पैज
लेखकाचे मनोगत - अपराध आणि त्याबद्दल केली जाणारी शिक्षा, हा साहित्यातला एक सनातन विषय आहे. महाकाव्यांपासून धार्मिक ग्रंथांपर्यंत या ना त्या स्वरूपात तो मांडला गेला आहे. शेक्सपिअरच्या 'हॅम्लेट' या नाटकाचं मूळ ज्या कथेत शोधता येतं, त्यात गुन्ह्याची शिक्षा देण्याची जबाबदारी सर्वशक्तिमान परमेश्वरावर सोपवावी की मर्त्य मानवालाही तो अधिकार आहे; यावर खल केलेला दिसतो. दोस्तोएव्हस्कीच्या 'क्राईम ऍंड पनिशमेंट'मध्ये रास्कोलनिकोव्हच्या मनात चालणारं द्वंद्वही याच विषयाशी संबंधित आहे.
अन्तोन चेकॉव्ह हा एकोणिसाव्या शतकातला रशियन लेखक आणि नाटककार. सार्वकालिक श्रेष्ठ लघुकथालेखकांत ज्याची गणना होते, अशा चेकॉव्हची 'द बेट' ही कथा देहदंड आणि आजन्म कारावास या शिक्षांच्या तुलनेचा मागोवा घेते. सर्वस्वी भिन्न विचारसरणी, आयुष्य असणार्या दोन व्यक्तींची यावरून लागलेली विचित्र पैज, त्या दोघांची आयुष्यं आणि जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आमूलाग्र बदलून टाकते; त्याची ही छोटी पण प्रभावी कथा. तिचा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न पुढील पानांत केला आहे.
ऐन हिवाळ्यातली काळोखी रात्र होती. आपल्या दिवाणखान्यात वृद्ध सावकार विचारात गुंग होऊन येरझारा घालत होते. पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका हिवाळी संध्याकाळी आपल्या घरी झालेली पार्टी त्यांना आठवत होती. त्या पार्टीत आलेले लोक आणि रंगलेल्या चर्चा त्यांना आठवत होत्या. इतर अनेक विषयांबरोबरच त्या सर्वांची देहदंडाच्या शिक्षेबद्दल चर्चा झाली होती. आलेल्या पाहुण्यांत मुख्यत: पत्रकारांचा आणि बुद्धिजीवी लोकांचा भरणा होता; आणि त्यातले बहुसंख्य लोक देहदंडाच्या शिक्षेविरुद्ध होते. त्यांच्या मते ही शिक्षा कालबाह्य, अनैतिक आणि ख्रिश्चन तत्त्वांवर आधारित राष्ट्राच्या दृष्टीने अयोग्य होती. काहींच्या मते, सरसकट देहदंडाऐवजी आजन्म कारावासाची शिक्षा अंमलात आणायला हवी होती. "छे!" यजमान सावकारांनी आता चर्चेत भाग घेतला, "मला काही देहदंडाचा किंवा आजन्म कारावासाचा अनुभव नाही म्हणा, पण तरी ठरवायचंच झालं तर अपराध्याच्या दृष्टीने देहदंडाची शिक्षा ही संपूर्ण जन्म तुरुंगात घालवण्यापेक्षा केव्हाही अधिक दयाळू आणि नैतिक आहे. देहदंड म्हणजे एका फटक्यात जीव जातो, पण आजन्म कारावास म्हणजे हळूहळू झिजून माणूस मरतो. मला सांगा, कोणती शिक्षा अधिक मानवी आहे - जी काही मिनिटांत संपते ती की जी वर्षानुवर्षं सावकाश तुमचा जीव घेत राहते?"
"दोन्ही शिक्षा तितक्याच अनैतिक आहेत," एक पाहुणा म्हणाला, "कारण शेवटी कुणाचा तरी जीव घेणं हाच त्यांचा हेतू असतो. सरकार म्हणजे काही देव नव्हे. जी गोष्ट परत करणं शक्य नाही, ती हिरावून घेण्याचा अधिकार सरकारला नाही."
पाहुण्यांमध्ये पंचविशीतला एक तरुण वकीलही होता. त्याचं मत विचारल्यावर तो म्हणाला, "दोन्ही शिक्षा तितक्याच अनैतिक आहेत हे खरं. पण निवड करायचीच झाली तर मी आजन्म कारावास निवडेन. मरण्यापेक्षा कसंही का होईना, पण जगणं महत्त्वाचं."
चर्चेला आता रंग चढला. सावकारांचंही तेव्हा वय झालेलं नव्हतं, आणि अशा वादविवादांत ते हिरिरीने भाग घेत. टेबलावर मूठ आपटत तावातावाने ते म्हणाले, "काहीही काय बोलतोस? मी दोन लाखांच्या पैजेवर सांगतो की तू पाच वर्षांच्यावर टिकायचा नाहीस एकांतवासाच्या शिक्षेत."
