भातुकलीचा डाव

पृष्ठ क्रमांक

सोनाली जोशी

रशियन बाहुल्या

सुनीताने खिडकीतून बाहेर बघितले. संधिप्रकाश नाहीसा होऊन अंधार पडला होता. ऑफिसात शुकशुकाट होता. तिच्या शेजारची क्युबिकल्स पाच वाजल्यापासूनच एक एक करत रिकामी झाली होती. तिचे सहकारी घर-संसार, मुले, पब, टीव्हीवरचे कार्यक्रम यांत मग्न झाले होते. आज फक्त सोमवार. आताच असे निराश झालो तर कसे? तिने पुन्हा प्रोजेक्टचे तपशील बघायला सुरुवात केली. दहा वाजल्यावर तिने लॅपटॉप बंद केला. रात्री शुकशुकाट असताना भल्यामोठ्या पार्किंगलॉट मधून गाडी काढायची तिला भीती वाटे. उगीच आणखी उशीर नको असे म्हणत दहा वाजता ती बाहेर पडत असे. कशाची भीती वाटते नक्की? कुणी न्यावे, हिसकावून घ्यावे असे काय होते तिच्याकडे? आणि लवकर घरी गेली म्हणून आनंदणारे तरी कोण होते? उशीर झाला म्हणूनही काही बिघडणार नव्हते. कुणी ताटकळणारे नव्हते, कुणी हटकणारे नव्हते, कुणी रुसणारेही नव्हते. म्हणून मग हे असे काम उकरून काढत काढत रात्री उशिरापर्यंत थांबायचे. नेहमीप्रमाणे शुक्रवारपर्यंत आठवडा ढकलायचा. लोकांना चघळायला आपला विषय नको म्हणून शेवटी शुक्रवारी साडेतीन वाजताच ती निघायची. मैत्रीण येणार आहे, घरी गेटटुगेदर आहे, बाहेरगावी जात आहे, असे ठराविक साच्यातले उत्तर ती द्यायची. त्यावेळी चेहर्‍यावर उत्सुकता, आनंद, गोंधळ-गडबड; जो काही भाव आवश्यक असेल तेवढा ती आणत असे. त्यानंतर घराजवळच्या एक आर्ट स्कूलमधे ती शिकवायची. चित्र काढणे, रंगवणे, ग्लास पेंटींग, शिल्पकला, जे काही असेल ते. लहान मुलांना शिकवण्यात एक वेगळा आनंद मिळायचा तिला. जवळजवळ सगळी मुले गोरी अमेरिकन, तुरळक आफ्रिकन अमेरिकन, काही चिनी,जपानी आणि एखादेच वाट चुकलेल्या कोकरासारखे भारतीय वंशाचे पोर यायचे तिच्या क्लासला.

यांत्रिकपणे पर्स उचलून सुनीता लिफ्टमधे शिरली. लिफ्टच्या काचेतून उंच इमारती दिसत होत्या. आतले दिवे सुरु होते. उद्या त्या इमारतींपैकी चारपाच गायब झाल्या किंवा आणखी पाच सात कुणी रातोरात उभ्या केल्या तरी काय फरक पडणार होता? पहिली नोकरी सुरु केली तेव्हा याच इमारतींचे, दिव्यांचे किती अप्रूप होते! तिच्याबरोबर फिरताना विक्रमने तिथे किती फोटो काढले होते. तिथल्या वेगवेगळ्या रेस्तराँमध्ये ती त्याच्या बरोबर गेली होती. लग्न एका महिन्यावर आले असताना विक्रम ते मोडून, तिला एकटे सोडून गेला. मग कशाचीच गोडी उरली नाही. सगळे मिळूनही न मिळाल्यासारखे. पहिले टाऊनहाऊस, दुसरे नवे घर, नवी गाडी, नवे कपडे, सणवार, माणसे, नोकरी, बढती ... सगळ्याच गोष्टींमधला आपला रस कमी झालाय - तिला वाटायचे.

