पुनर्जन्म एका कलाकाराचा
आज माझा वाढदिवस. सकाळी आंघोळ करूनच ह्यांना डबा करुन दिला. छान केशर, वेलची, जायफळ घालून केलेला शिरा. प्रसादासारखा. त्यावर पेरलेले काजू, बदामाचे काप. सगळ्या डब्याचाच देवाला नैवेद्य दाखवला. संध्याकाळी वाटलेच तर बाहेर, नाहीतर घरातच एखादा छान पदार्थ. हल्ली बाहेर जाऊन जेवण्याचे फारसे अप्रूप वाटत नव्हते. डब्याबरोबरच माझा स्वयंपाक करुन घेतला होता. पूजा झाली होती. कामवाल्या बाई पण काम करून गेल्या होत्या.
सकाळी सकाळीच सासूबाईंना आणि आईला नमस्काराचा फोन केला. सगळ्यांचे वाढदिवसाचे फोन येऊन गेले. सकाळपासून वेळ छान गेला होता. मनाला त्रास होईल अशी एकही घटना घडली नव्हती. आता सगळा मोकळा वेळ माझा होता. हवे ते वाचायचे, हवे ते लिहायचे. आता साडेदहा झाले होते, पुढे साडेसातपर्यंतच्या सगळ्या वेळाची मी मालकीण होते. मनातून अनामिक आनंदाच्या लहरी येत होत्या.
मग मी माझा वार्डरोब उघडला .......क्षणभर बघतच राहिले..............विविध प्रकारच्या साडयांनी गच्च भरलेले कपाट........... प्युअर-सिल्क, सुती, गढवाल, इरकल, पैठणी.......मग हळूच दागिन्यांचा लॉकर उघडला......... पाटल्या, बांगडया, तोडे, नेकलेस, मोहनमाळ, ठुशी, मोत्याचा सेट, पोवळ्याचा सेट.......हळूवारपणे सगळ्या दागिन्यांवर हात फिरवला. चांदीच्या लॉकरमधून तर भांडी बाहेर पडायला बघत होती, इतकी भांडी जमा झाली होती. लक्ष्मीचा वरदहस्त जाणवत होता.
सगळ्या घरावर नजर फिरवली. किती मोठे घर! तेही डोंबिवली सारख्या मुंबईच्या उपनगरात......मनात तृप्तता नुसती ओतप्रोत भरून होती. डॉक्टर झालेली मुलगी. तिचा डॉक्टर जोडीदार......आता लवकरच तिचे "क्लिनिक" - ह्या विचारानेच मनावर सुखद मोरपीस फिरल्यासारखे होत होते. नाशिकला छान बांधलेला बंगला! नाही म्हणायला मुलगा नाही ही उणीव होती, पण जावई ही उणीव नक्कीच भरून काढेल ह्याची हळूहळू खात्री पटायला लागली होती. उच्चशिक्षित, संस्कारी, सात्त्विक वागणे आणि आमच्या दोघांची काळजी घेणे ह्यामुळे हळूहळू ही उणीव पुसट होत होती. ईश्वरी कृपेचा वर्षाव अजून वेगळा काही असू शकतो का? या तृप्तीला मी खूप खोल श्वास घेत माझ्या आतल्या मनात, हृदयात भरुन घेतले.
लॉकरच्या खाली एक कप्पा होता, त्यात माझ्या प्रशस्तीपत्रकांची फाईल आणि काही लिखाण केले होते त्या डायर्या होत्या. फाईल आणि डायर्या हातात घेतल्या, आवडती सीडी लावली आणि सोफ्यावर शांतपणे बसले..........
फाईल चाळत होते...........गाण्याचे सूर कानावर पडत होते.............सलिलचा हृदयाला स्पर्शून जाणारा आवाज...........!
"आताशा असे हे मला काय होते
कुण्याकाळचे पाणी डोळ्यांत येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते"
अन मी खरंच स्तब्ध झाले, माझे शब्दही मूक झाले. डोळ्यांतून आसवांच्या सरी वाहायला लागल्या................