"तुम्ही हट्टालाच पेटला असाल तर मीपण पैज लावतो. पाच काय, मी पंधरा वर्षं राहून दाखवेन!" तो तरुण म्हणाला.
"पंधरा? ठीक तर!" सावकार उद्गारले, "लोकहो, मी दोन लाख लावतो या पैजेवर!"
"कबूल. तुम्ही तुमची संपत्ती पणाला लावा, मी माझं स्वातंत्र्य!" तरुण म्हणाला.
आणि अशा प्रकारे ही विचित्र, अकल्पित पैज ठरवली गेली. लक्षाधीश सावकार ह्या पैजेने आनंदून गेले. जेवताना त्या तरूणाची थट्टा उडवत ते म्हणाले, "अजून वेळ गेलेली नाही, तोवर विचार कर पोरा. माझ्या दृष्टीने दोन लाख म्हणजे काहीच नाहीत, पण तू मात्र तुझी उमेदीची तीन-चार वर्षं गमावून बसशील. तीन-चारच म्हणतोय कारण तुझा त्याहून अधिक निभाव लागेल असं वाटतं नाही. शिवाय अशी स्वत:हून लादून घेतलेली शिक्षा ही अधिक कठीण असते, हे विसरू नकोस. मनात येईल तेव्हा स्वतंत्र होता येईल ही जाणीव, तू कैदेत असताना सतत तुला छळत राहील."
आणि आता पंधरा वर्षांनी, येरझारा घालत असताना ह्या सार्या गोष्टी सावकारांना आठवल्या. स्वत:शीच ते म्हणाले, "काय अर्थ होता त्या पैजेला? मी माझे दोन लाख आणि त्याने आपल्या आयुष्यातली पंधरा वर्षं गमावून काय मिळवलं? काही झालं तरी याने देहदंड अधिक चांगला की आजन्म कारावास, हे सिद्ध होणार आहे का? छे! सगळंच निरर्थक. मी माझ्या संपत्तीच्या गुर्मीत पैज लावली आणि त्याने निव्वळ पैशांच्या लोभाने त्यात भाग घेतला..."
पंधरा वर्षांपूर्वी त्या संध्याकाळी, नंतर काय घडलं हे त्यांना आठवलं. अगदी कडक देखरेखीखाली, सावकारांच्या घराजवळच्याच एका बंगलीत तो तरूण कैदेत राहील, असं ठरवण्यात आलं. त्याने पूर्ण पंधरा वर्षं त्या बंगलीचा उंबरा न ओलांडता, कुणालाही न भेटता, कुणाचंही बोलणं ऐकू येणार नाही अशा खोलीत, बाहेरून येणारी पत्रं आणि रोजची वृत्तपत्रं यांच्याशिवाय काढायची होती. एक वाद्य आणि पुस्तकं बाळगण्याची जशी त्याला अनुमती होती; तशीच वाईन पिण्याची आणि धूम्रपानाचीही होती. मात्र अटींप्रमाणे बाहेरच्या जगाशी त्याचा संपर्क एका मुद्दाम बनवून घेतलेल्या छोट्या खिडकीमार्फतच येणार होता. पुस्तकं, संगीत, वाईन - जे काही त्याला हवं असेल, जितक्या प्रमाणात हवं असेल ते त्याला लिहून मागवता येणार होतं; पण हे सारं त्या खिडकीतूनच त्याला दिलं जाणार होतं. त्याची कैद म्हणजे पुरेपूर एकांतवास असेल याची त्या करारात पूर्ण दक्षता घेण्यात आली होती. १४ नोव्हेंबर १८७० रोजी, दुपारी बरोबर बारा वाजता हा कारावास सुरू होऊन १४ नोव्हेंबर १८८५च्या दुपारी बारा वाजता संपणार होता. वेळ संपायच्या अगदी दोन मिनिटं आधी जरी त्या तरूणाकडून करारातल्या अटींचं उल्लंघन झालं असतं, तरी सावकारांची दोन लाखांच्या वायद्यातून सुटका झाली असती.
