परिवर्तन!

पृष्ठ क्रमांक

श्रावण मोडक

रशियन बाहुल्याआपला राजकीय अंदाज कधी चुकत नाही, असं खात्रीपूर्वक आणि रास्तपणे सांगणार्‍या हरिभाईंना आपला एक अंदाज मात्र चुकेल आणि तो त्यांना स्वतःलाच एका विलक्षण परिस्थितीमध्ये आणून ठेवेल याचा अंदाज मात्र खचितच आलेला नव्हता. नव्हे, त्यांच्या एकूण विचारांमध्ये त्या अंदाजाची पुसटशी झलकही त्यांनी कल्पिलेली नव्हती. एक निर्णय घेतला की त्याचे काही तरंग उमटतात, काही वेळा तरंगांची लांबी दीर्घ असते. काही वेळेस तरंग नव्हे तर लाटा उमटतात, हेही त्यांना माहिती होतं. पंचवीस वर्षांचं राजकीय आयुष्य वाया गेलेलं नव्हतं, नाही तरी! पण आपल्या एका निर्णयाने घुसळण होईल हे मात्र त्यांना अजिबात अपेक्षित नव्हतं आणि अंदाज चुकल्याने अवचित आलेल्या सोनसंधीचा आनंद साजरा करावा असंही हरिभाईंबाबत घडलं नाही. आपला अंदाज चुकल्याचंच वास्तव जणू त्यांनी स्वीकारलं आणि ते पुढं सरकले. हरिभाईंच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडण्याची ती सुरवात असावी, असं आता मागे वळून पाहताना अनेक जण सांगू शकतात. पण तेव्हा मात्र तसं कोणीही म्हटलं नव्हतं, हेही खरं.

तो दिवस त्यांच्या आठवणीतून हद्दपार होण्यासारखा नाही. सारे तपशील त्यांना आठवतात. दुपारी तीनची वेळ होती. दिल्लीत त्यावेळी दिवसाच्या हालचालींचा आढावा घेत दुसर्‍या दिवसाचं सारं काही निश्चित करण्याकडे वाटचाल सुरू झालेली असते. पण ते इतरांसाठी. पक्षाचा प्रवक्ता म्हणून हरिभाईंचा दिवस आत्ता कुठे मध्याच्या दिशेनं सरकलेला असतो. सहानंतर त्याला विलक्षण वेग येतो. सहापर्यंत सारं काही अधिकृत, ऑन रेकॉर्ड. त्यानंतर काही काळ काही खास, "एक्स्क्लूझीव्ह" गोष्टी. त्यानंतर थोडा काळ इतर कामं उरकून बंगल्यावर पोहोचायचं. मग पुन्हा सुरू व्हायच्या त्या 'ऑफ द रेकॉर्ड' हालचाली. हा कालावधी हाताळण्यात हरिभाई एकदम तयार. म्हणजे, त्यांच्याकडून 'ऑफ द रेकॉर्ड' काही मिळायचं नाही पत्रकारांना, पण पत्रकार नाराजही व्हायचे नाहीत. हरिभाईंची विनम्रता तिथे कामी यायची.

तर हे सारं असंच आजच्याही दिवशी होईल असं हरिभाईंना वाटत असतानाच वाटचालीतील पहिलं वळण आलं होतं, त्यांच्या नकळत.

हरिभाईंनी फोन घेतला.

"भाई..." प्रदेशाध्यक्ष होते, "भाई, असेंब्ली डिझॉल्व्ह. कॅबिनेटने तय किया... सीएमची प्रेस सुरू आहे. सांगतायत, साडेचार वर्षांत केलेल्या कामाच्या आधारे जनतेचा कौल आजमावणार आहोत..."

आठवड्याभराआधीची बातमी खरी ठरत होती ती अशा रीतीने. तेव्हा, महसूल मंत्री हरिभाईंशी खासगी गप्पा करताना सूचकपणे म्हणाले होते, "आता काय, सारखं एकमेकासमोर यायचंच आहे..."

