नशीब हे शिकलो - भाग ४७

ओमान मध्ये परदेशिय नागरिकाला कोणताही
व्यवसाय करण्याची एक मालक म्हणून परवानगी नव्हती. व्यवसायाचा मुख्य मालक
ओमानी असणे आवश्यक होते. सगळे परवाने त्याच्या नावाने असणार. मग परदेशीय
नागरिक त्याचा सल्लागार, निर्देशक, अधिकारी वगैरे नात्याने कामाचा परवाना
घेऊन ओमान मध्ये राहू शकत होता. तसेच परदेशिय कंपनी एका ओमानी
व्यावसायिकाच्या सहयोगाने व्यवसाय करीत असे, त्याला करार ठरल्याप्रमाणे
सहयोग हक्काचे पैसे देत असे.

मी
जिथे काम केले त्या कंपनीत हाच प्रकार होता. कंपनीत लिकर (दारू), ऑफिस
ऑटोमेशन  /फर्निचर, एसी / फ्रीज, घरगुती वापराच्या वस्तू, जीवनावश्यक
वस्तू असे विभाग होते. दारू विभागात दोन प्रकार होते. किरकोळ विक्री
दुकाने व बर्‍याच परदेशिय दारू कंपन्यांचे विक्री हक्क असल्याने ठोस
विक्री विभाग असाच प्रकार प्रत्येक विभागाचा होता. ह्या सगळ्या विभागांचे
हिशेब ठेवणारा एक विभाग होता. व्यक्तीविषेश (पर्सनल) विभाग होता. सगळ्या
कंपन्या थोड्याफार फरकाने अशाच असतात. लूट किती टक्क्याने व किती
प्रकाराने करायची हे ठरवण्यात प्रत्येक कंपनीचे वेगळेपण होते.

कंपनी
मूळ ब्रिटनची होती, कंपनीचा निर्यात विभाग प्रत्येक वस्तूची किंमत ५ ते
१५पटीने वाढवीत असे, ही वाढ वस्तूचे महत्त्व काय होते त्याला सापेक्ष
होती.मागील भागात वर्णन केलेल्या प्रकाश नळीचे महत्त्व ठरवून ८ पटीने
वाढीव किमतीला ओमानला पाठवली जात होती. मस्कतला ति ३ पटीने वाढलेली होती.
व सेवा विभाग ग्राहकाला विकताना त्या तीन पट वाढलेल्या किमतीला दुपटीने
वाढवून विकत होता. ह्याचा अर्थ मस्कतच्या ग्राहकाला एका प्रकाश नळीची
किंमत ३०पटीने द्यावी लागत होती. मस्कतची फिलिप्स कंपनी तिच प्रकाश नळी
फक्त ३पटीने वाढलेल्या किमतीत ग्राहकाला देत होती. ही मूळ ब्रिटिश कंपनी
त्याकाळात मस्कतला ५०० ते ८०० प्रकारच्या वस्तू विकून कायदेशीर लूट
करण्यात यशस्वी झाली होती. अशी लूट दर दिवशी एका कंपनीची काही हजार
रियालची होती.अशा चारपाचशे परदेशीय कंपन्या त्या काळात ओमानला होत्या. दर
दिवशी किती हजाराची लूट होत असावी ?

मी ज्या सेवा विभागात कामाला
होतो त्याचे उत्पन्न माझ्या सारख्या १० तंत्रज्ञांच्या प्रयत्नांवर
होते.आम्ही कमावलेल्या पैशातून आम्हा सगळ्यांचा पगार, एक लेखनीक, ब्रिटिश
विभाग प्रमुख, एक मदतनीस व एक वाहन चालक त्यांचा पण पगार त्यात होता.
आम्हा ५तंत्रज्ञांचा पगार एकट्या ब्रिटिश प्रमुखाचा होता. मी एकटा दर
दिवशी कामाची मजुरी म्हणून सेवा विभागाला १०० ते २०० रियाल मिळवून देत
असूनसुद्धा सात वर्षात दर दिवशी सरासरी ८ ते १५ रियालच्या पुढे गेलो नाही.

