अक्षरलेणी
अक्षरांशी ओळख नेमकी कधी झाली आठवतही नाही. पण अक्षरं आज अस्तित्त्वाचा हवाहवासा भाग झाली आहेत. मी खूप लहान असताना माझ्या आईने माझी अक्षरांशी ओळख करून दिली. एक वाटी वर, एक वाटी खाली, त्यांच्या मधून आडवी रेघ आणि तिलाच मागे उभी रेघ असा 'अ' सगळ्यात आधी माझ्यापर्यंत आला आणि मग पुढची मंडळी अशीच वाटीवाटीने आणि रेघेरेघेने माझ्यापर्यंत येत गेली. अगदी सुरुवातीला ही अक्षरं माझ्याशी लपंडाव खेळत. अचानक एखादा गडी कुठेतरी दडून बसायचा. जाम आठवायचा नाही. मग बाबा, आई, आजी कोणीतरी माझं बोट धरून मला पुन्हा त्या अक्षरापर्यंत घेऊन जायचं. मग आमच्या कट्टीची अचानक बट्टी होत असे. प्राथमिक शाळेत गेल्यावर अभ्यास नावाच्या पदार्थाची आणि माझी ओळख झाली. अभ्यासाबरोबरच आली ती पुस्तकं. मोठ्या जाड अक्षरांमधे छापलेली. तेव्हा मी गोष्टीच्याच काय पण शाळेच्याही पुस्तकांच्या वार्यालासुद्धा उभी राहायचे नाही. आता या गोष्टीचं खूप हसू येतं. पण तेव्हा पुस्तकं इतकी शत्रू होती की मी माझे धडेही कधीकधी आजीला वाचायला लावायचे. एका जागी शांतपणे बसणं ही अशक्य कोटीतली गोष्ट असल्यामुळे पुस्तकं बिस्तकं ह्या सोन्यासारखा वेळ वाया घालवण्याच्या गोष्टी आहेत असंच त्या वयात वाटत असे. मागे लागून लागून, प्रसंगी मानगुटीवर बसून आजोबा शुद्धलेखन लिहायला लावायचे तेव्हा ज्या अक्षरांचा राग राग यायचा. त्याच अक्षरांशी आणि पर्यायाने पुस्तकांशी हळूहळू मैत्री घट्ट होत गेली आणि लवकरच मी कसरीच्या किड्याप्रमाणे पुस्तकं खायला(!) सुरुवात केली. या अक्षरांनी माझं आयुष्य खुलवलं, समृद्ध केलं. याच सवंगड्यांपैकी अगदी काळजात घर करून बसलेल्या काही मंडळींची ही कथा आहे.
एकदा मी कसरीचा किडा झाल्यावर मी जे काही समोर येईल ते वाचायचा सपाटा लावला होता. तेव्हाच माझ्या आईने माझी ओळख छत्रपती शिवाजी महाराजांशी करून दिली. बळवंतराव पुरंदर्यांच्या 'राजा शिवछत्रपती' या शिवचरित्राची मी आजवर असंख्य पारायणं केली आहेत. 'राजा शिवछत्रपती' म्हटलं की सगळ्यात पहिली गोष्ट कोणती आठवत असेल, तर ती म्हणजे चित्रकार दीनानाथ दलालांची चित्रं. अतिशय गतिमान आणि बोलक्या रेषांमुळे जिवंत होणारी ही चित्रं खरोखरच अतिशय सुंदर आहेत. या चित्रांखाली लिहिलेल्या ओळीही मला फार आवडतात. आधीच शिवचरित्र विलक्षण स्फूर्तीदायी आहे, त्यात बळवंतराव ते फार खुबीने सांगतात. त्यामुळे हे पुस्तक वाचायला नेहमीच मजा येते. त्यातही काही काही प्रसंग वाचायला मला जास्त आवडतात. उदाहरणार्थ, तोरणा आणि पुरंदरगड जिंकून घेतल्यावर पाच हजाराची फौज घेऊन आलेल्या फत्तेखानाशी अवघ्या अठरा वर्षे वयाच्या राजांनी दिलेला यशस्वी लढा. हा प्रसंग वाचताना, राजांच्या चिमुकल्या फौजेचं बंड मोडून काढायला आलेला तो राक्षसी फत्तेखान, त्याच्या समोर गडबडून न जाता, मावळी सैन्याने दिलेला कडवा लढा, 'पांढरे बाल' बाजी पासलकरांपासून ते झेंड्याच्या तुकडीमध्ये झेंडा घेऊन जाण्याचा मान मिळालेला बाजी पासलकरांचा नातू बाजी जेधे याच्यापर्यंत सगळे तरुण आणि नवतरूण सैन्य, ऐन वेळी झेंड्याच्या तुकडीने येऊन फत्तेखानाचे तोडलेले लचके, संकटाकडे पाहून चिंतेत पडलेल्या राजांना चिंतामुक्त होऊन लढायला सांगणारी त्यांची