हरिभाईंना संदेश पुरेसा होता. लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ता टिकवण्याचा एक प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून अशा रीतीनं होणारच; नव्हे, तो केला गेला नसता तर आपणच त्यांना मूर्ख म्हटलं असतं... हरिभाईंचं विचारचक्र फिरत होतंच. अध्यक्षांपर्यंत ही खबर पोहोचली असणारच. टीव्हीचे आवाज घुमत होतेच. 'ब्रेकींग न्यूज' सुरू झाल्या होत्या. शांतपणे उठून हरिभाई अध्यक्षांच्या दालनाकडं निघाले.
---

"गेल्या साडेचार वर्षांत राज्य सरकारने केलेल्या गैरकारभाराविरुद्ध आम्ही सातत्याने संघर्ष करत आलो आहोत. याआधीही, 'जनतेच्या दरबारात या' असं आव्हान दिलं होतंच. ते त्यावेळी घेतलं नाही. आता केंद्रातील विजयाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांचे राज्यातील नेतृत्त्व करत आहे हे स्पष्ट आहे. म्हणूनच तर मुदतपूर्व निवडणुका. आम्ही त्यासाठी पूर्ण सज्ज आहोत. विधानसभा आम्ही जिंकू," हरिभाई बोलत होते. प्रश्नोत्तरं सुरू होण्याच्या आधीचं औपचारिक निवेदन. ते संपताच प्रश्नोत्तरं. आज थोडं अधिक सावध रहावं लागणार होतं. कारण गेल्या चार महिन्यांच्या खंडांनंतर 'एक्सप्रेस'चा शिशिर परतला होता. राज्यातील बारकावे त्याला जितके ठाऊक तितके इतर कोणाला नाहीत. त्यामुळं इतरांपेक्षा त्याला आणि 'हिंदू'च्या विपिनलाही, आजच्या घडामोडीत थोडा अधिक रस असणार हे नक्की.

"लोकांसमोर कोणते मुद्दे आहेत?" पहिला प्रश्न अगदी इतका सरधोपट असेल असं त्यांनाही वाटलं नव्हतं.

"मघा सांगितलं - राज्यातील साडेचार वर्षांचा गैरकारभार. सिंचनाचा, उद्योगाचा मागासलेपणा, वीजेचा तुटवडा, कायदा-सुव्यवस्था..." हरिभाई सांगत होते.

"तुमची भूमिका काय?" अपेक्षेप्रमाणे शिशिर.

"पक्षाचा विजय हीच भूमिका." हरिभाईंनी मिश्कील हसत थोडक्यात उत्तर देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न केला, पण शिशिर ऐकण्यातला नव्हताच.

"तुमच्यासह विजय की...?" त्यानं प्रश्न अर्ध्यावर सोडून दिला. त्याचा रोख स्पष्ट होता. प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार रामकृष्ण देसाई यांचा रस्ता साफ आहे, की वाटेत हरिभाई आहेत?

"नाही. माझ्यापुरता निर्णय मी घेतला आहे. मी निवडणूक लढवणार नाही. राज्यातील परिवर्तन हे महत्त्वाचं. मी त्यासाठीचा शिपाई होईन. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी संपूर्ण काळ प्रचारात उतरू देण्याची परवानगी मी आजच अध्यक्षांकडं मागितली आहे. उमेदवार ठरवण्यापेक्षा शेवटच्या मतदाराला थेट मतपत्रिकेवर आपल्यासाठी ठसा उमटवावयास लावणं मला महत्त्वाचं वाटतं..."

हरिभाई बोलत होते, बोलतानाच समोर पहात होते. एकेका चेहर्‍यावरच्या प्रतिक्रिया. त्यांना ठाऊक होतंच, ही घोषणा आत्ता या क्षणी 'ब्रेकिंग न्यूज' ठरेल. उद्याच्या वृत्तपत्रांत तिचं स्थान वेगळ्या चौकटीत असेल. रामकृष्ण देसायांना राज्याचा मार्ग मोकळा किंवा तत्सम अर्थ लावले जातील. आपण केंद्रातच राहणार आहोत हेही लिहिलं जाईल. ते समाधानाने किंचित हसले. पत्रकार परिषद संपताच त्यांच्याभोवती गराडा झाला. राज्याचा फेरफटका, मुलाखतीसाठी वेळ वगैरे गोष्टी ठरू लागल्या. आणि हरिभाई कामात गुंतत गेले.
---

