मनोगतींनो!
सध्याच्या काळातील उपवर मुलामुलींची लग्ने ठरविणे व ती पार पाडणे हे त्यांच्या आईवडिलांसाठी (तसेच मुलामुलींसाठी) फार जिकरीचे झाले आहे असे मला वाटते. इथे मला ठरवून विवाह करण्याच्या पद्धतीबद्दल बोलायचे आहे.
आजच्या काळात पुर्ण शिक्षण झाल्यानंतर नोकरीत स्थिरस्थावर होईपर्यंत वयाची २५ वर्षे उलटून जातात. त्यानंतर लगेच जबाबदाऱ्या नकोत, जरा मोकळेपणाने वर्षभर काढून मग लग्नाचे बघावे असेच सर्व मुलांचे मत असते. (इथून पुढे सोयीसाठी मुले व मुलींसाठी मुले असाच शब्द वापरतो) ते बरोबर देखील आहे. त्यानंतर मग पारंपारिक पद्धतीने पाहण्याचा कार्यक्रम सुरू होतो. शक्यतो मुले २७-२८ पासून तर मुली २५ पासून सुरू करतात. त्यामध्ये मग त्यांच्या अपेक्षेनुरूप चाचणी/तपासणी/शोध सुरू होतो. ह्या सगळ्यात लग्न होईस्तोवर २९-३० (मुलांची) तर २७-२८ (मुलींची) उजाडतात. ह्यापुढे मुले वगैरे म्हणजे एकूणच कौटुंबीक जिवनात सर्वच उशीराने होते असे मला वाटते.
त्यातच आजकाल मुलामुलींच्या अपेक्षा प्रमाणाबाहेर वाढल्याने तसेच तडजोड वृत्ती कमी असल्याने त्रासच होतो. व्यक्तीचा स्वभाव, वागण्याबोलण्याची पद्धत, कौटुंबीक पार्श्वभुमी ह्या गोष्टींकडे कमी लक्ष दिले जाते. आपला स्वभाव, त्यानुसार आयुष्यात वाढत्या वयानुसार करावी लागणारी तडजोड ह्या गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे ह्या मताचा मी आहे. पण सध्या पैसा, गाडी, छानछोकीपणा ह्यालाच अवास्तव झुकते माप दिले जाते (शक्यतो मुलींकडून). हे मी स्वानुभवावरून सांगत आहे. माझ्या मित्रांचे देखिल असेच अनुभव आहेत. माझ्या ज्या मैत्रीणी लग्नाच्या आहेत त्यांच्याबरोबर होणाऱ्या गप्पांमधुनदेखिल हि गोष्ट प्रकर्षाने दिसुन आलेली आहे.
(आम्ही सर्व नामांकित माहिती तंत्रज्ञान कंपनीत आहोत. प्रत्येकाचा ह्या क्षेत्रात ५-६ वर्षांचा अनुभव आहे. आर्थिकद्रुष्ट्या खुप चांगले स्थैर्य आहे. आमची सर्वांची लग्ने झाली/ठरली आहेत. पण आम्हाला आलेले अनुभव पाहता असेच जर चालू राहिले तर कुटुंबसंस्था इतिहासात जमा होईल अशी भीती वाटते:)
माझे व माझ्या मित्रांचे मुलींच्या अपेक्षेबाबत आलेले काही अनुभव:
१. जास्तीत जास्त पैसा पाहिला जातो. पैसा हि आवश्यक बाजू असली तरी त्यालाच किती पकडून बसायचे हा पण एक मुद्दा आहे.
२. मुलाचा स्वतःचा फ्लॅट असेल तर लगेच वेगळे राह्ण्याची अपेक्षा. सासू सासऱ्यांची जबाबदारी नको.
३. मुलगा अपेक्षेनुरूप असला तरी जर तो मुलीच्या राहत्या ठिकाणापासुन ४-५ तासाच्या अंतरावर असेल तर नको. आई वडिल सासरच्याच गावात पाहिजेत.
४. क्रेडिटकार्ड, मोबाईल अत्यावश्यक.
५. खाजगी कंपनीत उच्चपदस्थ असावा (ही अपेक्षा गैर नाही). पण १०-७ सरकारी वेळेनुसार घरी यावा (सध्याच्या जमान्यात खाजगी नोकरीत अशी अपेक्षा कशी ठेवता येईल?).
६. मुलाच्या शारीरीक ठेवणीत तसूभर्ही तडजोड नाही. माझ्या एका मित्राला तो ५ फूट ७ इंच उंच आहे म्हणून नाकरले. त्या मुलीला ५ फूट ८ इंच उंच नवरा हवा होता. बाकि सर्व द्रुष्टीने पसंती होती.
७. एका मुलाला पर्यटनाची आवड होती. मुलीचे म्हणणे, "तो मला दर महिन्याला सारखे उन्हात फिरवत बसेल".
(माझ्या मैत्रीणींबरोबर जेव्हा आमची चर्चा होते तेव्हा त्यांच्या अपेक्षेमधे वरचेच प्रतिबिंब होते.)
अशीच यादी आणखीन वाढवता येईल. ह्या सर्व गोष्टींमुळे मुलींची लग्ने उशीरा होतात. मुलगी २७-२८ वर्षांची झाली तर ती थोराड/जून दिसायला लागते. मुले तिला नाकारतात. कारण मुलगी लहान व नाजुक असावी अशी मुलांची अपेक्षा असते.
८. एक मुलगी केवळ बी. कॉम. होती. नोकरी पण नव्हती. तिच्या घरची परिस्थिती बेताची होती. पण तिला सॉफ्टवेअर मधला कमीत कमी ६०००० पगार असणारा मुलगा हवा होता.
मुलींच्या निर्णयांमध्ये तिच्या आई व मैत्रीणींचा सहभाग जास्त असतो. माझ्या मैत्रीणीला असा नवरा मिळाला. मग मलापण असाच पहिजे. खुपवेळा मुलाकडच्यांनी होकार कळवला तर मुलीकडचे "आम्ही विचार करून कळवतो" म्हणतात पण परत संपर्क साधण्याची तसदी घेत नाहित. नाहि तर नाहि म्हणून कळवावे.
अर्थात मुले पुर्णपणे बरोबरच असता असे नाहि. ते पण अश्याच चुका करतात.
१. मुलगी शिकलेली व नोकरी करणारीच पहिजे. चांगले शिक्षण असेल तर नंतर नोकरी करता येईल असा विचार नाही.
२. दिसण्यामध्ये आखिवरेखिव असावी.
पण एकंदर पाहता मुले तडजोडीला तयार असतात. पण मुलींची मानसिकता तयार नसते असे नमूद करावेसे वाटते.
वरील सर्व विचार हे मी आलेल्या अनुभवातून मांडले आहेत. ह्यामुळे समस्त स्त्री मनोगतींना राग येणे मी गृहित धरतो आहे. ह्या विचारांशी इतरांनी सहमत असावे अशी अपेक्षा नाहि.
पण कोणताही पक्षपात न करता मनोगतींनी ह्यावर विचारमंथन करावे अशी अपेक्षा आहे. सध्याची उपवर पिढी भावी पालक असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांना योग्य संस्कार मिळून भारतीय कुटुंब व्यवस्था चांगली रहावी अशी माझी अपेक्षा आहे.
जर माझ्या विचारांमुळे कुणाची मने दुखावली गेली असतील तर क्षमा करावी.
लिहीण्याची सवय नसल्याने मांडणीमध्ये दोष असतील. एखादवेळेस वाक्याचे वेगळेच अर्थ होऊ शकतील. कृपया समजुन घ्यावे.