तीन खिन्न जाणिवा...

अनंत ढवळे

१.
उनाड पोरे भटकावीत रानोमाळ
तशा भटकत असतात
तिच्या आठवणी

उन्हातान्हात फिरून
मळकट होऊन
पोरे परतावीत घरी
तशा परतून येतात
काही धुरकट प्रतिमा

मग हात पाय धुऊन
पाटावर बसणाऱ्या निमूट पोरांसारख्या
शेजारी येऊन बसतात
तिच्या शब्दांच्या घुंगर मालिका

मेल्यागत झोपावीत
थकून भागून अवखळ पोरे
तशा डोळे मिटून घेतात
तिच्या इथे नसण्याच्या
तीन खिन्न जाणिवा...

२.
आई डबा देत बोलली होती काळजी घे
तिला झोप लागली नसेल रात्रभर
तिला जेवण गेलं नसेल अनेक दिवस
तिने बळेच ढकललं असेल काहीबाही पोटात
तू नाव कमावावंस किंवा पैसा मिळवावास
असं काहीच अपेक्षित नव्हतं तिला कधीही, तिला फक्त
पाह्यचा होता तुझा आनंदी चेहरा, तिला अजिबातच नको होतं
ट्रेनखाली चिरडलेला तुझा देह बघणं

आई डबा देत बोलली होती
काळजी घे.

३.
या झाडांच्या सावलीत अंग टाकावंस वाटतं
इथेच सोडून द्यावेसे वाटतात या रथाचे जखमी घोडे
बाहेर कुणीतरी सांडून ठेवलंय
उन्हाचं तेजाब
जाळून टाकलीए गवताची काडी न काडी
उसवून उचकून ठेवलीए
नांगरलेली जमीन

या झाडांच्या सावलीत अंग टाकावंस वाटतं
पानांपानांवरील रंध्रारंध्रातून विरून जावंस वाटतं
असण्यानसण्यापलीकडच्या प्रदेशात
जिथे शिजवावं लागत नाही रटरट रक्तमांस
किंवा मागावं लागत नाही घोटभर पाणी गावोगाव
जिथे होत नाही
आपली उभी हयात पंथानुगामी

या झाडांच्या सावलीत अंग टाकावंस वाटतं
संपवून टाकावीशी वाटते
ही अंतहीन परिक्रमा...