नशीब हे शिकलो - ५०

माझा मोठा मुलगा पाचवीच्या वर्गात शिकत असताना शाळेच्या एका हिंदी नाटकात त्याने एक महत्त्वाची भूमिका केली होती. एका कुटुंबातील चोटीराम नावाच्या घरगड्याची ती एक विनोदी भूमिका होती. धोतर, पंचा, बनियन, मिशी, टक्कल वर एक शेंडी एक सामान्य घरगडी. पहिल्या पाच मिनिटातच त्याने प्रेक्षकांना हसवायला सुरू केले होते. त्याच्या प्रत्येक प्रवेशाला टाळ्यांनी स्वागत झाले. कार्यक्रमाच्या शेवटी त्याला उत्तम भूमिकेचे पहिले पारितोषिक मिळाले. आलेल्या पाहुण्यांनी व काही पालकांनी त्याला खूप बक्षिसे दिली. त्या प्रसंगाचा जो परिणाम माझ्या मुलावर झाला त्याने नशीब, योग वगैरे असते ह्याचा अनुभव नव्याने जाणवला. दोन दिवसातच त्या प्रसंगाचे परिणाम घडू लागले. हिंदीच्या शिक्षकाला वगळून इतर विषयाच्या शिक्षकांनी माझ्या मुलाला वर्गा बाहेर उभे करणे, आम्हाला मुलाविरुद्ध खोट्या तक्रार चिठ्ठ्या पाठवणे वगैरे त्रास देणे सुरू केले होते. त्या तक्रारी खोट्या असण्याचे पुरावे मी गोळा केले होते.

काही महिन्यातच शाळेच्या एका कार्यक्रमात माझ्या मुलाने काम करावे म्हणून आग्रह सुरू झाला. मी शिक्षकांनी पाठवलेल्या तक्रार चिठ्ठ्यांचा संच घेऊन मुख्याध्यापकाची भेट घेतली. तक्रार चिठ्ठ्या पाठवणारे शिक्षक म्हणण्याच्या लायकीचे नाहीत व त्यांनी पुन्हा माझ्या मुलाला कार्यक्रमात भाग घेण्याचा आग्रह करू नये. कोणताही त्रास दिल्यास कायदेशीर कारवाई मी करणार असे ताकीद देऊन आलो होतो. सहावी - सातवी च्या वर्गात फारसे त्रास दायक घडले नाही. माझ्या मुलाची वाढ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्हावी ह्या उद्देशाने त्याला मी लेगो खेळाचे सुटे भाग आणून दिले व त्याच्या बरोबरीने खेळायला सुरुवात केली त्याचा त्याला आज खूपच फायदा झाला आहे. मी ह्या खेळाचे सुटे भाग जमवण्यात १५०० रियाल खर्च केले होते. त्या लेगोचे हे काही नमुने.   

(सर्व चित्रे मोठ्या आकारमानात क्रमाने पाहण्यासाठी कोठल्याही चित्रावर टिचकी मारून सरकचित्रदर्शन सुरू करावे : प्रशासक)

(सर्व चित्रे मोठ्या आकारमानात क्रमाने पाहण्यासाठी कोठल्याही चित्रावर टिचकी मारून सरकचित्रदर्शन सुरू करावे : प्रशासक)

हि छायाचित्रे मी निकॉन पी ९० ह्या प्रग्राने - प्रतिमा ग्राहकाने काढली आहेत.

माझ्या अमिगा संगणकाचा मला चलचित्राच्या शीर्षक बनवण्यापलीकडे दुसरा कोणताच उपयोग होत नव्हता. अमिगाचे दर महिन्याला येणारे मासिक वाचून त्या संगणकाने नवीन काही करता येईल का ह्याचा शोध सुरू झाला. त्या मासिकातून ऍपल मॅकिनतॉश ह्या संगणकाचा उल्लेख बर्‍याच वेळेला वाचला होता. त्या संगणकाचा एक विक्रेता मस्कतला होता. हा संगणक विभाग व फुजी फिल्म हा विभाग एकाच मालकाचा असल्याने माझे संबंध वाढले कारण दर महिन्याला मी व बायको ५० पेक्षा जास्त फुजी चित्र रिळे घेणारे व छपाई करून घेणारे महत्त्वाचे ग्राहक होतो. सकाळच्या रिकाम्या वेळात मी ऍपल मॅकिनतॉश विक्री केंद्रात जास्त वेळ जाऊ लागलो. विक्री प्रमुखाची व मदतनिसाची ओळख वाढली (दोघे मुंबईकर होते). त्या काळात ऍपलचा एलसि ४७५ संगणक माझ्या खिशाला परवडणारा होता. सहा महिने एलसि ४७५ संगणकाचा मला कसा उपयोग करता येईल ह्याचा शोध मी घेत होतो, ८०० रियाल रोख एकाच वेळी जमत नव्हते. विक्री प्रमुखाने प्रयत्न करून तीन हप्त्यात पैसे घेऊन संगणक मला विकला.

