात मात्र ह्यासंबंधीच्या स्पष्टीकरणात पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो- सामासिक शब्दांमध्ये पूर्वपद असलेले संस्कृत शब्द मराठी भाषेने आत्मसात केल्यामुळे ते मराठीच्या प्रकृतीनुसार एरव्ही दीर्घान्त लिहावयाचे असले, तरी समासामध्ये मूळ स्वरूपात योजलेले असल्यामुळे ते र्‍हस्वान्तच लिहावेत. उदा.- कविमन, मतिमंद, गुरुदक्षिणा, वायुपुत्र. साधित शब्दांनाही हाच नियम लावावा. उदा.- बुद्धिमान, वायुरहित. संस्कृतमधून काही इन्‌-अन्त शब्द मराठीत येतात. त्यांच्या शेवटी असलेल्या 'न्‌'चा लोप होतो व उपान्त्य र्‍हस्व अक्षर दीर्घ होते. उदा.- गुणी, प्राणी. परंतु हे शब्द समासात पूर्वपदी आले असता ते र्‍हस्वान्तच ठेवावेत. उदा.- गुणिजन, प्राणिसंग्रह. संस्कृतमधून मराठीत आलेले किंवा घेतले गेलेले शब्द सुटे लिहिताना मराठीची प्रकृती पाहून ते दीर्घान्त लिहिण्याचा नियम केला गेला. मग मराठीत येताना मराठीच्या प्रकृतीप्रमाणे दीर्घान्त झालेल्या ह्या शब्दांच्या सामासिक वापराचा नियम करताना मराठीची सामासिक प्रकृती का पाहिली गेली नाही? 'खडी, वांगी, दही, भाऊ, माती, वाळू' हे शब्द मराठीत सुटे लिहिताना मराठीच्या प्रकृतीनुसार दीर्घान्त असतातच. परंतु 'खडीसाखर, वांगीपोहे (तत्पुरुष); दहीभात, भाऊबहीण (द्वंद्व); मातीमोल, वाळूवजा (बहुव्रीही)'; असे मराठीतील सामासिक शब्द पाहिल्यावर समासातील प्रथमपदासाठीही मराठीची प्रकृती दीर्घान्तच दिसत नाही का? अगदी 'उच्चारानुसारी', असे म्हटले तरी, मराठीतील सामासिक शब्द उच्चारताना पहिले पद दीर्घान्त, आणि संस्कृतमधील सामासिक शब्द उच्चारताना (तो संस्कृतमधील आहे हे माहीत नसूनसुद्धा) पहिले पद र्‍हस्वान्त, असा उच्चार मराठी माणसाकडून आपोआपच होत असतो, हे सिद्ध करता येईल का?

'इन्‌, मिन्‌ आणि विन्‌' ह्या तीन संस्कृत प्रत्ययांचे काही संस्कृत शब्द मराठीत विशिष्ट पद्धतीने येतात, ही मूलभूत गोष्ट आपण मराठीच्या पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोणत्याही पातळीवर शिकवत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे 'इनन्त' ही संज्ञासुद्धा बहुसंख्यांना माहीत नसते, मग त्यांना संस्कृतमधील इनन्त शब्द कुठून कळणार. ह्याचा ठोस पुरावा म्हणजे रोजची वर्तमानपत्रे. 'मंत्रिमंडळ' हा बरोबर छापला जाणारा एक शब्द सोडला, तर 'मंत्रीपद, मंत्रीपदी, मंत्रीवर्ग' असे सारे शब्द नेहमी चुकीचेच छापलेले दिसतात. कारण 'मंत्री' हा शब्द मूळ 'मंत्रिन्‌'पासून मराठीत आला आहे, हे त्यांना माहीतच नसते. 'अधिकारिवर्ग, कर्मचारिवर्ग, व्यापारिवर्ग' ह्या सामासिक शब्दांमधील 'रि' र्‍हस्वच असायला पाहिजे, हे सांगणारा तक्ता दाखवल्यावर संपूर्ण वर्ग आश्चर्यचकित झालेला असतो आणि माझ्याकडे संशयाने पाहत असतो. कारण 'अधिकारी, कर्मचारी, व्यापारी' हे शब्द मूळ 'अधिकारिन्‌, कर्मचारिन्‌, व्यापारिन्‌' अशा इनन्त शब्दांपासून आलेले आहेत, हे पदव्युत्तर शिक्षणाच्या वर्गात बहुसंख्य प्राध्यापकांनाही माहीत नसते.