प्रशस्तीपत्रकांनी फाईल गच्च भरली होती. चित्रकला, गायन, भावगीत, निबंध, कथालेखन, रसास्वाद.......... कसली म्हणून प्रशस्तीपत्रके नव्हती त्या फाईलमध्ये ! सत्तर साली सातवीत असताना पहिले प्रशस्तीपत्रक मिळाले ते जिल्हा-पातळीवरच्या चित्रकला स्पर्धेचे. अजून आठवते......... त्यावेळेस शाळेचा शिपाई मला बोलवायला घरी आला होता. शाळेच्या स्मरणिकेत देण्यासाठी सगळ्या शिक्षकांबरोबर फोटो काढायचा होता. मग माझी उडालेली धावपळ, काहीतरी वेगळे करायचे आहे म्हणून तो सरळ भांग मोडून तिरपा भांग पाडून घातलेली वेणी. मोजकेच कपडे असायचे, त्यातलाच एक चांगलासा स्कर्ट-ब्लाऊज, त्यावर रशिदाने भेट दिलेले गळ्यातले, कानातले, हातात अंगठी पण आवर्जून घातली. आता ती फोटोत दिसणार नाही हे कुठे कळत होते तेव्हा! शिक्षकांच्या दोन रांगा, त्याच्यासमोर छोटे स्टूल टाकून मला बसवून मग काढलेला फोटो. बाबांबरोबर जाऊन जळगावच्या कलेक्टर ऑफिसमधून घेतलेला पुरस्कार! शाळेतल्या प्रत्येक निबंध स्पर्धेत बक्षिस हमखास ठरलेलेच असायचे. मग कॉलेज-जीवन, त्यातली असंख्य बक्षिसे, त्यातला यशाचा चढता आलेख.
लिखाणाची आवड फार लहानपणापासून होती. आठवीत असताना पहिली कथा लिहिली - "अनोखे दान" तिचे नाव. पुढे हीच कथा कॉलेजमध्ये गेल्यावर रेल्वे कल्चरल अकादमीच्या स्पर्धेसाठी पाठवली, आणि तिला "व्हेग" मासिकाचा प्रथम पुरस्कार मिळाला. "शिक्षा" कथेला "चारचौघी" मासिकाचा प्रथम पुरस्कार, "नजर" कथा "गृहलक्ष्मी"च्या कथा स्पर्धेत ६०० कथांमधून अंतिम फेरीत पोहोचली. अनेक चित्रे काढली, एखादा विषय घेऊन, त्यावर लिखाण करुन मग चित्र काढली...मोठ्या चित्रकाराने कौतुक करावे अशी ... इतकी सुंदर. गाण्याची आवड होती ... गाणे शिकण्याचा प्रयत्न केला.
आता या त्रेपन्नाव्या वर्षात पदार्पण करत असताना स्वत:च्या आयुष्याच्या यशस्वी वाटचालीचा पट उघडून बसले होते आणि डोळ्यांतून आसवांच्या सरी वाहात होत्या. हातातून आयुष्य निसटून गेल्याची खंत, सृजनशीलतेची प्रचंड शक्ती असूनही तिला योग्य दिशा मिळाली नाही ह्याची बोच, जाणवत होती. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवी भूमिका निभावताना ...एक मुलगी...बहीण...पत्नी...सून..., प्रत्येक वळणावर एकेका कलेचे विसर्जन करत आयुष्य पुढे जात होते.
"बाबा, मला चित्रकला फार आवडते, मी जी.डी. आर्ट्सला जाऊ का?"
"बाई इतकं महागडं शिक्षण तुला द्यायचं. बाकीच्या मुलांच्या शिक्षणाचं काय?"
मनातला चित्रकार निमूटपणे विसर्जित झाला होता.
लग्नानंतर खूप लिखाण करायचे होते, पण सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि जाणवले की चांगले, सुस्थिर जीवन जगायचे असेल तर नोकरी करणे क्रमप्राप्तच आहे. मग अठरा वर्षे नोकरीच्या चक्रात वावरताना - नऊ ते पाच ऑफिस, लेकीची शाळा, घरचा अभ्यास, पाहुण्यांची सततची वर्दळ, मोलकरणीच्या सुट्ट्या - लिखाणाचे सुंदर विचार सुचत असताना, डोळे थकून कधीच मिटलेले असायचे. आतल्या लेखिकेचे कधीच समर्पण झाले होते.
अचानक ह्यांना परदेशी नोकरीची संधी चालून आली. आम्ही दोघांनी सल्लामसलत करूनच ह्यांनी ती संधी स्वीकारली होती. पण त्याच वेळेस लेकीचे खर्या अर्थाने शिक्षण, करियर सुरु झाले होते. पाच वर्षे तिच्याबरोबर राहताना, तिच्यासाठी आई आणि वडील ह्या दोन्ही भूमिका निभावताना, नोकरीच्या धावपळीत तिच्या सहवासात राहायलाच मिळाले नव्हते. तिच्यावर चांगले संस्कार करताना, तिची मैत्रीण होताना, तिचे आयुष्य नादमय बनवताना माझ्या मनातले गाण्याचे सूर कधीच हरवले होते...कधीतरी ते सूर साद घालायचे...आणि माझे मन त्या ओळींभोवती रुंजी घालायचे...