माझी संगणक समजून घेण्याची रीत हटके होती. निर्देशक (माऊस) च्या आत काय आहे व त्या क्रियेने कोणत्या प्रक्रिया घडतात इथून मी सुरुवात केली. विजक शास्त्राचा (इलेक्ट्रॉनिक्स) अभ्यास व पूर्वानुभवाने संगणकाचे प्रत्येक भाग व कार्य समजणे सहज शक्य झाले. संगणकात उपलब्ध असणार्‍या अवजारांचा योजनाबद्ध उपयोग समजून घेतला. मी घेतलेल्या छायाचित्रांना संपादन करण्या करता फोटोशॉप हा उपायोजन संच (ऍप्लिकेशन) शिकणे आवश्यक ठरले. त्याकरता दृश्य प्रतिमेला (व्हीज्युअल इमेज) अंकित प्रतिमा (डिजीटल इमेज) बनवणारा प्रतिमा वाचक (इमेज स्कॅनर) विकत घेणे आवश्यक ठरले. त्या प्रवा - प्रतिमा वाचक (इमेज स्कॅनर) बरोबरच फोटोशॉप आवृत्ती ३ मोफत मिळाले. ह्या सगळ्या घटना माझ्या सातवीत शिकणार्‍या मोठ्या मुलाने इतक्या सहज पचवल्या की माझ्या आधी संगणकाचा वापर त्याने सुरू केला. त्याच्या कडून माला नेहमी ऐकावे लागे "बाबा इतके सोपे आहे, बघ असे केले की असे होते!" सांगायला अभिमान वाटतो संगणकातल्या बर्‍याच बारीक गोष्टी माझ्या मोठ्या मुलाने त्याच्या लहान वयात मला शिकवल्या.   

बायको वापरत असलेला चलचित्र ग्राहक (व्हिडिओ कॅमेरा) बिघडला म्हणून दुबईहून दुरुस्तीकरून परत येत होतो. माझी माझदा ३२३ हॅचबॅक चारचाकी होती, गाडीत मी एकटाच होतो. गाडीचा वेग ८० ते ९० असावा व्हेन्टोलीनचा एक आवश्यक झुरका घेण्याकरता दुर्लक्ष झाले तेव्हा गाडी एका निमळूत्या वळणावर होती पण वळत नव्हती म्हणून ब्रेक दाबला काय घडते हे समजले नाही. गाडी ३६० अंशात फिरत रस्त्याच्या दोन्ही रेलींगवर दोनदा आपटली. चारही चाके तुटून लोंबकळत होती. पण मला कुठेही खरचटले सुद्धा नव्हते, कारण सुरक्षा पट्ट्याने खिळवून ठेवले होते. नशिबाने साथ दिली होती तेवढ्यात मागून एकही गाडी नसल्याने कोणी मला उडवले नव्हते. पोलीस आला ओळखीचा निघाला एका लग्नात ओळख झाली होती. आम्ही दोघांनी रस्त्याचे निरीक्षण केले. रस्त्याच्या कडेला असणार्‍या माती व वाळूच्या मिश्रणाने व कमी वजनाच्या गाडीने ब्रेक दाबताच हा गोंधळ झाला होता. माझदा ३२३ हॅचबॅकची मागची दोन्ही चाके मोकळी असतात म्हणजे एंजीनशी जोडलेली नसतात, फक्त पुढची दोन चाके एंनजीनला जोडलेली असतात. त्या काळात हा दोष सगळ्या असल्या पद्धतीच्या गाड्यांचा होता. ती अपघाती गाडी सोडवण्यात महिना गेला. दुरुस्ती खर्च गाडीच्या किमती पेक्षा दुप्पट होता म्हणून विमा कंपनीने नवीन गाडी घेऊन दिली. नवीन गाडी मिळवून देण्यात माझदाच्या विक्री प्रमुखाने मदत केली. ती पण माझदा ३२३ हॅचबॅकच होती पण नवीन वर्षाची गाडी होती. ह्याचे कारण त्या कंपनीचे जाहिरातीचे छाया व चलचित्रणाचे फार मोठे काम मीच करत होतो. ते काय होते बघू या. - क्रमश: