ज्योतिष- भविष्याच्या पाऊलखुणांचा मागोवा

प्रकाश घाटपांडे

(पृष्ठ २)

पिंगळा
डमरुचा विशिष्ट प्रकारे आवाज करत पारंपरिक वेषात पहाटे सुर्योदयाच्या वेळी पारंपरिक गाणी, अभंग म्हणत जाणारा पिंगळा आता दुर्मिळ होत चालला आहे. वासुदेव, वाघ्या, नंदीबैलवाला, बहुरुपी, भुत्या, यांच्याच मालिकेतला हा पिंगळा. गळ्यात कवड्याची माळ, देवाचा टाक (चांदीच्या पत्र्यात कोरलेला छोटा देवाच्या चित्राचा ठसा), तबक, त्यात छोटी तसबीर, गळ्यात एक छोटी झोळी, धोतर किंवा हल्ली लेंगा असा हा पिंगळा सकाळी सकाळी एखाद्या घरात जाउन काही तरी बोलतो आणि ते खरं होतं! त्याच्या जीभेवर म्हणे काळा तीळ असतो. एखाद्या घराच्या अंगणात जाउन तो त्या घरातल्या माणसांच्या भवितव्याबद्द्ल काहीतरी विधान करतो. ते भविष्य म्हणून गणले जाते. त्याने काहीबाही अभद्र बोलू नये म्हणून घरातील वयस्कर स्त्रिया त्याला भरघोस शिधा, धान्य, पैसे देतात. मग तो खुश होऊन आशिर्वादपर वक्तव्य करतो. लोक त्याच्या पाया पडतात; म्हणजे त्याच्या गळ्यातल्या देवाच्या पाया पडतात. एखाद्या घरात कुणी फारशी दाद दिली नाही तर देव वाईट करेल अशी भीती घालतो. रामप्रहरी असे शिव्याशाप कुणाला नको असतात त्यामुळे काहीतरी पदरात पाडूनच तो पुढे जातो. रामप्रहर संपला की पिंगळा निष्प्रभ होतो. तो त्याच्या दैनंदिन उपेक्षित जीवनात गुरफटून जातो.

कुडमुडे जोशी
अहो तो 'तसला' जोशी नाही, कुडमुड्या आहे. आडनावांवरुन लोकांच्या मनात जातीची गणिते चालू होतात. कारण काही आडनाव झाशा देणारी असतात. हे जोशी त्यातलेच. पोपटवाले ज्योतिषी या कुडमुडे जोशी प्रकारात मोडतात. ही एक भटकी जमात आहे. काही पाकिट वा कार्ड स्वरुपाच्या चिट्ठ्या, पोपट व त्याचा पिंजरा, जुने; पिवळे पडलेले पंचांग, एक झोळी, हस्तरेषांच्या तसबिरी, एखादा देवाचा फोटो, एखाद्या संकट विमोचन यंत्राचा फोटो, निरीक्षणशक्ती व वाक्चातुर्य हे यांचे भांडवल. खेडेगावातील कनिष्ठ आर्थिक स्तरातील समाज हे यांचे भांडवल. घरात अंगडां-टोपडं बाजेवर वाळत घातलेल दिसत नाही, खेळणी दिसत नाहीत, नवरा बायकोचा फोटो तर दिसत आहे, घरात भांड्यांची आदळआपट दिसते आहे, काळी बाहुली टांगलेली दिसते आहे, घरातला पितळेचा तांब्या लख्ख घासलेला दिसत आहे की काळवंडलेला?, बाईचा अंबाडा चापुनचोपून बांधला आहे की सैल?, बाईचा कासोटा घट्ट आहे की पातळ?, बाईच मणी-मंगळसूत्र कसे आहे?, दागिने कोणते घातले आहेत?, कोनाड्यात समई ठेवली आहे की पणती?, घरात कुठल्या देवाचा फोटो लावला आहे?, घरात म्हातारं माणूस आहे की नाही?, अशा निरीक्षणांच्या नोंदी त्यांची भिरभिरती नजर घेत असते.
"बाई तुमचा पाळणा औंदा हलणार!", "बाई तुम्ही घरातल्यांसाठी लई करता पन कुनाला त्याची किंमत नाई!", "मुलीबाळी चांगल्या घरात पडतील. सुना चांगल्या मिळतील", "सवतीच वाटोळं होईल बघाच तुमी", "नव‍र्याची मर्जी राहील", अशा पद्धतीचे 'भाकित' हे लोक वर्तवतात. घरधनीणीला बोलतं करतात. "घाबरु नको, तू कुनाच वाईट केल नाई, देव तुझे वाईट करणार नाही." असा दिलासा देतात. "खरंय बाबा तुझं!" असे म्हणत बाई खुश होउन दक्षिणा, धान्य, कपडालत्ता देते.

