ग्रंथपालाला भेटलेली माणसे

केदार पाटणकर

पुस्तकेकोणत्याही ग्रंथपालाचा संबंध वाचकांशी नित्याचाच असतो. वाचकांव्यतिरिक्तही त्यांचा अनेकविध व्यक्तींशी संबंध येतो आणि आणि स्वभावाच्या पैलूंचे असे दर्शन होत जाते की पुस्तकांच्या अभ्यासापेक्षा या माणसांचेच वाचन बुद्धीला अंमळ अधिकच खाद्य पुरवून जाते.

ग्रंथालय आणि माहितीशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर लगेच मी एका सॉफ्टवेअर कंपनीतील ग्रंथालयात रुजू झालो. मला वरिष्ठ म्हणून एक महिला अधिकारी होती. ग्रंथालयाचे एकंदर व्यवस्थापन ती पाहायची व माझ्याकडे पुस्तकांच्या देण्याघेण्याचे काम होते. दिवसाला साधारण तीसजण पुस्तके घेण्यास-देण्यास येत असत. बहुतेकांचा दृष्टिकोन व्यवहार्य असे; पुस्तक द्यायचे वा घ्यायचे आणि निघून जायचे, वायफळ गप्पा मारत बसायचे नाही. जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ आणि डोळ्यांत आपलेपणा ग्रंथपालालाही ठेवावा लागतो. ही केवळ विपणन जमातीची मक्तेदारी नाही. ईश्वरी कृपेने माझा चेहरा देखणेपणाकडे झुकत असल्याने माझ्या या पेशात माझ्यासंदर्भात मूल्यवृद्धी झाली आहे. अनेक मुलींना मी कटाक्षाने हसूनच पुस्तक देण्याचा रिवाज ठेवला होता. एक मुलगी तर ग्रंथालयात नुसतीच वाचायला यायची आणि आवर्जून 'हाय, बाय' करायची. मीही तत्परतेने तिला प्रतिसाद देत असे. दिवस जात होते.

काही दिवसांनी एक ज्येष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर वाचक ग्रंथालयात प्रथमच आले. ते केरळचे होते. मी त्यांना ग्रंथालयाची ओळख करुन दिली. उत्तरोत्तर परिचय वाढत गेला. एकदा जेवणाच्या कँटीनमध्ये टेबलावर आम्ही एकत्र आलो आणि त्याचवेळी एकमेकांचा जवळून परिचय झाला. ग्रंथालयाचे वेळापत्रक काही दिवसांनी बदलले. पूर्वी नऊ ते सायंकाळी सव्वापाच असे असणारे ग्रंथालय सायंकाळी साडेसातपर्यंत सुरु ठेवण्याचे ठरले व माझ्या 'बॉस' ने मला सांगितले की, तू उद्यापासून दुपारी बारा ते सायंकाळी साडेसात या वेळात कंपनीत ये. तसे मी माझ्या वरिष्ठांशी बोलून ठेवले आहे. मी 'जो हुकुम मेरी अक्का' असे मनात म्हणालो. साडेपाच व साडेसात अशा दोन्ही वेळांना घरी जाण्यासाठी कंपनीने बसेसची सोय केली होती. बहुतेक सर्वजण साडेपाचलाच घरी गेलेले असत. साडेपाचनंतर कंपनीत तुरळक प्रमाणातच लोक असत. नव्या आदेशानुसार मीही त्या लोकांच्यातील एक झाल्याने साडेसातला घरी जाऊ लागलो. वाचक साधारणपणे साडेसहापर्यंत येत असत. त्यानंतर ग्रंथालयात आणि एकूण कंपनीच्या आवारात सामसूम होत असे. मी जिथे बसत असे, तिथे डावीकडे एक खिडकी होती. तिथून कंपनीत येण्याचा रस्ता, बसेस व कँटीन असे दिसत असे. साडेसहानंतर तो परिसर अगदीच अंधारून जात असे. सूर्य मावळतीकडे झुकलेला असे. त्या अंधाराचा ग्रंथालयातील वातावरणावर परिणाम होऊन कपाटे, पुस्तके झाकोळली जात. सॉफ्टवेअर इंजिनिअर जेथे काम करायचे तेथून ग्रंथालय दूर होते, त्यामुळे बोलायचे म्हटले तरी कोणाशीही बोलता येत नसे. मी एखादे पुस्तक घेऊन माझ्यापुरता दिवा लावून वाचत बसे. अशाच एका संध्याकाळी मी वाचत बसलो होतो आणि तेव्हा ते गृहस्थ आले. काही वेळ ग्रंथालयात थांबल्यानंतर ते निघाले. ते कदाचित उशिरापर्यंत कंपनीत थांबणार असावेत. माझ्या साडेसातच्या बसला अवकाश होता. माझ्या टेबलजवळ दोन क्षण थांबले. काहीतरी जुजबी चौकशी केली. मी वेगवेगळे विषय काढून गप्पा वाढविण्याचा प्रयत्न केला. अखेर निघताना म्हणाले, "आज तू एकटा आहेस तर!" एकच वाक्य. माझ्या मनाच्या वातावरणातील एकटेपणा जाणून त्यांनी मृदु स्वरात काढलेले उद्गार माझ्या अजूनही लक्षात आहेत.