राणी सईबाई आणि शहाजीच्या पोराचे हे बंड मोडून काढायला एवढे मोठे सैन्य घेऊन आलेल्या फत्तेखानाचा , पुरंदर्यांच्या भाषेत 'चिलमीतला विस्तव विझवायला घागरभर पाणी घेऊन आलेल्या फत्तेखानाचा' झालेला पराभव हा कथाभाग कितीही वेळा वाचला तरी आणखी एकदा वाचावासा वाटतो. शहाजीराजांना आदिलशहाने या बंडाबद्दल विचारल्यावर मनातल्या मनात खूश होऊन, पण वरवर दरबारी गांभीर्य ठेवून शहाजीराजांनी दिलेलं उत्तर, "पोरगा माझे ऐकत नाही." या प्रसंगी औरंगजेबाला चाकरीत घेण्याची विनंती करून पुरंदर्यांच्या भाषेत 'परस्पर दिल्लीच्या मिशा पिळून' शिवाजीराजांनी शहाजीराजांची केलेली सुटका, हा भागही असाच वाचनीय आहे. औरंगजेब आजारी शाहजहानला भेटायला दक्षिणेतला आपला सुभा सोडून दिल्लीला निघाला आहे हे कळल्यावर शिवाजी महाराजांनी आपली त्याच्या चरणांपाशी किती अभंग निष्ठा आहे याचं वर्णन करणारं पत्र त्याला पाठवल्यावर, शिवाजीसारखा पुंड आपणहून आपल्याला शरण आला आहे या विचाराने स्वतःवरच खूश झालेल्या औरंगजेबाने आपली त्यांच्यावर मर्जी आहे असा उलट खलिता पाठवला. अशा प्रकारे औरंगजेबाला हूल देऊन, त्याची पाठ वळताच सुप्याजवळचं त्याचं ठाणं महाराजांनी साफ लुटलं आणि तिथले अरबी घोडे हस्तगत केले. हा प्रसंग वाचताना मला खुदूखुदू हसू येत असे. लहानसहान लुटी आणि छाप्यांपासून ते पार आग्र्यापर्यंतच्या मोठमोठ्या मोहिमांपर्यंत प्रत्येक लढाई खरोखरच वाचनीय झाली आहे. हे प्रत्येक लढाईचे ऐतिहासिक तपशील, युद्धतंत्राचे तपशील, तत्कालीन परिस्थिती आणि मोगलाई कारभारावर केलेली मार्मिक टिप्पणी यांच्यामुळे हे पुस्तक नुसतीच ऐतिहासिक तपशिलांची जंत्री न राहता रंजक झालं आहे. त्यातले काही उल्लेख इथे देण्याचा मोह आवरत नाही. अफझलखानाची स्वारी आल्यावर, त्यालाच प्रतापगडावर जावळीत बोलावण्यासाठी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ आपले वार्धक्य विसरून खानाकडे हेलपाटे घालत होते. महाराजांची भेट घेण्यासाठी महाराजांनी सुचवलेल्या जागीच खानाने का यावं? याचं कारण देताना सुरुवातीपासूनच त्यांनी "राजा तुम्हाला फार भितो. तुम्ही शहाजीराजांचे सहकारी. राजांना काकांच्या ठिकाणी. म्हणूनच राजा तुमच्यासमोर यायला फार म्हणजे फारच भितो!" असा जो लकडा लावला होता, त्याचा अखेर परिणाम होऊन खान प्रतापगडावर यायला तयार झाला. हा भाग वाचताना हळूहळू त्या 'राजा फार भितो' चे हसूच यायला लागते. औरंजेबाला भेटायला दिल्लीत गेलेल्या महाराजांचे वय छत्तीस तर संभाजीराजांचे वय त्यांच्या बरोब्बर पावपट म्हणजे नऊ असल्यामुळे महाराज औरंगजेबाकडे सव्वाशेर म्हणूनच गेले यातली कोटीसुद्धा अशीच हृद्य आहे. फुलादखानाच्या कोठडीतून पेटार्यात बसून निघालेले राजे त्याच्या हातावर तुरी देऊन निसटले, तेव्हा औरंगजेबाच्या पाठीला माती लागली आणि महाराजांनी त्याला कसं चितपट केलं हे वाचूनही अशीच टाळी वाजवावीशी वाटायला लागते. घराच्या वाटेवर असताना महाराजांनी संभाजीराजे देवाघरी गेल्याची अफवा उठवून दिली. त्यानंतरचं हे वाक्य तर अफलातूनच. - "म्हणजे आता संभाजीराजांचा शोध घ्यायला मोंगल सैन्याला थेट स्वर्गातच जावं लागलं असतं, पण तिथेही संभाजीराजे सापडले नसतेच!" याचंच नाव गनिमी कावा.
