मेक्सिकन मेजवानी

वरदा व. वैद्य

१. एन्चिलाडा (Enchilada)

जिन्नस :

टॉर्टिया (मोठा आकार) - ६ (पोळ्याही वापरल्या तरी चालतील)
ब्रोकोलीची फुले - मूठभर
सिमला मिरची - अर्धी
झुकीनी - अर्धी
गाजर - १
अळंबी - बचकभर
फरसबी/श्रावण घेवडा - मूठभर शेंगा
कांदा - अर्धा
किसलेले चीझ - २ कप
एन्चिलाटा सॉस/स्पघेटी वा पास्ता सॉस - दीड कप
तेल वा बटर - २ चमचे
लसूण - २-३ पाकळ्या
मीठ, मिरपूड - चवीप्रमाणे

क्रमवार मार्गदर्शन :

सिमला मिरची, गाजर, अळंबी, झुकीनी, फरसबी व कांदा मध्यम आकारात चिरा. ब्रोकोलीची फुले फार मोठी असल्यास तीही चिरा. लसणीच्या पाकळ्या किसून तो गोळा एन्चिलाटा सॉस मध्ये मिसळा. एन्चिलाटा सॉस नसल्यास स्पघेटी वा पास्ता सॉस वापरला तरी चालेल. तोही नसल्यास टोमॅटो प्यूरीमध्ये मीठ, मिरपूड व किसलेल्या लसणीचा गोळा घालून तो सॉस वापरा. लसूण घातलेला सॉस गरम करून घ्या. सॉस फार पातळ नको.

दोन चमचे तेलावर सर्व भाज्या व कांदा घालून परता. मीठ घालून ढवळा व झाकण ठेवून मंद आचेवर थोडा वेळ शिजवा. भाज्या शिजायला हव्यात, मात्र फार शिजून गोळा होऊ देऊ नये. भाज्यांना फार पाणी सुटत असेल तर झाकण काढून शिजवा. भाज्या शिजल्यावर गॅस बंद करून त्यात मिरपूड, गरम केलेल्या सॉसपैकी अर्धा कप सॉस व पाऊण कप किसलेले चीझ घालून ढवळा.

ओवन ३५० डिग्री फॅरनहाईटवर तापण्यास ठेवा. बेकिंग डिशला आतून तेलाचा हात लावा, वा कुकिंग स्प्रे मारा, म्हणजे पदार्थ डिशला चिकटणार नाही. आता पोळपाटावर वा इतर सपाट पृष्ठभागावर टॉर्टिया ठेवून तिच्यावर थोडी भाजी पसरा. टॉर्टियाची शक्य तेवढी घट्ट गुंडाळी करून ती उघडणार नाही अशा पद्धतीने (सुटा भाग खाली येईल अशी) बेकिंग डिशमध्ये ठेवा. बाकी टॉर्टियांमध्येही भाजी घालून, गुंडाळी करून बेकिंग डिशमध्ये सर्व गुंडाळ्या एकमेकींशेजारी ठेवा. दोन गुंडाळ्यांमध्ये मोकळी जागा नको, म्हणजे गुंडाळ्या उघडणार नाहीत.

उरलेला सॉस थोडे पाणी घालून पातळ करून घ्या व तो सर्व गुंडाळ्यांवर सारखा ओता. वरून उरलेले चीझ घाला आणि बेकिंग डिश ओवनमध्ये ठेवा. वरून घातलेले चीझ वितळेपर्यंत ही डिश ओवनमध्ये गरम करा. बाहेर काढून गरम गरम वाढा.

एन्चिलाडाची तयारी

एन्चिलाडाची तयारी


एन्चिलाडा

एन्चिलाडा

२. कॅसडिया (Casadia)

जिन्नस:

टॉर्टिया - ४ (पोळ्याही वापरता येतील)
सिमला मिरची - अर्धी
कांदा - अर्धा
अळंबी - बचकभर
पालकाची पाने - ५-६
गाजर - अर्धे
चीझ - १ ते दीड कप
तेल वा बटर - ४ चमचे
सावर क्रीम - २ चमचे (ऐच्छिक)

क्रमवार मार्गदर्शन :

सर्व भाज्या मध्यम आकारात चिरून घ्या. पालकाची पाने चिरली नाहीत तरी चालतील. पसरट भांड्यात वा कढईत दोन चमचे तेलावर सर्व भाज्या परता. भाज्या पूर्ण शिजवू नका, थोड्या करकरीत राहू द्या. मंद आचेवर तवा ठेवा. तव्यावर थोडे तेल घालून त्यावर टॉर्टिया ठेवा. अर्धी भाजी टॉर्टियाभर पसरवून त्यावर वरून किसलेले चीझ घाला. आवडत असल्यास त्यावर सावर क्रीम घाला. वर दुसरी टॉर्टिया ठेवा. चीझ वितळायला सुरुवात झाली की टॉर्टिया उलटवा. चीझ वितळेपर्यंत थांबला नाहीत तर उलटवताना भाजी बाहेर सांडू शकेल. उलटल्यावर बाजूने थोडे तेल सोडा. उरलेली भाजी व उरलेल्या दोन टॉर्टियांचेही असेच करा. ह्या टॉर्टियांचे चार ते सहा त्रिकोणी तुकडे पाडा व गरमागरम वाढा.

कॅसडिया

कॅसडिया

३. टाको (Taco)

जिन्नस :
टाको - ६
लेट्यूस - अर्धा गड्डा
टोमॅटो - २
कांदा - पाव
किसलेले चीझ - १ कप
राजमा - १ कप
मीठ, मिरपूड
तेल - १ चमचा

क्रमवार मार्गदर्शन :

राजमा काही तास पाण्यात भिजत टाका. मीठ घालून कुकरमध्ये उकडून घ्या. दाणे मोडून पार लगदा होणार नाही असे पाहा. उकडलेल्या राजम्यातले पाणी काढून टाका. एक चमचा तेलावर राजमा परता. मिरपूड आणि गरज असल्यास मीठ घालून ढवळा.

कांदा व टोमॅटो बारीक चिरा. लेट्यूस उभा पातळ चिरा.

मायक्रोवेव ओवनमध्ये टाको अर्धा ते एक मिनिट गरम करा. गरम न करता घेतल्यास टाको चामट लागतात. गरम केल्याने टाको कुरकुरीत होतात. टाकोंमध्ये सर्वप्रथम थोडा राजमा, त्यावर चिरलेला टोमॅटो, त्यावर चिरलेला कांदा, त्यावर चिरलेला लेट्यूस आणि त्यावर किसलेले चीझ घाला. आवडत असल्यास वरून मस्टर्ड सॉस घाला आणि वाढा.

टाको

टाको

टीपा : सर्व मेक्सिकन पदार्थांसोबत सावर क्रीमचा लपका, ग्वाकामोल, चिरलेला लेट्यूस असे देतात. टाकोसाठी सहसा राजमा वापरत असले तरी बाकी कडधान्यांची उसळही चालू शकेल.

paNatee