कदाचित...!
निखळुन गेले ह्या जन्माचे दुवे .. कदाचित..!
जुळेल पुढल्या जन्मी माझे तुझे .. कदाचित..!
जाण्याचे हे तुझे बहाणे खरे, परंतू
उंबरठ्यावर अडेल पाउल तुझे..कदाचित..!
तडफडतो पण प्राण न जातो, ते गेल्यावर
धारदारही नसतिल त्यांचे सुरे.. कदाचित..!
कसा पापण्यांना हा येतो गंध सुखाचा
येणे झाले स्वप्नामध्ये तुझे.. कदाचित..!
प्राणांचेही मोल तयांना कमीच वाटे
खरेच असतिल गंभिर माझे गुन्हे.. कदाचित..!
जन्मभरी मी मुकाट काटे झेलत गेलो
उधळशील तू, मी गेल्यावर, फुले..कदाचित..!