मळून येतो
बाहेरून येताना मळून येतो...
विचार डळमळतात,
मुळापासून हलतात,
काही तसेच राहतात..
शरीर मात्र तुलनेने कमी मळते
धुऊन टाकल्यावर बरे वाटते
म्हणजे नुकसान तसे कमीच म्हणायचे...
आता मात्र पाळी मनाची असते,
हललेले विचार एक नंबरवर असतात,
त्यांची व्यवस्था लावता लावता वेळ जातो बराच
काही मार्गी लागतात,
काही शिल्लक पडतात
बहुतेक विस्मरणाच्या उबदार नि आश्वसक कवेत सामावून घेण्यासाठी
आतुर आणि पुरेसे चतुरही,
अस्वस्थता वाढीस लागलेली असतेच...
मग येतात पक्के झालेले विचार,
वाट पाहिल्यासारखे...
सुखावून जातात मला ते
मीही काहीसा स्वच्छ होतो आतून
सज्ज होतो,व्हावेच लागते
पुन्हा मळून येण्यासाठी....