गाडी हमरस्त्याला लागली तशी तिची घालमेल संपली. पण काही सेकंदच. रस्त्यावरचे ट्रक, एखाद-दुसरी गाडी तेवढी सोबत होती. मग घर आले की पुन्हा न संपणारे एकटेपण. चाळीस मिनिटे गेली आणि तिचे घर आले. तिने गाडी पार्क केली. आत शिरताना तिने आजूबाजूला सहज एक नजर टाकली. जवळजवळ सगळीकडे निजानीज झाली होती. वरवर सारख्या दिसणार्‍या टाउन हाउसेसमध्ये राहणारी भिन्न वंशांची, भिन्न आवडीनिवडींची, वेगवेगळ्या रंगांची, वेगळी ध्येये, वेगळे भूतकाळ असलेली माणसे. वेगवेगळ्या कारणाने त्या एका ठिकाणी राहायला आलेली. ती सर्व शिरतात ते फाटक एकच आहे, एवढचे साम्य. बाकी अनोळखी माणसांसारखे एकमेकांना भेटतात. ते सुद्धा कधीतरी. कुणास ठाऊक विक्रमही असाच भेटेल ... अनोळखी माणसासारखा...त्याच्या सगळ्या आवडीनिवडी वेगळ्या, वागणे वेगळे, मते वेगळी.. किती जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता आपण...

रविवारीच तिने दोन दिवसाच्या भाज्या करून ठेवल्या होत्या. पोळ्याही आणल्या होत्या. तिने फ्रिज उघडून बशी भरून घेतली, मायक्रोवेव ओव्हनमध्ये ठेवली. फ्रीजमधले सॅलड बाहेर काढले. बशी घेऊन ती कोचावर जेवायला बसली. रिमोटची बटने दाबत तिने भरभरा चॅनेल्स बदलली. जेवण होत आले तरी तिला कुठलाच कार्यक्रम बघावासा वाटला नव्हता. विक्रममधे न गुंतता राहिलो असतो तर एकटेपणा कदाचित सुसह्य झाला असता. आता तर 'तुम क्या गये के रूठ गये दिन बहार के' असेच गेली सहा सात वर्षे चालू आहे. विरंगुळा आहे फक्त आर्टस्कूलचा, तिथली मुले... विक्रम नको म्हणत असताना तेव्हासुद्धा आपण आर्टस्कूलमधे जात होतो. ते तसेच चालू ठेवले म्हणून बरे झाले.

कितीतरी रात्री तिने घरी चित्रे काढण्यात घालवल्या होत्या. पुन्हा सकाळ झाली की ऑफिस. पण टाळले तरी कागदावर तिचे एकटेपणच उतरत असे. मनातला निरुत्साह गडद रंगात कागदावर येई. आर्टस्कूलमधली लहान मुले मात्र त्या एकटेपणाला दूर पळवत असत. सगळी निराशा, सगळे अपमान, आपली एकटेपणाची जाणीव तिथे जेव्हा चिमुकल्यांसमोर रंगात भिजते, कापडावर कागदावर येते तेव्हा रसरशीत होते, तेजस्वी होते. सृजनाचा स्पर्श होतो, एकटेपण गळून पडते... पण अवेळी काय करायचे? टीव्ही बंद करून साडेअकराच्या दरम्यान तिने डोळे मिटून घेतले. आणखी जास्त वेळ असे एकटे जागत राहायचे, म्हणजे पुन्हा विचार सुरु, पुन्हा विक्रम, पुन्हा वेढून घेणारे ते एकटेपण...जागेपणी खोलवर रूतणारी एकटेपणाची बोच बंद पापण्यातून आणखीच आत आत टोचत राहिली.

कंटाळवाण्या तासन् तास चालणार्‍या मिटिंगा, कुठलेतरी प्रशिक्षण, टीम लंच, टेलिकॉन्फरन्सेस, अहवाल, प्रोजेक्टचे काम यात नेहमीप्रमाणे उरलेले चार दिवस गेले. आर्टक्लासला सोहन नावाचा एक भारतीय मुलगा यायचा. त्याला तू शनिवार-रविवार सांभाळशील का असे त्याच्या पालकांनी विचारले होते. सहासात वर्षाच्या मुलांना थोडा वेळ शिकवणे वेगळे आणि सांभाळणे वेगळे. पण कुठल्यातरी आंतरिक शक्तीने तिच्याकडून तेव्हा 'हो' वदवून घेतले होते. शुक्रवारी रात्री ती सोहनच्या घरी गेली. सोहनच्या आईने दार उघडले. सोहन तिच्या मागे लपला होता.

