नशीब हे शिकलो - भाग ४४

मस्कतला परतल्यावर चलचित्रणाचे एक चांगले काम मिळाले. विजेच्या कमी दाबाच्या तारा ( लो व्होल्टेज केबल ) बनवणार्‍या कंपनीच्या उत्घाटन समारोहाचे चित्रीकरण करायचे होते. त्यामुळे संबंधीत अधिकार्‍यांची चांगली ओळख झाली. चित्रणात बर्‍याच त्रुटी होत्या त्यामुळे संपादनाचा चांगला अनुभव मिळाला. कारण बर्‍याच जागी चग्रा ( व्हिडिओ कॅमेरा ) फार हालला होता. यंत्र साधनांच्या काही महत्त्वाच्या भागाचे चित्रीकरण झाले नव्हते. तसेच काही ठिकाणी तोंडी माहिती देण्याची आवश्यकता होती. हे सगळे व्यावसायिक चलचित्र ग्राहकात सहज करता येते, परंतु माझ्या त्या साध्या चलचित्र ग्राहकाने व मुद्रण उपकरणाने हे सगळे घडवून आणणे फार घाम काढू झाले होते. पण फार मोलाचा अनुभव मी मिळवला.

पुन्हा काही कारणाने घर बदलावे लागले. ह्या घरात आम्ही चौघेच होतो. ह्या जागेत असताना खूप बर्‍या वाईट प्रसंगांना तोंड देण्याची कला व सामर्थ्य मला मिळाले. सर्व प्रथम एका मराठी मुंबईकराने फसवले, एका नवीन बांधलेल्या इमारतीचा जाहिराती करता छायाचित्रे काढायला लावली, ति चित्रे संबंधित मालकाला दाखवून आणतो म्हणून घेऊन गेला. दोन दिवसाने सगळी चित्रे परत केली, त्या मालकाला आवडली नसल्याचे खोटे कारण सांगून त्या चित्रांचे पैसे दिले नाही. दुसर्‍याच दिवशी माझेच चित्रे वापरून त्या इमारतीची जाहिरात प्रसिद्ध झाली. मला भांडण करून काही फायदा झाला नाही. त्या नंतर एका बंगाली बाईने जाहिराती करता चित्रे मागितली थोडे पैसे दिले तितकीच चित्रे मी तिला दिली. ह्या वेळेला मी सावध होतो.

ह्याच काळात मी निकॉन एफ ८०१ प्रग्रा ( कॅमेरा ) घेतला. एका पुणेकराने मला फार मोलाची मदत केली. त्याच्या कंपनीच्या औषधाच्या लहान मोठ्या बाटल्या, गोळ्यांची आकर्षक चित्रे काढून हवी होती. त्यात अट अशी होती की १ इंचाच्या बाटलीचा अथवा लहानशा गोळीचा फोटो १२ इंचाचा हवा होता, बाटलीवर लिहिली माहिती रेखीव व सुस्पष्ट असणे आवश्यक होते. त्या करता लागणारे विशेष भिंग माझ्याजवळ नव्हते. मी निकॉन विक्रेत्याकडे गेलो त्याच्या परवानगीने एक ७५ - ३०० चे फेरभिंग ( झूम लेन्स ) माझ्या एफ ८०१ प्रग्राला जोडले व त्या भिंगाच्या समोर एक जवळून मोठे - जमो - भिंग ( क्लोजप लेन्स ) जोडले. त्याच दुकानातील एक इंचाच्या अत्तराच्या बाटलीची प्रतिमा चाचणी केली, ति प्रतिमा सव्वा इंचाच्या प्रतिमा फितीच्या संपूर्ण मापात बरोबर दिसत होती.