कालांतराने कंपनी बदलली. 'टेक्निकल एनव्हिरॉनमेंट' तशीच होती. 'टेक गुरुं'चे चेहरे व कंपनीचे नाव फक्त वेगळे. कंपनीत एकदा एक मुंबईचे अधिकारी शुक्रवारी एका प्रकल्पानिमित्त आले. ग्रंथालयाला दुपारी सहजच भेट दिली. पुस्तके चाळता चाळता त्यांची अनुभवी दृष्टी एका पुस्तकावर पडली आणि 'आपल्याला हवं ते हेच', हे त्यांच्या चेहर्‍यावर दिसू लागले. हे पुस्तक मिळू शकेल का, असे त्यांनी मला विचारले. कर्मचारी आपल्याच कंपनीचा असला तरी बाहेरच्या शाखेतील कर्मचार्‍यांना पुस्तक देण्याची आमच्या ग्रंथालयाची पद्धत नव्हती. कंपनीच्या त्या त्या शहरातील ग्रंथालये समृद्ध असतातच. दुसर्‍या शाखेकडून पुस्तक मागविण्याची वेळ क्वचितच येते. अधिकार्‍याच्या चेहर्‍यावरील आत्यंतिक निकड मी वाचू शकत होतो. शुक्रवारीच पुस्तक घेऊन मुंबईकडे प्रयाण करण्याचा त्याचा बेत होता. ताबडतोब पुस्तक द्यावे, असे वाटत होते. प्रसंग अपवादात्मक होता म्हणूनच वरिष्ठांच्या संमतीशिवाय मी निर्णय घेऊ शकत नव्हतो. माझी कार्यालयीन पातळी कनिष्ठ होती. निर्णय त्वरित घेणे आवश्यक होते. सायंकाळपर्यंत कळवतो, असे मी त्याला सांगितले. तो ग्रंथालयाबाहेर पडल्यानंतर मी आमच्याच शाखेतील पण निराळ्या कार्यालयातील माझ्या वरिष्ठ महिला ग्रंथपालाला (कंपनीच्या भाषेत 'लायब्ररी एक्झिक्युटिव्ह') दूरध्वनी लावला. तिच्याही कारकीर्दीतील बहुधा तो पहिलाच प्रसंग असावा. तिने बराच वेळ कोणाला पुस्तक हवे आहे, कशासाठी हवे आहे अशी चौकशी केली. 'पुस्तक ताबडतोब देऊ नको. दोन दिवस जाऊ देत. मी माझ्या वरिष्ठाशी चर्चा करते व कळवते' असे तिने सांगितले. चर्चेनंतर सोमवारी पुस्तक पाठवले गेले. उशिरा का होईना, पुस्तक गरजवंताच्या हातात पडले या समाधानात मी होतो. बुधवारी मला मुंबईहून त्या अधिकार्‍याचा दूरध्वनी आला. माझ्याशी दोन शब्द बोलून त्याने मला त्याच्या अधिकार्‍याशी जोडून दिले. पाच एक मिनिटांनी मी दूरध्वनी खाली ठेवलेला होता आणि पुढचे काही क्षण माझ्या कानात 'इतका उशीर करून चालत नाही. लगेच पुस्तक द्यायला पाहिजे होतं. दोन दिवस वाया गेले' इतकेच शब्द घुमत होते. मी स्वतःला शांत केले. दीर्घ श्वास घेतला. माझ्या 'एक्झिक्युटिव्ह'चा क्रमांक फिरवला आणि घडलेले तिच्या कानावर घातले. ती मात्र 'आपण केले ते योग्यच केले', या भूमिकेवर ठाम होती. मन पूर्ण स्थिर झाल्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात आली. स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी आपल्याला सांगत होती की, ते पुस्तक लगेच देऊन टाकावे. अधिकारी आपल्याच कंपनीचा असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नव्हती. नंतर पुस्तक मागून घेता आले असते. आपली कार्यालयीन पातळी कनिष्ठ असली तरी सद्सद्विवेकबुद्धीला अनुसरून गोष्ट केली असती तर मनस्ताप भोगावा लागला नसता. आपण काय आणि का केले, हे वरिष्ठांपुढे प्रामाणिकपणे मांडता आले असते. या प्रसंगातून एक धडा मिळालाः सद्सद्विवेकबुद्धीला अनुसरून निर्णय घ्यायचे. घेतलेल्या निर्णयाचे समर्थन आत्मविश्वासाने आणि तितक्याच प्रामाणिकपणे करायचे. नुकसान तर होत नाहीच, झाला तर फायदाच होतो.