"हाय, मी रेवती आणि हा सोहन." सोहनच्या आईने ओळख करून घेतली.

"सोहन, ही सुनीता. विकेंडला ती बेबीसिट करेल तुला." सोहनकडे वळून ती म्हणाली.

सुनीताचे निरीक्षण सुरु होते. साधारण आपल्याच वयाची असेल रेवती. किंवा त्याहून कमीच. ऑफिसातून आली असावी असे तिच्या फॉर्मल कपड्यांवरून वाटत होते. तिने हलकासा मेकअप केला होता. वागण्याबोलण्यात सहजता होती, आत्मविश्वास होता.

रेवतीने त्याला वाचून दाखवायची पुस्तके तिच्या सुपूर्त केली. त्याच्याकडून वर्डलिस्ट करून घे, त्याला मराठीच्या क्लासला घेऊन जा, शिवाय कुमॉनच्या क्लासची गणिते घे सोडवून असे बरेच काही रेवतीने सांगितले. सोहनचे वडील गप्प होते. सोहनचा निरोप घेऊन सुनीता घरी आली. लहान मुलांसाठीची संकेतस्थळे तिने शोधली. वाचनालयात, पुस्तकाच्या दुकानात मुलांसाठी असलेले कार्यक्रम बघून ठेवले. तिच्या पुतण्या, भाचे यांची भारतातली ऐकीव माहिती आणि अमेरिकेतल्या मित्रमैत्रिणींची मुले तिने बघितली होती. एकदोनदा दोनचार तास त्यांना सांभाळले सुद्धा होते. पण सगळा दिवस एखाद्या मुलाला सांभाळणे?


दुसर्‍या दिवशी ती सोहनच्या घरी पोहोचली तेव्हा रेवती वाट बघत उभी होती. सोहनचे बाबा पहाटेच बाहेरगावी गेले होते. विकेंड असूनही रेवतीला ऑफिसच्या कामामुळे सोहनकडे बघता येणार नव्हते.

"सोहन थोडा जास्त इमोशनल आहे, इतर मुलांपेक्षा. चटकन चिडतो, हट्ट करतो. सांभाळून घे त्याला."
"हो, घेईन."

दोघींचे बोलणे सुरु होते आणि सोहनचा आरडाओरडा...

रडत सोहनने आईचा निरोप घेतला. मला ही बेबीसिटर नको असा त्याचा घोषा चालूच होता. सुनिताने सोहनच्या खोलीतला टीव्ही चालू केला. 'टॉम ऍन्ड जेरी'चा आवाज ऐकून सोहन कोचावर येऊन बसला. टॉम ऍन्ड जेरी बघता बघता त्याचा मूड बदलला होता. सुनीताच्या हातात किटकॅट पाहून सोहनने हात पुढे केला. सुनीताने त्याला किटकॅट दिले.

"कुठे जायचं? काय करायचं आज?"

"काही नाही , आय ऍम बोअर्ड." किटकॅट संपवत सोहन म्हणाला.

"मला सुद्धा काही करावंसं वाटत नाही."

"मग इथे का आलीस?"

"तुझ्याशी खेळायला. तुझी बाईक काय मस्त आहे! येते तुला चालवता?"

"आय कॅन रेस विथ यू. तू बाबाची बाईक घे."

उड्या मारत सोहन हेल्मेट आणि नी-पॅड खालून तयार झाला. दोन्ही बाईक आपल्या गाडीत घालून सुनीता सोहनला घेऊन बाईक ट्रेलवर आली. बाईक चालवतांना सोहनच्या गप्पा चालू होत्या.

"मी ख्रिस्तीन बरोबर जातो या बाईक ट्रेलवर. आई दुसर्‍या घरात राहते. तिचं ऑफिसचं काम खूप वाढलं आहे. बाबा इथे असतो तेव्हा मी इथे राहतो आणि काही दिवस आईकडे. पण शाळेतून घरी आलो की ख्रिस्तीन बघते माझ्याकडे."

"हो, मला माहिती आहे ख्रिस्तीन. आर्टक्लासला ती तुला न्यायला येते."

"तुझ्या घरी कोण असतं?" सोहनचे प्रश्न सुरु होते. सुनीता न कंटाळता उत्तरे देत होती. हा मुलगा झोपेतही बडबडत असावा असा विचार सुनीताच्या मनात डोकावला.