व्याकलन - व्याकरणाचे आकलन

"मराठीचा अभिमान आणि मराठी प्रतिशब्दांचा अट्टहास"ह्या मंदार मोडक यांच्या एका प्रतिसादातील लेखावर हा लेख बेतलेला आहे. मंदार ह्यांनी त्या लेखातील विधानांना माझ्यापरीने उत्तर देण्याचा माझा हा प्रयत्न आहे.

भाषा ही नवे-नवे शोध लावणाऱ्यांवर अवलंबून असते,  ज्याचे साम्राज्य त्यांच्या भाषेचा इतर भाषांवर वरचश्मा असतो.

भाषा हि 'बोलणाऱ्याचा' प्रभुत्व मान्य करते 'लिहिणाऱ्या वा वाचणाऱ्यांचं' प्रभुत्व मान्य करीत नाही. कारण संभाषणात त्यांचा, 'लिहिणाऱ्या वा वाचणाऱ्यांचा'  सहभाग हा 'अप्रत्यक्शच' असतो. परंपरा व औपचारीकता म्हणूनच एका विशिष्ठ पद्धतीने आपण लिहितो.

पण हे असं का होतं?

याचं कारण शालेय शिक्शणातून  भाषेसंदर्भातील -लिपी, प्रमाणलेखन, व्याकरण, शब्दसंधी/ शब्दयोजना (- शब्द जन्माला घालण्याचे नियम)  जे नियम (प्र)शासनाकडून मान्य आहेत त्यांचेच पालन व अनूकरण करणं  ही आपली वृत्ती आहे. बहूतांशी मराठी माणूस पापभिरू, कायदे कानूंना भ्याणारा व त्याचं पालन करणारा आहे.

इतिहासात जाऊन पाहीलं तर, 'व्याकरण म्हणजे काय? ' हे आपल्याला इंग्रजी भाषेने/ भाषिकांनीच शिकविले. भले सुरवातीला त्यामागचा 'दृष्टिकोन' वेगळा होता. इथं मी संस्कृत व्याकरणा संदर्भात म्हणत नाही आहे. पण इंग्रजी भाषेचा 'भाषेच्या सांगाड्याकडे पाहण्याचा, समजून घेण्याच्या' दृष्टिकोनामुळेच मराठी भाषेचे व्याकरण सन १८०० पासून मांडले गेले, रचत गेले.

भाषेच्या 'व्याकरणरूपी सांगाड्या च्या आकलनाला' इथपासून आपण 'व्याकलन' म्हणूया कां?

मानसिकता:

काळ बदलतोय, नव्हे तो बदलत असतो. बदलत्या परिस्थितीनुसार विचार करण्याची, उच्चार करण्याची पद्धत बदलत जाते व त्यामुळे त्यानुसार आपली भाषाही बदलत जात आहे. भाषा बदलण्यामध्ये विविध प्रकार आहेत. त्यातील ढोबळमानाने तीन प्रकार खालील प्रमाणे.
१. नवीन शब्दांचा वापर
२. नवीन उच्चार
३ नवीन वाक्यरचना
४ लिहीण्याची /टंकनाची पद्धती - लिपी

यातील पहिले दोन  व शेवटचा प्रकार आपण सवयीने, प्रयत्नाने एखादा विद्यार्थी वा भाषिक आत्मसात करू शकतो. पण तीसरा प्रकार आत्मसात करण्यासाठी योग्य शिक्षणाचीच गरज असते. आयुष्यातील प्रसंग वा परिस्थिती जेव्हा किचकट व गुंतागुंतीची होत जाते, तेव्हा वाक्यरचना 'नेमकं ते सांगणारी', 'हवं ते / नको ते झाकणारी', 'पाहिजे त्या गोष्टीकडे सहजपणे अंगुलिनिर्देश करणारी' अशी असावी लागते. व हे सुद्धा कमीत कमी शब्दांत, मोजक्याच वाक्यांत जमवावे लागते. किचकट व गुंतागुंत असून हि विचारांचा डोलारा तोलून धरण्यासाठी, भाषेचा व्याकरणरूपी 'सांगाडा' प्रमाणबद्ध असावयास हवा. बदलत्या काळानुसार हासांगाडा ही बदलतो. ज्यांना वाक्यरचनेतील व्याकरणरूपी 'सांगाडा' व्यवस्थित उमजतो, ती मंडळी आयुष्यातील अनेक प्रसंगात भाषेच्या सफाईदार वापराने इतरांच्या पुढे जातात, इतरांवर कुरघोडी करू शकतात तसेच अडचणीच्या वेळी वेळ मारून स्वतःची सुटका करून घेऊ शकतात. इंग्रजी भाषेतील व्याकलनामध्ये हे चापल्य आहे, म्हणूनच इंग्रजी शाळांचं प्रमाण वाढतंय.

म्हणूनच मराठी भाषेच्या सफाईदार वापर होण्यासाठी 'व्याकलनात' सुधारणा हवी असं माझं मत आहे. व त्यासाठी 'व्याकरणाची मांडणी' व्यवस्थित हवी. सध्यातरी आपण व्याकरणाच्या पुस्तकातील अक्षरांनाच 'व्याकरण' म्हणतो. ते 'व्याकरण' नसून ती 'व्याकरणाची मांडणी' आहे. मुळात 'भाषेचे व्याकरण' हे विचार करण्याच्या पद्धतीमध्ये दडलेले असते. ते अदृश्य असते.

मंदार यांनी जो लेख लिहिला त्यात फक्त त्यांनी आपण इंग्रजी शब्द वापरतोय असं म्हटलंय. पण विरोध होतोय तो

- इंग्रजी उच्चारांना, (मराठी ऍक्सेंट म्हणजे काय? आता हे मला नका विचारू? )

- व्याकरणाची चौकट (व्याकरण पुस्तकात बदलण्याच्या आधीच) बोलण्याच्या नादात बदलण्याला.

- नव्या शब्दनिर्मितीला. ( काही उत्साही मंडळी भाषांतरालाच मराठीकरण समजताहेत. तर सरकारी मंडळी हिंदीतील शब्दच सरसकट मराठीत आणत आहेत. )

सध्या अस्तित्वात असलेली फोनेटीक टंकन पद्धतीला अजूनतरी मी व इतर काही मंडळी सोडून कुणीही विरोध करीत नाही आहे. म्हणून तो मुद्दा बाजूला ठेवूया.

समारोपः
व्यवहारातील मराठी भाषा बदलतेय. पण शालेय पुस्तकातील सन १९०० दरम्यान च्या काळात बेतलेल्या 'व्याकरणाच्या मांडणीत' काळानुसार बदल झालेला नाही. महत्त्वाचा म्हणजे त्यात 'फाफट-पसारा' हि बराच आहे. ह्यात सुधारणा कशी होवू शकते या साठी हा चर्चा प्रस्ताव आहे.

--सतीश रावले