जी गोष्ट सामासिक शब्दांची, तीच साधित शब्दांची. इथेही मराठीच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झालेले दिसते. 'जोडी, पैलू, गाडी, जादू, भाजी, दारू' हे शब्द मराठीत सुटे लिहिताना मराठीच्या प्रकृतीनुसार दीर्घान्त असतातच. परंतु 'जोडीदार, पैलूदार, गाडीवान, जादूगार, भाजीवाला, दारूवाला' असे मराठीतील प्रत्ययघटित साधित शब्द पाहिल्यावर साधित शब्दातील प्रथमपदासाठीही मराठीची प्रकृती दीर्घान्तच दिसत नाही का? त्यामुळे, सामासिक आणि साधित शब्द लिहितानाही ते मराठीच्या प्रकृतीनुसारच लिहिण्याची परवानगी देणारा बदल ह्या नियमात होणे गरजेचे आहे, असे वाटते.
ह्या नियमातील गोंधळाचा कहर म्हणजे ह्या नियमाचा शेवटचा भाग. हा पुढीलप्रमाणे आहे - मराठी शब्दकोशात मात्र तत्सम (र्‍हस्व) इकारान्त व उकारान्त शब्द र्‍हस्वान्त लिहिणे इष्ट ठरेल. जसे- पद्धति, अनुमति, प्रतिकृति, दृष्टि, अणु, वायु, हेतु वगैरे. परंतु असे शब्द कोशाबाहेर वापरताना दीर्घान्त लिहिले पाहिजेत. मुळात नियम गुंतागुंतीचा करायचा, त्यात तो कधीही शिकवायचा नाही, मग अडलेला माणूस साहजिक कोश बघणारच. कोशात त्याला हे शब्द र्‍हस्वान्त सापडतील, आणि मग नियमाच्या अज्ञानामुळे तो कोशात पाहून ते आपोआप र्‍हस्वान्त लिहील, अशी ही सारी परिस्थिती. जणू काही मराठीवर संस्कृतचा पगडा राहिलाच पाहिजे, हा हेतू मनात धरून मखलाशीने ही परिस्थिती तयार केली आहे, असे वाटावे, असा हा सारा गोंधळ आहे.

नियम क्र.६
- हा नियम असा आहे - मराठीमध्ये शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल, तर त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार व उकार र्‍हस्व असतो. मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. मुळात ह्या नियमाची भाषा चुकीची झाली आहे. हा नियम पुढीलप्रमाणे पाहिजे होता- मराठी शब्दाच्या शेवटच्या अक्षरातील स्वर दीर्घ असेल, तर त्याच्या उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार र्‍हस्व असतो. असो. उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार लिहिताना मराठीची प्रकृती कशी आहे, हे ह्या नियमात धडधडीत दिसत आहे. तरीही संस्कृतमधील शब्द मराठीत घेताना ती प्रकृती सांभाळलेली दिसत नाही. ह्या नियमामुळे तर फारच मोठी पंचाईत होते. कशी ते पाहा- नियम क्र.५चा पूर्वार्ध सांगतो की, मराठीतील तत्सम इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत. त्यामुळे 'नीति, भीति, प्रीति, रीति' ह्यांसारखे संस्कृत शब्द मराठीत 'नीती, भीती, प्रीती, रीती' असे लिहावे लागतात. नियम क्र.६ पाहिल्यावर असे वाटते की, हे शब्द आता 'निती, भिती, प्रिती, रिती' असे लिहायचे आहेत. पण हे शब्द संस्कृतमधून आल्यामुळे असे लिहता येत नाहीत. मात्र 'चिकी, तिघी, निळी, फिकी, मिरी, विटी, शिटी' ह्या मराठी शब्दांमध्ये अन्त्य अक्षरातील स्वर दीर्घ असल्यामुळे नियम क्र.६नुसार उपान्त्य अक्षराचा इकार र्‍हस्व आहे. हा सर्व गोंधळ 'समजावून सांगणे आणि समजून घेणे' फारच कठीण आणि गुंतागुंतीचे होते एवढे निश्चित.