'मांसभक्षण'

मांसभक्षण -


नमस्कार मनोगतींनो,


मला तुमच्या समोर 'मांसभक्षण' हा विषय चर्चेसाठी ठेवायचा आहे. याविषयी मला माहीत असलेली व इतरांकडून ऐकलेली मते किंवा मुद्दे असे आहेत -


१. मुळात मनुष्यप्राणी हा सस्तन असून, त्याची अन्न पचवण्याची यंत्रणा (वि. आतड्यांची रचना) मांसभक्षणासाठी बनलेली नाही. त्यामुळे मनुष्याने मांसभक्षण करू नये.


२. आपल्या हिंदू धर्मात 'मांसभक्षण' निषिद्ध मानले गेले आहे. (बहुतेक मत क्र. १ वरून)


३. 'मांसभक्षण' केल्याने माणसाचा स्वभाव 'मांसभक्षक' प्राण्यांप्रमाणे चिडचिडा बनतो. कामवासना वाढते.  


४. स्वतःच्या वासनेसाठी किंवा जिभेचे चोचले पुरविण्यासाठी, मुक्या प्राण्यांचा जीव का घ्यावा. जसे जीव देणे तुमच्या हातात नाही तसेच जीव घेणेही नाही.


-------------------------------------------------------------


५. बऱ्याचदा वैद्य (डॉक्टर, मनोगती वैद्य नव्हे) अशक्त व्यक्तींना चिकन खाणे किंवा चिकन सूप पिण्याचा सल्ला देतात. (विरोधाभास मत क्र. १ )


६. परदेशी राहणाऱ्या 'शाकाहारी'व्यक्तींना खाण्याच्या बाबतीत खूपच त्रास सहन करावा लागतो. किती दिवस तेच तेच बेचव सलाड आणि टीनं फूड खाणार? नाहीतरी जवळजवळ प्रत्येक बेकरी पदार्थांमध्ये अंड्याचा, प्राण्यांच्या चरबीचा अंश असतोच की.


७. आर्मीमध्ये (सैन्यामध्ये) कोणत्याही जातीच्या जवानास, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी 'साप' किंवा इतर सहज जंगलात आढळणारे प्राणी खाण्याचे प्रशिक्षण दिले जाते.


८. नकळत 'मांसाहार' केल्याने काही पाप होत नाही.


९. 'मांसभक्षण' करणे जसे पाप किंवा तत्वाविरोधी आहे तसेच 'मांस' असलेल्या वस्तू (Lipstick- माश्यांच्या खवल्यांचा अंश, चामड्याच्या वस्तू, कपडे) यांचाही 'शाकाहारी' मंडळींनी निषेध केला पाहिजे. उगाचच आम्ही 'मांसभक्षण' करत नाही अशा बढाया मारू नये.  (विरोधाभास मत क्र. २ )


१०. आम्ही 'कुक्कुटपालन', 'मत्स्यशेती' मधले मांस खातो. म्हणजे ही प्रकारची शेतीच नाही का ? (विरोधाभास मत क्र. ३ )


११. प्राण्यांना जीव असतो तसे झाडांना, भाज्यांना नसतो का? त्यांना भावना व्यक्त करता येत नाही (जीवाच्या आकांताने) म्हणून त्यांचा जीव घ्यायचा का? हे पाप नाही का? (विरोधाभास मत क्र. ३ )


१२. नाहीतर आपण 'उपद्रवी' म्हणून किड्यामुंग्याचा जीव घेतच असतो की. (विरोधाभास मत क्र. ३ )


१३. थंड प्रदेशांमध्ये 'मांसभक्षण' करून शरीरात ऊब आणता येते. म्हणून तेथे 'मांसभक्षण' केलेच पाहिजे.


आपल्याला कोणती मते किंवा मुद्दे पटले नाहीत व का ?


आपल्याला आणखीन काही मते मांडायची आहेत का ? 


- मोरू