स्वतंत्र साखळ्या
सकाळी उठल्यावर मी, हात
स्वातंत्र्याच्या साखळीत बांधतो
आणि मग हसत जगाला
माझे स्वातंत्र्य गीत सांगतो
समाजाच्या सूर्यात चकाकल्या कधी
तर साखळ्या, साखळ्या वाटत नाहीत
आणि अंधारात मात्र माझ्या-तुमच्या
साखळ्या वेगळ्या वाटत नाहीत
मला मिळालेले, कधी माझे नव्हतेच
मी दिलेले, कधी माझे नव्हतेच
विकत घेतलेले, कधी माझे नव्हतेच
दान केलेले, कधी माझे नव्हतेच
समाजाने लिहिले कायदे म्हणून
मी माझ्या स्वातंत्र्याचा चोर
आधी घातले जे हार गळ्यात
मग तेच झाले फाशीचे दोर
स्वतंत्रता शोधताना वाटते
मी या शोधात मुक्त नाही
माझे स्वातंत्र्य माझ्यात आहे
आणि मी स्वातंत्र्याचा भक्त नाही
'मला कशाचाही गर्व नाही'
याचाही माणसाला गर्व नसावा
'मी किती स्वतंत्र आणि मुक्त'
या स्वातंत्र्याचा पिंजरा नसावा