नशीब त्यांचे - भाग ३३

१९८१ सिडनी विमान तळावर मोठा भाऊ आला होता. रस्त्याने सारखे वाटत होते आमचे कौतुक बघायला आमचे बाबा तेव्हा हवे होते. घरात जाताच भावाच्या को.ब्रा. बायकोचा मुद्दाम जाणवणारा बोलका (?) चेहरा आणि ते देखाव्याचे हास्य बरेच काही सांगून गेला. मी वेळ न घालवता कामाच्या म्हणजे नोकरीच्या जाहिराती बघायला सुरू केले. दोन दिवसात दोन जागा मिळाल्या परंतू कामाचा परवाना असेल तरच, हा प्रकार मला सांगितला नव्हता, परवाना प्रकारात कंपनी कोणतीही मदत करणार नव्हती. चॅनल ७ व ९ च्या स्टुडिओत काम मिळाले, कामाच्या परवान्याची जबाबदारी माझी होती. भावाने व बायकोने हा प्रकार त्यांना नवीन असल्याचे नाटक केले.

हसलब्लाड प्रतिमा ग्राहक ( कॅमेरा ) विक्रेत्याच्या दुकानात भटकत असताना एक माणूस उत्सुकतेने प्रश्न विचारीत होता. त्याची उतरे देणे विक्रेत्याला जमत नव्हते, त्या माणसाला पूर्ण समूह ( सेट ) विकत घ्यायचा होता, पण त्या आधी त्याचा उपयोग कसा व किती महत्त्वाचा असतो हे जाणून घ्यायचे होते. मी पुढे गेलो, त्यांची माफी मागितली व अपेक्षित माहिती दिली. त्या माणसाला त्याचा जुना समूह विकून त्या पैशात भर घालून हा नवीन समूह विकत घ्यायचा होता, दोन दिवसाने परत येण्याचे आश्वासन, फोन, पत्ता देऊन तो निघून गेला. थोड्यावेळाने दुकानाचा मालक आला. त्याच्या कडून कामाच्या परवान्याची माहिती मिळवली, माझ्या भावाने दोन सरकारी माहिती पत्र पूर्ण करून दिले तर तो दुकानवाला मदत करणार होता. भावाने ( बायकोला घाबरून ) ते पूर्ण नाकारले.  

आईच्या आग्रहानंतर भावाने त्याच्या संगणक कंपनीत मुलाखतीची तारीख मिळवली. मुलाखत घेणारा माझे कामाचे अनुभव ऐकून खूश झाला होता. त्याने सहज विचारले त्या कंपनीचा पत्ता कुठून मिळाला वगैरे. मी तितक्याच सहजतेने भावाचे नाव सांगितले, तो आवाक होऊन माझ्याकडे बघत बसला होता. कारण बोलताना तो मुलाखत घेणारा एकदा बोलून गेला होता " तुम्ही भारतीय उगीचच जरुर नसताना शिक्षण, पदव्या घेता, नवल आहे तुझ्या जवळ कोणतीच पदवी कशी नाही." मला आज अजूनही कळले नाही भावाने मी त्याचा मित्र असल्याचे का सांगितले, मुलाखती अगोदर मला कल्पना का दिली नव्हती. कामाचा परवाना मिळण्या करिता लागणारे कंपनीचे पत्र त्याने मिळवले. त्याचा काहीच फायदा झाला नाही. सिडनी सोडताना भावाच्या बायकोने " परत आलास तर बाहेर जागा बघून ये माझ्या घरात नाही," हे सांगण्याचा मोठेपणा दाखवत नात्याची ओळख दिली. पुढे बर्‍याच वर्षांनी तिचेच शब्द तिलाच ऐकवायचा तिनेच छान प्रसंग घडवून आणला, मला एक समाधान मिळाले. सिडनीला आईची सोबत व भावाचे आमंत्रण, प्रवेश पत्रात त्याचा पत्ता दिला होता म्हणून मी त्याच्या घरी गेलो होतो. तसे मुंबई पासूनच मी तिचे नाटक ओळखून होतो. तिला शिकवलेली असल्याचा फार अहंकार होता / आहे, तिच्या तुलनेत मी शिकवलेला नाही. मी इराणला परत गेलो. (माझे असे त्या दोघांच्या बाबतीत समजून घेणे नात्यातली पारदर्शीता की काय नसल्याने झाले असेल, मला खात्री आहे त्यांना हे असले पारदर्शीता वगैरे पाठ्यक्रमात शिकवले गेले नसावे.)