त्या तरूणाच्या रोजनिशीवरून ठरवायचं झालं तर कैदेचं पहिलं वर्ष त्याच्या दृष्टीने अतिशय एकाकीपणाचं आणि निराशेचं होतं. रात्रंदिवस सतत बंगलीतून पियानोचे सूर ऐकू येत. वाईन आणि तंबाखू मात्र त्याने नाकारले. 'वाईनमुळे इतर अनेक इच्छा मनात जाग्या होतात. अशा एकांतवासात अतृप्त इच्छांच्या थैमानाहून अधिक वाईट असं काय असू शकेल? शिवाय एकट्यानेच उंची वाईन पिण्यात आणि धूम्रपान करून खोलीतली हवा कोंदून टाकण्यात काय हशील!?' अशी नोंद त्याच्या रोजनिशीत सापडते. त्या पहिल्या वर्षात त्याने जी पुस्तकं मागवली, ती बरीचशी हलकीफुलकी होती - प्रेमाचं वर्णन करणार्या कादंबर्या, सनसनाटी कहाण्या अशी.
दुसर्या वर्षी बंगलीतला पियानो मूक झाला आणि कैद्याने फक्त जुन्या, क्लासिक परंपरेतल्या पुस्तकांची मागणी केली. पाचव्या वर्षी संगीत पुन्हा ऐकू याऊ लागलं आणि कैद्याने वाईन मागवली. त्याच्यावर खिडकीतून लक्ष ठेवणारे रखवालदार सांगतात की ते पूर्ण वर्ष त्याने खाणे-पिणे, पलंगावर पडून राहणे, जांभया देणे आणि स्वत:शीच रागारागाने पुटपुटणे याशिवाय काहीच केले नाही. पुस्तकं न वाचता पडून राहिली. काही वेळा तो रात्री तासन् तास लिहीत बसे, मात्र सकाळी ते सगळे कागद फाडून फेकून देई. अनेकदा खोलीतून रडणंही ऐकू येई.
सहावं वर्ष सरत आलं तेव्हा मात्र त्या कैद्याने वेगवेगळ्या भाषा, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. या अभ्यासात त्याने स्वत:ला इतक्या जोमाने झोकून दिलं की, त्याला हवी असणारी पुस्तकं पुरवता पुरवता सावकारांच्या नाकी नऊ आलं. पुढल्या चार वर्षांत जवळजवळ सहाशे ग्रंथ त्याच्यासाठी मागवले गेले. याच कालावधीत, सावकारांना त्यांच्या ह्या कैद्याकडून एक पत्र आलं -
"प्रिय जेलरसाहेब, मी हे पत्र तुम्हांला सहा भाषांत लिहितो आहे. त्या त्या भाषेतल्या जाणकारांना हे दाखवा. त्यांना ते वाचू द्या, आणि जर या मजकूरात एकही चूक सापडली नाही तर कृपया बागेत बंदुकीचा एकवेळ बार काढा. तो बार ऐकून आपला अभ्यास अगदीच वाया गेला नाही, याची मला खात्री पटेल. निरनिराळ्या देशांतले, भिन्न भिन्न कालखंडातले सारे प्रतिभावंत जरी वेगवेगळ्या भाषा बोलत असले तरी एकच ज्योत प्रत्येकाच्या ठायी जळत असते. त्यांना समजून घेण्याची कुवत अंगी आल्यावर, माझ्या ह्या असमाधानी जिवाला झालेला आनंद किती स्वर्गीय आहे म्हणून सांगू!"
कैद्याची इच्छा पूर्ण करण्यात आली. सावकारांनी बागेत दोनदा बार काढण्याचा हुकूम दिला.
दहाव्या वर्षानंतर मात्र कैदी आपल्या टेबलापासून अजिबात न ढळता, स्थिरपणे फक्त बायबल वाचू लागला. ज्याने गेल्या चार वर्षांत सहाशे ग्रंथांवर प्रभुत्व मिळवलं अशा माणसाने इतक्या सोप्या, लहानशा पुस्तकावर एक वर्ष घालवावं, हे सावकारांना मोठं नवलाईचं वाटलं. बायबलनंतर पौराणिक पुस्तकांचा आणि धर्माच्या इतिहासाचा अभ्यास झाला.
कारावासाच्या गेल्या दोन वर्षांत कैद्याने अक्षरश: शेकडो पुस्तकं मिळतील तशी वाचून काढली. कधी तो जीवशास्त्राच्या अभ्यासात गढून जाई; आणि मग लगेच बायरन किंवा शेक्सपिअरची पुस्तकं मागवे. रसायनशास्त्र, औषधांचे माहितीपुस्तक, एक कादंबरी आणि तत्त्वचर्चेवरील एक पुस्तक; हे सारं एकाच वेळी मागवणार्या त्याच्या काही चिठ्ठ्या आहेत. बोट बुडाल्यानंतर समुद्रात गटांगळ्या खाणारा माणूस कधी एका फळकुटाचा, तर कधी दुसर्याचा आधार घेण्याचा प्रयत्न करतो; तसं त्याचं वाचन सुरू होतं.