अंगलक्षण होराशास्त्र
तळहातावर तीळ असला की भरपूर पैसा मिळतो. हां! पण तो तीळ मुठ झाकल्यावर इतरांना दिसायला नको. हे अंगलक्षण होराशास्त्र. शरीराच्या विशिष्ट ठेवणीवरुन, लकबीवरुन त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला जातो. भव्य कपाळ म्हटले की विद्वत्तेचे प्रतीक. ज्याचे हात गुढघ्यापर्यंत जातात तो आजानुबाहु. रामाचे वर्णन 'आजानुबाहु' असे आहे. ललाट रेषा या आयुष्याची दोरी किती लांब आहे ठरवते. तीन स्पष्ट रेषा असतील तर तो शतायुषी. स्त्रियांच्या सौंदर्यलक्षणात कंबर, वक्षस्थळ, पाऊल, पोटरी, नाक, डोळे, भुवया, केस यावरुन स्त्रियांचे प्रकार पाडले आहेत. पूर्वी वधुपरीक्षेसाठी त्याचा वापर करत असत. गजगामिनी, सिंहकटी, हरिणाक्षी ही स्त्रियांची विशेषणे अंगलक्षणांवरुनच निर्माण झाली आहेत. पांढ‍र्या पायाची म्हणून केलेली अवहेलना ही अंगलक्षण होराशास्त्रातूनच आली. हस्तरेषा हा प्रकार मूळ शारीरलक्षणविद्या किंवा अंगलक्षण होराशास्त्र यातूनच स्वतंत्रपणे विकसित झाला. शिवपार्वती यांच्या संवादातून अशा अनेक गूढविद्या या मानवापर्यंत पोचल्या अशा कथा ग्रंथांत सांगितल्या जातात.

स्वप्नविचार
"पहाटेची स्वप्न म्हणे खरी होतात."
"मनी वसे ते स्वप्नी दिसे."
"स्वप्नात पण वाटलं नव्हतं असं काही होईल." अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो.
देवा आसं कसं मन
आसं कसं रे घडलं ।
कुठे जागेपनी तुले
असं सपन पडलं ॥
असं बहिणाबाईंच्या कवितेत म्हटलेले आहे. स्वप्न एक गूढ वाटत आलेले आहे. मानसशास्त्रात त्याचा बराच उहापोह झालेला आहे. स्वप्न पडणे हे नैसर्गिक असल्याने कर्मस्वप्ने, तारुण्यस्वप्ने, स्वप्नदूत स्वप्ने, असे त्यांचे वर्गीकरण ही केलेले आहे. त्यातील दैवीस्वप्ने म्हणून जे आहे, ते भविष्यकाळातील घटनांचे सूचक म्हणून पाहिले जाते. त्याचे अन्वयार्थ ग्रंथात दिलेले असतात. स्वप्नात काळा साप दिसणे, उल्कापात दिसणे, अंधारात जाणे, गढूळ पाणी दिसणे, काळे वस्त्र नेसलेल्या स्त्रीस आलिंगन देणे, कोणाचे तरी पत्र येणे, कावळा; गिधाड; मांजर; कोल्हा; घुबड या पशुपक्ष्यांचे दर्शन, इत्यादि गोष्टी अशुभसूचक मानल्या गेल्या. निर्मळ जलसाठा, हयात असणारी सौभाग्यवती, राज दर्शन, गाय; देव; ब्राह्मण; हत्ती यांचे दर्शन, गंध; फुले; रत्ने; अलंकार; यांचे दर्शन, इत्यादि गोष्टी शुभसूचक मानलेल्या आहेत. आपल्या अंतर्मनातच भविष्याचा कानोसा घ्यावा असे शास्त्रकारांना वाटून त्यांनी त्याला धर्माचे अधिष्ठान दिले. पडणाया स्वप्नाचा मग भविष्यासाठी मार्गदर्शक म्हणून वापर होऊ लागला.