शिवाय पुरंदरचा वेढा उठवण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुरारबाजी देशपांड्यांचा पराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोट घालणारा दिलेरखानही संस्मरणीयच आहे. पुरंदरच्या वेढ्यात पुरंदर व वज्रगड या जोडकिल्ल्यांवरच्या माणसांनी केलेली पराक्रमाची शर्थ आणि त्यात या दोन्ही गडांवरच्या माणसांचा तिळातिळाने झालेला पराभव पाहताना आपल्यालाही रडू येतं. त्यासाठीचं पुस्तकातलं चित्र आणि त्या खालच्या ओळी "पुरंदराच्या हिर्या चिर्यांनो, तुम्हांस मुजरा त्रिवार मुजरा!" या गोष्टी कधीच विसरता न येण्याजोग्या आहेत. औरंगजेबाचा दक्षिणेतला सुभेदार दिलेरखान आणि शाहजादा मुअज्जम यांचे भांडण आणि त्यांची चालणारी शिवाशिवी वाचतानाही अशीच खूप मजा येते. आजही सुट्टीच्या दिवशी हे पुस्तक काढून त्याची काही पानं जरी चाळली तरी एकदम ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं.
'राजा शिवछत्रपती' नंतर असाच प्रभाव पाडणारं आणि राष्ट्रभक्ती जागवणारं दुसरं पुस्तक हाती पडलं ते म्हणजे मृणालिनी जोशींचं 'इन्कलाब'. वर्षानुवर्षे फक्त भारतीय स्वातंत्र्ययुद्ध आणि त्यासाठी गांधी - नेहरूंनी केलेलं काम हाच इतिहास बळेबळे शिकावा लागला असला तरीही क्रांतिकारक हे त्या सगळ्या पुस्तकातलं सगळ्यात आवडतं प्रकरण असे. पण भारतीय स्वातंत्र्ययुद्धाच्या शासकीय इतिहासात जिथे लोकमान्य टिळकांच्या वाट्याला "स्वराज्य हा माझा हन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच." या वाक्याचं श्रेय आणि एक पगडी घातलेला फोटो एवढंच आलं, तिथे बाकी क्रांतिकारक मंडळी 'ऑल्सो रॅन' ठरली यात फारसं नवल वाटण्यासारखं काही नव्हतंच. दीडेकशे पानांच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये सगळ्या क्रांतिकारकांना मिळून फक्त अर्धं पान दिलेलं असे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू ही त्रिमूर्ती एकदा फोटोरूपाने पुस्तकात दिसली की त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता होत असे. त्यामुळे, अगदी वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, पं. रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खॉं यांच्यापासून ते खुदीराम बोस, प्रफुल्लचंद्र चाकीं, ते थेट विष्णू गणेश पिंगळे, रासबिहारी बोसांपर्यंत सगळ्या देशभक्तांची क्रांतिगाथा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकापर्यंत कधीच पोचली नाही. पण ती उणीव भरून काढली ती 'इन्कलाब' या भगतसिंगांच्या चरित्राने आणि त्याहूनही जास्त वि. श्री. जोशींच्या 'मृत्युंजयांचा आत्मयज्ञ' या पुस्तकाने. या पुस्तकावर बंदी घातलेली आहे असं म्हणतात. पण सुदैवाने आमच्या शाळेच्या मोठ्या दगडी ग्रंथालयामधे हे पुस्तक होतं आणि ते मला वाचायला मिळालं. हे पुस्तक म्हणजे साक्षात धगधगतं अग्निकुंडच आहे. मदनलाल धिंग्रांच्या कोर्टातल्या कबुलीजबाबापासून ते गदर कटापर्यंत आणि वासुदेव बळवंत फडक्यांपासून ते 'हिंसप्रसे'च्या काकोरी आणि नंतर गाजलेल्या सॉंडर्स खून खटल्यापर्यंत अनेक गोष्टींबद्दलची दुर्मिळ माहिती या पुस्तकात आहे. ती वाचून राष्ट्रप्रेमाने अक्षरशः भारून जायला होतं. मला तर अशफाकउल्ला खान नावाचे कोणीतरी देशभक्त होऊन गेले, त्यांनी देशासाठी फाशीची शिक्षा भोगली, ही गोष्ट हे पुस्तक वाचलं नसतं तर कधी समजलीही नसती. "सरफरोशीकी तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है।" या अजरामर गीताचे कवी पं. रामप्रसाद बिस्मिल हे किती विलक्षण रसायन होतं हेही या पुस्तकामुळेच मला समजलं. हे पुस्तक इतकं प्रभावी आहे की पुस्तकाच्या नुसत्या नामोल्लेखानेही पुस्तकाशी संबंधित सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. मृणालिनी जोशींच्या 'इन्कलाब'मध्ये भगतसिंग आणि हिंसप्रसेच्या इतर रांगड्या शिलेदारांची कथा गोष्टीरूपाने दिली आहे. त्यातले बरेच तपशील 'आत्मयज्ञा'तही सापडतातच. यातल्या राजगुरूंच्या बेडर आणि अतिशय धाडसी स्वभावाची कथा वाचताना तर दर वेळी थोडंसं हसू येतं आणि बरेचदा रडूही येतं. देशासाठी फासावर जाण्याची आपली संधी भगतसिंग हिरावून तर घेणार नाही ना? या चिंतेने ग्रासलेले, पोलीस छळ करतील तो सहन करता येईल का हे पाहण्यासाठी तापलेली सळई हातात खुपसूनही हूं की चूं न करणारे राजगुरू जेव्हा "रोजे को देखकर मेरेभी इश्कने बलवा किया।" म्हणतात, तेव्हा त्यांच्या लहान बाळासारख्या सरळ मनाचं आणि असामान्य मनोधैर्याचं कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही.
