नशीब त्यांचे - भाग २९

मी माझे जन्मदाते निवड करू शकत नाही तसेच, जन्म स्थान, वेळ, जात, धर्म, भाषा, देश कोणते असावे हे पण ठरवू शकत नाही. १९८० चा हा प्रसंग, डोक्यावर हात मारत, लाचार, सकाळच्या १० अंशाच्या थंडीत, तेहरान मधील आपल्या दूतावासाच्या जाळीदार खिडकीच्या खाली, रस्त्यावर आतला बाबा माझ्या कडे केव्हा लक्ष देईल ह्याची वाट बघत उभा होतो. त्याच्या समोर असणार्‍या कागदाच्या गठ्ठ्यातून त्याने नजर वर करत विचारले " हां क्या है, पहिला पासपोर्ट दिखाव, तुम्हारा रजिस्ट्रेशन नही है, ये फॉर्म भरके दो " म्हणत मला माझा पासपोर्ट परत केला. मी १९७७ ला केलेल्या रजिस्ट्रेशनच्या शिक्क्याचे पान उघडून त्याला दाखवले. " हां ठीक है, क्या मांगता है ? " मी त्याला माझ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे संबंधित अधिकार्‍याची भेट हवी आहे असे सांगितले. " अधिकारी दो हफ्तेके बाद इंडीयासे आयेगा बादमे आओ, अगर ज्यादा डर लगाता है तो मै प्लेन रिझर्वेशन के लिये फोन करता हूं मुझे तारीख बोलो. "

म्हणून भाग २८ - मला इंडियन असण्याची घृणा वाटायला सुरुवात झाली असे लिहिले होते. अहो त्या थंडीत ११४ भारतीय त्या महिन्यात तेहरानच्या रस्त्यावर ८ दिवस विमानाची वाट बघत झोपले होते. त्यांच्या बरोबर भारतातून निघालेले ८ - १० जण अफगाणीस्थान - इराणच्या रस्त्यावर ट्रकवर लादलेल्या कंटेनर मध्येच खपले होते. दोष कुणाचा - इंडियन असण्याचा? चार इंग्रज माझ्या बरोबर कंपनीत होते. १९७८ ला क्रांतीची सुरुवात होताच त्यांच्या दूतावासातून सरळ संपर्क झाला होता, सुरक्षा कारणाकरता देश सोडणे आवश्यक झाले आहे तयार राहा. विमानाच्या तिकीट सहित तयारी निशी ब्रिटिश दूतावासातला एक दुभाषी तेहरानहून गाडी घेऊन आला होता. कागदपत्रावर शिक्के, करारपत्रात नमूद केलेले सोडून जाण्याचे सगळे फायदे मिळवून चौघांना घेऊन निघून गेला. ते नशीब त्यांचे होते. तेच भारतीयांना १ पानी पत्रामुळे उपकार म्हणून १ महिन्याचा जास्तीचा पगार प्रत्येकी २००० देऊन परत पाठवले होते.

असो, मी कंपनीत परतलो, माझ्या नावाने ओरडा सुरू होता. पाचनसुलभ ( डायजेस्टीव्ह ) बिस्किट शृंखलेतील एका बिस्किट थंड करणार्‍या पट्ट्याचे ( कन्व्हेअर बेल्ट ) दोन वेळा वेग नियंत्रक जळले होते व उत्पादन २४ तास बंद होते. त्या पट्ट्याची निगा राखणारा फाटलेला भाग शिवण्यात मग्न होता. मी पट्ट्याची पाहणी केली. मला पट्ट्याच्या वजनाची शंका आल्याने त्या शिंपी बाबाची मदत मागितली. पट्टा शिवण्या करता जमिनीवर अंथरणे आवश्यक आहे असे सांगून बाहेर काढून त्याचे वजन केले. नवीन पट्ट्याच्या ८०० किलो वजनाच्या तुलनेत त्या जुन्या पट्ट्याचे ५ मेट्रीक टन वजन मोटर क्षमतेच्या फार बाहेरचे होते. ती वजन वाढ पाचनसुलभ बिस्किट उत्पादन सुरू झाल्या पासून फक्त सहा महिन्यात झाली होती. सगळा अधिकारी वर्ग जमा झाला, शंका निरसन नंतर नवीन पट्टा बदलला गेला व उत्पादन सुरू झाले. माझ्या समर्थकांना माझ्या कौतुकाचा विषय मिळाला. पाचनसुलभ बिस्किटात गव्हाचा कोंडा व मार्गारीन चरबीचा वापर सामान्य बिस्किटापेक्षा फार जास्त होता. ताज्या भाजलेल्या बिस्किटातून ते मार्गारीन कापडी पट्ट्याने शोषले जात होते म्हणून वजन वाढ झाली होती. त्यावर उपाय सुचवण्यात मला स्वारस्य नव्हते. आता मी इराण्यांना मदत करणार नाही असे ठरवले होते.

वर्ष पूर्ण होत आल्याने २० दिवसाची सुट्टी, आम्हा दोघांचे तेहरान - मुंबई - तेहरान तिकीट मंजूर झाले. त्या तिकिटात भर घालून मुंबई - हॉन्कॉन्ग - मुंबई अशी प्रवास सोय विमान कंपनीने दिली. आम्हा दोघांना हॉन्कॉन्ग परवान्याची गरज नव्हती. बायको इराणी असल्याने भारताचा प्रवास परवाना आवश्यक होते. त्यावर फक्त एकदाच प्रवेश असा शिक्का माराला होता. हॉन्कॉन्ग परती नंतर मुंबईत भारतीय नवरा असल्याने परवाना सहज मिळेल असा सल्ला मिळाला.    

क्रांतीमुळे कंपनीचा ताबा सरकारी विभागाने घेतला. एक नवीन प्रमुख नियुक्त केला. तो स्वत:ची ओळख क्रांतिकारी म्हणून करून देत असे. त्याला कंपनीतील माझ्या कामाची प्रसिद्धी खूप खटकली. त्याने माझ्याशी बोलणे टाळले.

बायकोला कंपनीतून काढून टाकले. ठरल्या प्रमाणे आमचा मुंबई प्रवास झाला व चार दिवसांनी हॉन्कॉन्गचा प्रवास सुरू झाला. हॉन्कॉन्ग विमान तळावर मी भारतीय म्हणून मला प्रवेश परवाना मिळाला, बायको इराणी म्हणून तिला प्रवेश नाकारला. काय घडले? - भेटू भाग - ३०   

सूचना - कोणाला माझ्या आवाजात ह्या मालिकेचे वाचन ऐकायचे असेल तर स्काईप आयडी व्हीकेआर - स्किलसव्हीके संपर्क साधावा. एक प्रयोग.