ग्रंथालय आणि माहितीशास्त्रातील प्रणाली बनविणार्‍या एका कंपनीशी मी काही काळ संलग्न होतो. बनविलेली प्रणाली ग्रंथालयांना दाखविणे आणि पसंत असल्यास ती विकणे, ती कशी वापरायची याचे पूर्ण तांत्रिक लेखन करून संबंधित ग्रंथालयाला सॉफ्टवेअरसोबत देणे हे माझे काम होते. एका ग्रंथालयाने आमची प्रणाली घेतलेली होती. प्रणालीत आम्ही केलेल्या सुधारणा दाखविण्यासाठी या ग्रंथालयाला पुन्हा भेट देऊन तेथील सर्व ग्रंथपालांना या सुधारणा समजावून सांगायच्या होत्या. रीतसर वेळ ठरवली गेली आणि मी तेथे हजर झालो. केबिनमध्ये शिरण्यापूर्वी दारातच मी ग्रंथपालांना ओळख करुन दिली. 'बसा', 'या, या', 'मी वाटच पाहत होते'...यापैकी एखाद्या प्रतिसादाची मला अपेक्षा होती. जवळजवळ दोन मिनिटे त्या बाईसाहेब माझ्याकडे पाहत होत्या. मग, त्यांच्या डोक्यात एक एक दिवा लागत गेला. त्या दोन मिनिटांचा समारोप 'मी पूर्ण विसरले होते' या उद्गारांनी झाला. खूप आधी चर्चा करून जवळजवळ पूर्ण दिवसासाठी ठरवलेली वेळ या बाई विसरल्या होत्या. 'आपण पुन्हा केव्हातरी वेळ ठरवायची का' असे त्या बाई म्हणू लागल्या. नवा दिवस ठरवण्याची विनंती तुम्हीच करा असे त्या म्हणू लागल्या. पण मी त्यांच्या या बोलण्याला न बधता त्याच दिवशी ठरलेले काम पूर्ण करून आलो. नंतर त्यांना आमच्या कंपनीच्या मालकांचा रोष पत्करावा लागलाच.

एका महाविद्यालयात याच कंपनीतर्फे मी प्रणालीचे मार्गदर्शन करण्यास गेलो होतो. हल्ली महाविद्यालयातदेखील कंपनीप्रमाणे एक 'एक्झिक्युटिव्ह' नेमलेला असतो. (सळसळता, ताबडतोब निर्णय घेणारा, प्रत्येक कामाच्या निकालाकडे लक्ष असणारा वगैरे वगैरे वगैरे.) काम संपल्यावर मी ग्रंथपालाशी गप्पा मारत बसलो असताना महाविद्यालयातील असेच एक अधिकारी तिथे आले व पुस्तके कशी लावावीत हे ग्रंथपालांना सांगू लागले. पूर्वीही येऊन त्यांनी असे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला होता. ग्रंथपालांना ते पटत नव्हतेच. ग्रंथपाल त्यांना पुस्तके लावण्याची आदर्श पद्धत सांगू लागले पण हे गृहस्थ ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. 'सत्तेपुढे शहाणपण चालत नाही', अशा आशयाचे कटाक्ष ग्रंथपाल अधून मधून माझ्याकडे टाकत होते. अखेर मी हस्तक्षेप करून ग्रंथपालांची बाजू घेतली व त्या अधिकार्‍यांना सांगितले, "पुस्तके कशी लावावीत याचे ज्ञान ग्रंथपालांना आहे. ते ग्रंथालयशास्त्रातील पदवीधर आहेत. त्यांना स्वतःचे काम करु द्या." आमची बाजू बळकट झालेली पाहून ही सळसळ थंड पडली.

या एक्झिक्युटिव्हजना जेम्स बॉंडप्रमाणे कुठेही प्रवेश करून काहीही करण्याची मुभा हल्लीच्या कॉर्पोरेट जगताने दिलेली आहे पण ही मुभा कधी कधी घुसखोरी ठरते याचा विसर या जगताला पडलेला आहे. नुकतीच एका बाईंडरला काही पुस्तके बाईंडिंगसाठी दिली होती. खराब झालेले असले तरी शक्यतो मुखपृष्ठ तसेच ठेव, ही सूचना केली होती. तयार पुस्तके घेऊन आल्यावर पाहतो तो काय, याने मुखपृष्ठ तर ठेवलेच नव्हते उलट सर्व पुस्तकांना लाल रंगांची मुखपृष्ठे लावून टाकली होती. बाईंडरला देण्यापूर्वी कुठले पुस्तक आहे, हे लांबूनही ओळखता येत असे. आता सगळी पुस्तके विटांसारखी दिसत होती. मी विचारले, "अरे सर्वच पुस्तकांना तू लाल रंगांचा कागद का वापरलास? तो म्हणाला, "आमच्याकडे या एकाच रंगाचा कागद होता. म्हणून सगळ्यांना लाल करुन टाकलं..."

पुस्तकांच्या दुनियेतील असा माणसांचा, अनुभवांचा झरा. न आटणारा.

paNatee