राज्यातून दिल्लीत आल्यानंतरचे दिवस आणि आजचा दिवस यात काही साम्य आहे किंवा होतं का, या प्रश्नाचं उत्तर हरिभाईंना नंतर कधी देता आलं असतं की नाही हे सांगता येणार नाही. दिल्लीत आले त्या दिवशी त्यांच्यावर असणारी जबाबदारी, प्रवक्त्यांच्या अनुपस्थितीत ती खिंड सांभाळणं आणि प्रवक्ते दिल्लीत असतात तेव्हा पार्श्वभूमीवरचं काम करणं हीच होती. हिंदी, इंग्रजी या दोन्ही आघाड्यांवर तुलनेनं असणारी पंचाईत सततच मनाच्या पार्श्वभूमीवर असायची, त्यामुळं राज्याकडेच त्यांचं लक्ष असायचं. साधारण दोनेक महिन्यांत मात्र त्यांनी एका दिवशी निर्णय केला. मनाशीच. आता देशपातळीवरच काम करायचं. आठेक वर्षं झाली असतील त्या गोष्टीला. पण या काळात त्यांचा निर्णय कितीही पक्का असला तरी त्यांचं नाव राज्याशीच जोडलं जायचं आणि ते खोडून काढणं त्यांना कदापि जमलं नव्हतं. एकदाची राज्यात सत्ता आली आणि आपण तिथं गेलो नाही की मगच ते पक्कं बिंबेल असं त्यांना आताशा वाटू लागलं होतं आणि त्याचाच परिपाक म्हणजे दुपारी अध्यक्षांच्या दालनात जाताना झालेला निर्णय. अंदाज नेमका होता हरिभाईंचा. येत्या निवडणुकीत राज्यात सत्ता येणार हे नक्की. रामकृष्ण देसाई मुख्यमंत्रिपदी बसले की, आपण केंद्रात आहोत हे पक्कं होईल हा त्यांचा आडाखा. निवडणुकीच्या काळात स्वतःला राज्यात पूर्ण झोकून देताना जागोजागी ते देसायांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असाच करत गेले खरा, पण निकालाच्या दिवशी हरिभाईंच्या आयुष्यातील ते त्यांना न कळताच आलेलं वळण पक्कं होणार होतं.

हरिभाईंनी मुक्काम दिल्लीहून हलवला. प्रदेशातलं काम प्रदेशातूनच हाताळणं गरजेचं. पण तिथं असूनही निवडणुकीच्या पूर्वतयारीतील पक्षांतरं वगैरे हालचालींपासून हरिभाई लांब राहिले. पक्ष वाढतोय वगैरे ठीक, पण शेवटी फरक पडणार आहे तो मतांचाच. पक्षात येणारी मंडळी खरंच मतं आणू शकली तर उत्तमच. पण एरवी आपल्याच पक्षाचे मतदार बाहेर काढणं अधिक हिताचं, असं सांगत ते पडद्यामागे काम करत राहिले. उमेदवारांच्या निवडप्रक्रियेत त्यांनी भागच घेतला नाही. इतर पक्षांबरोबरच्या आघाडीचा प्रश्न नव्हता. त्यामुळं एरवी त्यांची सर्वाधिक ताकद जिथे लागायची ती आघाडी नव्हती. अशा गोष्टींसाठी पूल बांधण्याचं त्यांचं कौशल्य इतर पक्षातील नेतेही मान्य करत. संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी याआधी प्रदेशात राबवलेली 'हजारमें एक' योजना पुन्हा पुनरूज्जीवित केली. अवघ्या पंधरवड्यात! 'हरिभाई सांगतात' एवढंच त्यासाठीच्या त्या हजार मतदारांमागच्या बहुतांश एकेका कार्यकर्त्याला पुरेसं होतं.