नशीब माझे - - भाग - - ४

मी ८ वी - ९ वी (१९६२ -६३) शिकत असताना माझा मोठा भाऊ इलेइट्रीकल
इंजीनीरींग शिकत होता. एका सुट्टीत तो घरी तालुक्याच्या जागी आला असताना
आम्हा मुलांना इलेक्ट्रॉनिक शास्त्रातील नवीन शोधांचे वर्णन सांगत होता.
गेरार्डी ह्या लेखकाचे रेडिओ इंजीनीरींग हे २००० पानी इंग्रजी पुस्तक
वडिलांच्या मदतीने मी  शिकत असल्याने, व्हॉल्व्ह, ग्रीड, कॅथोड,
इलेक्ट्रॉनिक सर्किट हे प्रकार मला अवगत होते. माझा भाऊ ट्रान्झीस्टर,
डायोड वगैरे प्रकारांची माहिती सांगण्यात मग्न होता.

शुद्ध
सिलिकॉन वीज प्रवाह रोधक आहे परंतु अशुद्ध सिलिकॉनच्या पी आणि एन अशा दोन
चकत्या एकमेकांना विशिष्ट पद्धतीने जोडल्यास डायोड तयार होतो, त्याचा आकार
टाचणीच्या डोक्या एवढा असतो. तसेच पी एन पी अशी विशेष जोडणी केल्यास
ट्रायोड तयार होतो.

मला चूप बसवेना मी लगेच बोलून गेलो. जर
टाचणीच्या डोक्या एव्हढ्या दोन चकत्यांचा एक डॉयोड तर कपॅसिटर सुद्धा तयार
होईल, एका चकतीचा रेझीस्टर होईल, तीन चकत्यांचा ट्रायोड आहेच, हे सगळे
एकत्र जोडणे जर शक्य झाले तर २ फूट बाय २ फूट चा हा एव्हडा मोठा रेडिओ
हातातल्या घडाळ्या एव्हडा सहज तयार होईल. भावाला माझे बोलणे तेव्हा फार
हास्यास्पद वाटले. परंतु पुढील १० वर्षात एल एस आय आणि व्ही एल एस आय चे
उत्पादन जगभर किती प्रमाणात वाढले हे जगजाहीर आहे. इथे मुद्दा हा आहे की
तर्कशुद्ध विचार करण्याची पात्रता व डोकं जगभर उपलब्ध आहे परंतु मोजक्याच
व्यक्ती ते विचार जगभर प्रसारित करण्यात यशस्वी होतात. त्यांच्या साथीला
असते नशीब त्यांचे.

माझे बोलणे हास्यास्पद ठरले. पण ताजी केळी
खाणारा त्या आजीचा त्या नातवाचे (भाग १) बोलणे "स्मार्ट, इंटेलीजंट" गणले
जात असे. माझ्या तुलनेत तो नातू श्रीमंत बापाचा एकुता एक मुलगा, गोरा
गोमटा, एका थंड हवेच्या ठिकाणातल्या इंग्रजी माध्यमातून शिकवलेला,
आंग्लयुक्त मराठी लाडगोड बोलणारा होता. त्याची आई माझी दूरची आत्या होती.
आजूबाजूच्या स्त्रियांच्या तुलनेत गोरी, चपळांग होती. त्या काळांत त्या
नातवाला "आम्ही ही सुंदर झालो असतो वदले. . . " हे वाक्य मला (माहीत
असून), एका "रड्याला" बोलायचे धाडस नव्हते.

असो, माझे बालपण संपले.
आजार, औषधं, पट्ट्या, गंडे, धागे सगळे संपले. पण त्याचे घाव व दुष्परिणाम
खोलवर रुजवून गेले. माझे सतत रडण्याचे कारण माझेच मला उमजले. कस हायसं
वाटलं, आत्मविश्वासाची कमी जाणवू लागली, ह्यात वाढ करणारे प्रसंग, घटना
घडत गेल्या. त्या कळांत एका संस्थेच्या कामात झोकून दिले, इतके की
एसेस्सीच्या परीक्षेत नापास झालो. संस्थेच्या मंडळींनी दोष माझा असल्याचे
सांगून जखमेवर छानसे मीठ रगडले.

त्या धक्क्यातून मी पुढल्या ६
महिन्यातच सावरलो. चांगल्या गुणांनी एसेस्सी परीक्षा पास झालो.
आत्मविश्वासात भर पडली. १६ वर्ष माझ्या अपयशाचा दोषी मी नाही असे न समजता
मीच दोषी असणार असे ठरवून आत्मपरीक्षण सुरू केले ते पण - - नशीब माझे - -
भेटूया - - भाग - ५