काहीतरी लिहावंच सालं...!

चैतन्य दीक्षित

lihaava
काहीतरी लिहावंच सालं या जगण्यावर!
जगणं सुंदर वगैरे वगैरे,
मस्त कलंदर वगैरे वगैरे,
किंवा एक भारी अवघड प्रवास, असं सुद्धा
पण काही तरी लिहावंच सालं या जगण्यावर!
ढगांचे आकार गिरवत गिरवत,
आपलाच आपण शोध घेत...
कुठल्याशा हाकेनं व्याकूळ होत
स्वतःच स्वतःला पिंजत पिंजत...
आलोय कुठवर? जायचंय कुठे?
आपलीच सविस्तर गणितं मांडत...
पण.. काही तरी लिहावंच सालं ह्या जगण्यावर!
चुकलेले हिशोब, उरलेली देणी,
जमलेले हिशोब, आलेले आहेर,
यातून थोडं शिकत शिकत...
अनुभव आलाय म्हणता म्हणता,
त्यातूनच पुन्हा चुकत चुकत...
रस्ता चांगला? की खड्डे वाईट?
विचार करून पावलं टाकत...
पण काही तरी लिहावंच सालं ह्या जगण्यावर..
लिहून तरी काय होणार ?
विचार विकत कोण घेणार?
प्रत्येकाची शाई वेगळी, कागद वेगळा...
शाई निघून जायचीच; जाईल,
कागद फाटून जायचाच; जाईल
तरीसुद्धा जगल्यासारख्या चार ओळी,
पुसट शाईत फाटक्या कागदावर...
काहीतरी लिहावंच सालं.. ह्या जगण्यावर!

paNatee