ह्या
सगळ्या अनुभवातून मी १९९० ला ती कंपनी सोडली १९९१ला एका मायक्रोफिल्म सेवा
कंपनीत सेवा प्रमुख म्हणून कामाला लागलो. ही कंपनी एका ओमानी सरकारी
अधीकार्‍याची होती. मला ५०० रियाल पगार मिळत होता. त्या कंपनीत मी, एक
इजिप्शियन मदतनीस व एक केरळी हिशेबनीस असे तिघेच होतो. ६ महिने काम सुरळीत
झाले ८ व्या महिन्यात त्या कंपनीचे दुसर्‍या कंपन्यांशी केलेले
मायक्रोफिल्म सेवा करार नव्याने सुरू करण्याची वेळ आली. ति करार पत्रे मला न
दाखवता केरळी हिशेबनीसाने तयार करून पाठवली होती. एका संध्याकाळी मी, मालक
व त्याचा बॅंकेचा मित्र एकत्र बसलो होतो. मालकाने ति करार पत्रे मला
दाखवली, त्यावर अजून सह्या झाल्या नव्हत्या, त्या करार पत्रां प्रमाणे
पुढील वर्षातील मिळकत निम्म्याने कमी होणार होती. बॅंकेला ते मंजूर नव्हते
कारण जुन्या करार पत्रांच्या मूळ रकमेच्या आधारावरच कंपनीला कर्ज मिळाले
होते.

केरळी हिशेबनीसाने खूप मोठी चूक केली होती ती मी त्या
दोघांना दाखवली व समजावून सांगितली. कंपनीने प्रत्येक तयार मायक्रोफिल्म
कार्डाची किंमत ०.५ रियाल दाखवली होती, पूर्वी तिच ०.८ रियाल होती.
दुरुस्ती सेवा दर ताशी २० रियाल दाखवला होता. पूर्वी तो दर ३० रियाल होता.
कारण कंपनीला नव्याने होणार्‍या स्पर्धेत टीकण्या करिता केरळी हिशेबनीसाला
हाच एक उपाय सुचला होता. मुळातच सगळ्या किमती ठरवण्यात चूक झाली होती.
कंपनीचा महिन्याचा संपूर्ण खर्च दर ताशी ह्या हिशोबाने ५०रियाल होता. एका
तासात ३० ते ३५ कार्ड तयार होत असे. त्यातही एका महिन्याची कार्ड संख्या व
दुरुस्ती सेवा कामे निश्चित नव्हती. हा हिशेब न करता केरळी हिशेबनीसाने
०.५ रियाल दर कार्डाला दाखवला होता. तेच दुरुस्ती सेवा खर्चाच्याच
हिशेबाचे झाले. दर ताशी ६० रियाल मिळाले तरच महिन्याचा संपूर्ण खर्च निघून
फायदा होणार ह्याचा हिशेब कधीच केला नव्हता. तो ओमानी मालक डोके धरून बसला
होता.

ह्या मायक्रोफिल्म सेवा कंपनीत असताना एक धक्कादायक प्रसंग
घडला. एक भारतीय मित्र सकाळी मला भेटायला आला, त्याच्या सांगण्या वरून मी
अमेरिकन विमा सुरू केला त्याचे ३०० रियाल हप्त्याचे पैसे त्याने घेतले व
तो दुसर्‍या दिवशी भेटतो सांगून गेला तो कायमचाच. रस्त्यात त्याच्या
गाडीला दुसर्‍या बाजूने येणार्‍या गाडीने उडवले होते. हा जागीच खपला होता.
माझे ३०० रियाल त्याच्या खिशात तसेच होते. त्याने भरलेल्या अर्जा वरून
विमा कंपनीने मला तो गेल्याचा प्रसंग सांगितला होता. माझा विमा असा सुरू
झाला होता.

ति मायक्रोफिल्म सेवा कंपनी वर्षभरात बंद पडली. त्या
ओमानी मालकाला ६०,००० रियालची कर्जफेड करायची होती. माझा नवीन परवाना शोध
सुरू झाला. योग चांगले होते १५० रियाल महिन्याला देऊन परवाना मिळाला.
त्याने मला ५०० रियाल पगार देतो असे दाखवून माझ्या नावाचा दारूचा परवाना
मिळवला. हिंदू व ईसाई लोकांना पगाराच्या १० टक्के दारू विकत घेण्याचा
परवाना मिळत असे. दारू फक्त परवाना धारकांनाच विकत व विकण्याची परवानगी
होती. ही मुस्लिम मंडळी असे हिंदू व ईसाई मित्र शोधून ठेवायचे. माझ्या
परवान्याचा उपयोग माझा ओमानी मित्र ह्याच कामा करता करीत होता. त्याचा
फायदा मला खूपदा झाला. - क्रमश: -