आपल्या देशाला असलेला फितुरीचा शाप या मंडळींना सगळ्यात जास्त भोवला. हे सगळं वाचताना खूप वाईट वाटतंच, पण देवळात शेजारणीशी बोलत असलेल्या बाईच्या तोंडून अनवधानाने बाहेर पडलेल्या माहितीचा अचूक धागा पकडून वासुदेव बळवंत फडक्यांचा ठावठिकाणा शोधून काढण्याइतकं हुशार जाळं विणणार्या इंग्रज पोलिसाचंही कौतुक वाटतं. या दोन पुस्तकांनी मनाचा अगदी ताबाच घेतला आहे आणि तो कधीच सुटू नये असं मनापासून वाटत राहतं.
राष्ट्रभक्तीच्या या प्रवाहाचाच एक भाग असं आणखी एक पुस्तक म्हणजे मृणालिनी जोशींचंच 'राष्ट्राय स्वाहा'. माधव सदाशिव गोळवलकर उर्फ परमपूज्य गोळवलकर गुरुजी या रा. स्व. संघाच्या दुसर्या सरसंघचालकांचं हे चरित्र खूप वाचनीय झालं आहे. गुरुजींच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या अद्वितीय आयुष्याची ही कथा वाचताच मनात घर करते. संघाच्या विचारांबद्दल अनेक मतमतांतरं ऐकू येत असतात. त्यात आपण कुठल्या बाजूचे आहोत हा प्रश्न ज्याने त्याने आपापल्यापुरता सोडवायचा असतो असं मला वाटतं. पण संघप्रीती किंवा संघविरोध या दोन्हीही भावना बाजूला ठेवून हे चरित्र वाचलं, तर त्यातून निव्वळ राष्ट्रप्रेम हाती लागतं असं मला वाटतं. याच्या मुखपृष्ठावरच यज्ञात आहुती देत असलेल्या एका ऋषींचं चित्र आहे. गुरुजींनीही आपलं संन्यस्त आयुष्य राष्ट्रयज्ञात स्वाहा करून टाकलं होतं. त्यांची ही गोष्ट नक्कीच स्फूर्तिदायक आहे.
या यादीमधे अजून अनेक नावांची भर घालायची इच्छा आहे. पण त्यांच्याबद्दल पुढच्या वेळी लिहीन. ही पुस्तकं आवडण्याचं आणि ती एका सूत्रात गुंफून इथे मांडण्यामागचं कारण म्हणजे ही पुस्तकं मला जगायला शिकवतात. न डगमगता संकटांशी दोन हात करायला शिकवतात. लौकिक आणि पारलौकिक कल्याणावर माझा विश्वास आहे. ही पुस्तकं मला लौकिक कल्याणापासून पारलौकिक कल्याणापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात. प्रेरणांच्या या दीपस्तंभांमुळे माझं तारू अंधारातही योग्य मार्ग शोधू शकतं याबद्दल मला अभिमान आहे. मला या पुस्तकांचं मोल जास्त जाणवतं कारण ही सगळी खर्या माणसांबद्दलची पुस्तकं आहेत. केशवसुत म्हणतात, "प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा..." या माणसांनी आपली कर्तृत्वगाथा एखाद्या लेण्यासारखी कोरून ठेवलेली आहे. म्हणूनच या अक्षररूपी लेण्यांना अक्षर म्हणजे कधीही नष्ट होऊ शकणार नाही असं स्वरूप प्राप्त झालं आहे.

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.