"दूर...आर्त...सांग...कुणी...छेडीली बासरी!”
आज फायली चाळता चाळता मनातली खंत आसवांच्या सरींतून बाहेर पडत होती. किती गुण होते अंगात! किती कलासक्त मन होते! लग्न होऊन आल्यापासून कोणी बघीतली आहेत ही प्रशस्तीपत्रके? दागदागिने, साड्या, मोठे घर हीच का होती सुखाची परिमाणे? मला आठवते आहे, गेल्या दोन वर्षात ते जड दागिने कधी घातलेच नाहीत. अगदी जवळच्या लग्नातदेखील हातात एक पाटली, घड्याळ, गळ्यात मोत्याचा सर, बस्स एवढेच! लग्नकार्याला जाताना कपाट उघडले की प्युअर सिल्कच्या नाजूक जरीकाठाच्या साडीकडे हात वळायचा. त्या जड जड पैठण्या कधीच वरच्या बॅगेत टाकल्या होत्या...माझ्यातला कलाकार तळमळत होता, अतृप्त होता.
माझ्यातल्या कलाकार असा प्रत्येक वळणावर विसर्जित होताना मन मात्र रडत होते. मला खूप काही करायचे होते, पण आयुष्य मात्र हातातून निसटून गेल्याची खंत नेमकी आज वाढदिवसाच्याच दिवशी होत होती. ईश्वराजवळ प्रार्थना करताना एक विनंती केली....."ईश्वरा, या जन्मात नाही जमले हे सगळे, पण पुढचे अनेक जन्म माणसाचेच दे, एकेका कलेसाठी सगळा जन्म वाहून घेऊ दे.". डोळ्यातल्या आसवांना परतवून लावत असताना क्षणभर गुंगी आली...आणि कानाशी कुणीतरी गुणगुणत होते!
"अग, बघ तुझा हा रेखीव संसार! प्रत्येक गोष्ट कशी नेटकी ठेवली आहेस. प्रत्येक डब्यावर लावलेले लेबल, त्यात बरोबर तीच वस्तू! कलात्मकतेने सजवलेला दिवाणखाना, सगळे कसे आखीव आणि नियोजनबद्ध. संसाराचे हे असे सुंदर चित्र, एखाद्या चित्रकारालाच जमते...मला भेटला की तुझ्यातला चित्रकार!"
"तुझ्या मनातल्या सात्त्विक विचारांचे संस्कार तू तुझ्या लेकीवर करत होतीस, म्हणून तर ती इतकी संस्कारशील घडत गेली. हा तर तुझ्यातल्या लेखिकेचा चालता बोलता आविष्कार!"
"आणि गाण्याचेच म्हणशील तर...तिन्हीसांजेच्या वेळी...समईची ज्योत उजळल्यावर, आर्त स्वरात केलेली ईश्वराची आळवणी...ती भक्तीगीते, भावगीते...तुझ्यातल्या सुरांना, गाण्याला ती जोपासत होती!"
माझ्या कानात उमटणारे ते शब्द खूप गोड होते, कदाचित तो माझ्या मनातलाच आवाज असेल, पण तो आवाज ईश्वरी होता. ती वाणी अमृतवाणी होती.
डोळ्यांतल्या आसवांना मी कधीच पुसून टाकले होते. माझ्या ओठावर हसू उमटले होते आणि ते हास्य आतल्या मनातून आले होते. परवाच काढलेले गजानन महाराजांचे चित्र घेतले, ते टेबलावर ठेवले. एक छोटसे लिखाण केले होते - "भाव ते दृढनिष्ठा - प्रवास भक्तिचा" - तेही त्या फोटोसमोर ठेवले, आणि मी शांतपणे हात जोडून डोळे मिटून गाणे म्हणू लागले.
"नच वाण कोणतीही, सौख्यास पार नाही
कांता, सुपुत्र सारे दैवेच प्राप्त होता
शेगांवच्या महंता!"
माझ्यातला कलाकार कदाचित जगापुढे उघड झाला नसेल, परंतु या चराचराला, सार्या जगाला निर्माण करणार्या या नियंत्यापुढे मात्र मी कलाकारच होते. त्याच्यासमोर गाताना, त्याचे चित्र काढताना, त्याच्याविषयी लिहिताना माझ्यातला कलाकार मोकळा...मोकळा श्वास घेत होता! माझ्यातल्या कलाकाराचा हा पुर्नजन्म होता!
मनात गाण्याच्या ओळी उमटत होत्या,
"एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी!"
एक आगळा वेगळाच वाढदिवस साजरा झाला होता माझा!

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.