प्रहार
प्रहार होता मानेवरती..
कोसळताना वृक्ष म्हणाला...
खरेच नाही धरणीमाते
दु:ख मरणाचे या मनाला..
खंत तरीपण जाता जाता
मनात माझ्या सलतच आहे..
आणि काळजावर नियतीचा
निष्ठुर काटा झुलतच आहे..
अशी खंत की ज्या दांड्याला
बिलगुन आहे कुर्हाडपाते
त्या दांड्याचे आणिक माझे
या जन्माचे आहे नाते