शकुन
मुंगसा, मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शपथ! असे म्हटले की झाडाझुडपात पळणारे मुंगूस थोडे थांबते. मग तुम्हाला त्याचे तोंड दिसले की ते शुभ! मग तुमचा दिवस आनंदात जाणार! मांजर आडवे गेले की अशुभ! तुमचं काम होणार नाही. मग मांजर आडवे जायच्या आत घाईघाईने वाहन जोरात चालवून आपण रस्ता पार करायचा. चालत असल्यास त्या मांजराला बिचकवून परत पाठवायचे. त्यातुनही आडवे गेले तर मांजरावर आणि स्वत:वर चरफडायचे. घुबडाचा चित्कार किंवा दर्शन सुद्धा अशुभ. जंगलातून जाताना पायवाटेवर असे घुबड दिसले की ते एक प्रकारची भीती निर्माण करते. त्याचे रुप आपल्याला भीतीदायक वाटते ते त्याच्याविषयी असलेल्या पूर्वग्रहांमुळे. त्याला दगड मारायची पण सोय नाही. कारण त्याने तो झेलला तर तो दगड ते लांब घेउन जाते आणि तो दगड उगाळत बसते. जसजसे ते उगाळत जाईल तसतसे तुमचे आयुष्य वेगाने कमी होत जाते. कुत्रा रडायला लागला की अशुभ. महाभारतात युद्ध सुरू होणार या अशुभ घटनेचे सूचक शकून म्हणून कोल्हेकुई, कुत्रा रडणे यांचे उल्लेख केले गेले आहेत. घरातून बाहेर पडताना पाण्याचा हंडा भरुन जाणाया सुवासिनी स्त्रिया आडव्या गेल्या किंवा दिसल्या तर तो शुभशकुन. पूर्वी राजेरजवाड्यांच्या काळात महाराज बाहेर पडताना त्यांच्या वाटेवर अशा सुवासिनी स्त्रिया पाण्याचा हंडा घेउन जातील अशी व्यवस्था त्यांचे हुजरे करीत असत. देवासमोरील निरांजने जर विझली तर तो अपशकुन. चित्रपटांचा हा सर्वात आवडता शकुन.

'पैल तोगे काउ कोकताहे शकुन गे माये सांगताहे' असे उल्लेख गीतात सापडतात. त्यात कावळे काव काव करायला लागले की पाहुणे येणार असा शकुन मानला गेला आहे. चिमण्या मातीत आंघोळ करायला लागल्या की शेतकरी पाऊस येणार अशी खूणगाठ मनाशी बांधून शेतीतल्या पुढच्या तयारीला लागतात. शकुनाच्या बयाच गोष्टी या पशुपक्ष्यांच्या वर्तनाशी निगडित आहे. पल्ली पतन, सरडारोहण म्हणजे कोणत्या अवयवावर सरडा चढला किंवा पाल पडली यावरुन त्याचे फल सांगणे. भूत-पिशाच्च, काळी जादू, जारणमारण, या दुष्ट प्रवृत्तींची चाहूल प्रथम कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांना लागते. त्यामुळे दुष्ट प्रवृत्तींमुळे जर काही धोका निर्माण होणार असेल तर प्रथम हे प्राणी बळी जातात आणि घरधनी वाचतो अशी समजूत आहे. तसा कुत्रा हा आदिमानवापासून माणसाच्या सोबत आहे. आदिमानवाच्या गुहेत तो होता. परस्परांना परस्परांची गरज होती. त्यातूनच लळा लागला. पशुपक्षी, निसर्ग यांच्या सहजीवनातूनच मानवाची उत्क्रांती होत गेली आहे. त्याची साक्ष अशा शकूनांच्या कथांतून मिळते. निसर्ग नियमाद्वारे घडणा‌‌‍‌ घटनांचे आकलन जेव्हा मानवी मेंदूला होत नव्हते त्या काळात प्राण्यांच्या वर्तनातून त्याचे अन्वयार्थ काढले गेले व त्या गोष्टी सूचक मानल्या गेल्या. त्यातूनच पुढे सामाजिक, व्यक्तिगत जीवनात घडणार्‍या गोष्टींशी त्यांचा संबंध जोडला जाऊन त्या शकून म्हणून गणल्या गेल्या.