मला सिडनीत आई सोबत आमंत्रणाचे नाटक नीट समजले. इथून माझ्यात अजून एक बदल झाला, " नशीब त्यांचे " न म्हणता  " नशीब हे शिकलो " नाहीतर मी कुठे भरकटलो असतो देव जाणे.

तेहरानला विमान उतरताच केव्हा एकदा मुलाला कडेवर घेतो असे झाले होते. मुला बरोबर खेळत बायकोबरोबर बोलत रात्री उशिरा झोपलो. सकाळी धावत कंपनीत गेलो. नवीन आलेल्या त्या क्रांतिकारी कंपनी प्रमुखाने मी कंपनी सोडून पळून गेल्याची तक्रार पोलिसात केली होती. प्रत्यक्षात बाहेर / प्रवेशाचा रीतसर परवाना घेऊनच मी सुट्टी घेऊन सिडनीला गेलो होतो. मी कायद्या प्रमाणे प्रवास संपताच पासपोर्ट द्यायला मुख्य कार्यालयात गेलो, कं.प्र, च्या सुरक्षा पथकाच्या माणसाने माझी मान धरून ओढत कं.प्र समोर नेऊन उभे केले. मला शिवीगाळ केली, प्रमुखाने " ह्या हिंदी कचर्‍याला माझ्या समोरून उचलून बाहेर फेका, पोलिसाला कळवा आणि तेहरान विमानतळावर फेकून या," असा हुकूम दिला. काय होते आहे हे कळण्याच्या आत मी अंधारी येऊन खाली पडलो.

सकाळचे साडे सात वाजता ही घटना घडली, मला जाग आली ती रात्री अकरा वाजता. दवाखान्यात, बाजूला पोलीस उभे होते, माझा डॉक्टर मित्र होता, माझे काही खास इराणी मित्र पण उभे होते. माझ्या डोक्याच्या मागच्या भागातून भयानक कळा होत होत्या. पोलिस माझे निवेदन घेण्याच्या प्रयत्नात होते. माझ्या शरीरात बर्‍याच जागेत ठिबक नळ्या जोडलेल्या होत्या. दुसर्‍या दिवशी सकाळी मला पूर्ण जाग आली. डॉक्टर मित्र आणि जिल्ह्याचा पोलिस अधिकारी माझ्याशी नीट बोलले, त्यांना मला मारहाण झाल्याची शंका होती पण पुरावा सापडत नव्हता. शेवटी मानसिक धक्क्याने पोटातील आम्ल प्रमाण वाढल्याने डोक्यावर परिणाम झाला असावा असे पत्र देण्यात आले.

त्याच आठवड्यात मला एकट्याला तेहरानला विमानात बसवून मुंबईला रवाना केले गेले. विमानाचे तिकीट मला विकत घ्यावे लागले. साडेचार वर्षाचा हिशेब गुंढाळून माझे खाते बंद केल्याचे सांगण्यात आले. त्या महिन्याचा पगार देखील मिळाला नाही. विलेपार्ल्याच्या बहिणीने व मेव्हण्यांनी फार चांगली मदत केली. महिन्या भरात स्वतः:ला सावरले आणि बायको मुलाला इराण मधून बाहेर आणण्या करता प्रवेश मिळवला. - नशीब हे शिकलो - भाग ३४