मी काय करत होतो ते जाणून घेण्याची उत्सुकता त्या निकॉन विक्रेत्याला होती, मी जो प्रकार केला होता त्याचे त्याला कौतुक वाटले, आम्ही दोघे चांगले मित्र झालो. त्या अत्तराच्या बाटलीचे ए४ चित्र मी छापून औषध कंपनीवाल्या मित्राला दाखवले, मग एक करार केला की त्याच्या कंपनीने मला ती भिंगांची जोडणी विकत घेण्या करिता ४०० रियाल रोख द्यायचे व मी ३० चित्र त्यांना काढून द्यायची, नंतरच्या प्रत्येक चित्राचे २० रियाल हिशेबाने पैसे मिळतील. ति भिंग व्यवस्था अजून माझ्या जवळ आहे. ओमानच्या १९ वर्षाच्या वास्तव्यात त्या भिंग योजनेचा वापर करून मी सुमारे १०,०००रियाल कमावण्यात यशस्वी झालो. त्या निकॉन विक्रेत्याचे व पुणेरी मित्राचे मन:पूर्वक आभार, ह्यांनी वेळोवेळी मला खूप मदत केली.

मस्कत मधल्या पहिल्या कंपनीत मी सकाळी आठ तास काम केल्यावर चित्रणाची ही कामे सांभाळत होतो. आंतर्राष्ट्रीय कंपन्यांचे विक्री विभाग असलेल्या एका संस्थेतील अजून एका मराठी बांधवाने त्याच्या कंपनीचे चलचित्रण जाहिरातीचे महत्त्वाचे काम मला मिळवून दिले. दोन महीने हे काम चालू होते. ह्या कामा करिता त्या कंपनीतल्या एका इंग्रज बाईने पटकथा तयार केली होती. त्या पटकथेतील बर्‍याच गोष्टी चलचित्रणाच्या माध्यमात न बसणार्‍या होत्या त्या त्रुटी नीट करताना पटकथा कशी असावी ह्याचा चांगला अनुभव मला मिळाला. ते काम करीत असताना एकदा भर रहदारीत तिपाईवर ( ट्रायपॉड ) लावलेला प्रग्रा माझ्या चुकी मुळे घसरून पडला, त्याचे बरेच तुकडे झाले. काम थांबू नये म्हणून "एसव्हीएचएस" पद्धतीचा नवीन प्रग्रा हप्त्याने घेतला. विक्रेत्यांशी बाळगलेले चांगले संबंध कामी आले.

"एसव्हीएचएस" पद्धतीने चलचित्रणाचा दर्जा खूप चांगला होता. ह्याचे कारण वीजक प्रतिमा ग्रहण( इलेक्ट्रॉनिक इमेजींग ) पद्धतीत झालेला बदल. सामान्य पद्धतीने प्रतिमा उजेड ( वाय इन्फो ) व रंगाची ( सि इन्फो ) माहिती एकत्र केली जाते, परंतु "एसव्हीएचएस" पद्धतीने ती माहिती वेगळी ठेवून वेगळीच मुद्रित होते.

त्याच काळात आमच्या कंपनीने मुंबईहून एक अनुभवी प्रशिक्षकाला सेवा प्रशिक्षण शिबीरा करता आणले होते. त्या प्रशिक्षणात माझ्या सकट ७ व्यक्ती विक्रेते व तंत्रज्ञ, ह्यांना फार चांगले गूण मिळाले व प्रशस्तिपत्रे दिली होती. दोन महिन्या नंतर आम्हा ७ जणांना कंपनीने बाहेरचा रस्ता दाखवला. त्या प्रशिक्षणाचे चलचित्रीकरण मी केले होते त्याचे पैसे मला मिळाले तेव्हा कंपनीच्या केरळी नालायक कॅशियरने मला पैसे देताना फसवले. ३७५ रियाल च्या पावती वर कंपनी प्रमुखाची स्वाक्षरी होती मला स्वाक्षरी करायला सांगितले, माझ्या पुढे असणार्‍या मित्राला २०० रियाल दिले मला देताना पैसे कमी असल्याचे सांगून दुसर्‍या दिवशी देण्याचे आश्वासन दिले. दुसर्‍या दिवशी जाऊन बघतो तर ३७५ चे १७५ झाले होते आकडे व अक्षरी बदल त्याने केला होता. जोरदार भांडण झाले हात चलाखीने त्याने २०० रुपये उडवले होते. मला चुपचाप १७५ रियाल मान्य करावे लागले.

मी ती कंपनी सोडली, पुढे दोन वर्षानंतर कळले की मला फसवणारा फक्त कॅशियर नव्हता तर त्यावेळचा गुजराथी कंपनी प्रमुखाचा त्यात हात होता, कसे ते पाहू या पुढील भागात.
- क्रमश: -