चालतो आंबो - आंब्याचे चालणारे झाड
आंब्याचं चालणारं झाड! काय आश्चर्य वाटलं ना वाचून? मग प्रत्यक्ष पाहताना किती आश्चर्य वाटेल?
आम्ही मध्यंतरी सिल्वासा, खानवेलची सहल केली. स्वत:चे वाहन असल्यामुळे मुंबईला परत येताना संजाणला गेलो.
पारशी लोकांना इराण सोडून जावे लागले, तेव्हा त्यातले काही समुद्रमार्गे पूर्वेला भारताकडे आले. त्यांनी भारताच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले, ते संजाण बंदरात. तिथे काही काळ वस्ती करून पुढे ते संपूर्ण भारतभर पसरले. हा सगळा इतिहास आपण शाळेत शिकलेलो असल्यामुळे ते ऐतिहासिक बंदर, आजही तिथे असलेली पारश्यांची जुनी वस्ती आणि जुनी अग्यारी बघण्याची खूप उत्सुकता होती.
तळासरी ते संजाणच्या रस्त्यावर चिकूच्या पुष्कळ बागा आहेत. पूर्वी त्या पारश्यांच्या मालकीच्या होत्या. वाटेत ‘घाटकोपर’ नावाची एका गावाची पाटी दिसली. तिथेही एक घाटकोपर (ते ही सपाटीवर – घाटका उपर नाही) हे पाहून गंमत वाटली.
संजाण गावाच्या सुरवातीलाच जुनी अग्यारी आहे. तिची देखभाल फार व्यवस्थितपणे होत असल्यामुळे ती फारशी जुनी वाटत नाही. तिथे अस्सल पारशी पोषाख केलेले एक गृहस्थ होते. त्यांच्याकडे तिथल्या जुन्या वस्तीची चौकशी केली तेव्हा कळले की संजाण मध्ये आता फारसे पारशी लोक राहिलेले नाहीत. परंतु त्यांनी आपल्या तिथल्या वास्तव्याची आठवण म्हणून गावांत एक स्तंभ उभारलेला आहे आणि त्याच्या जवळ पारशी संस्कृतीची माहिती आणि साहित्य असलेली एक कालकुपी पुरून ठेवली आहे. ते पाहून झाल्यावर एका रिक्षावाल्याला बंदराकडे जायचा रस्ता विचारला, तर त्याने तिकडे काय काम आहे असे विचारले. तेव्हा संजाण बंदराला ऐतिहासिक महत्त्व आहे म्हणून ते पाहायला जायचे आहे असे सांगितले. मग त्याने स्वत:हून बंदराबद्दल थोडी माहिती दिली. खूप पूर्वी ह्या बंदरातून लाकडाचा मोठा व्यापार चालत असे. जवळच जंगलाचा मोठा भाग असल्यामुळे लाकडाला तोटा नव्हता. पुढे काळ बदलला तशी लाकडाची गरज कमी होत गेली आणि व्यापारही कमी होत गेला. मग बंदर ही फारसे वापरात न राहिल्यामुळे अडगळीत गेले. आता तिथे पाहण्यासारखे काहीही उरलेले नाही. त्यामुळे आणि अन्य कारणांमुळेही तुम्ही तिथे जाऊ नका असे रिक्षावाल्याने स्पष्टपणे सांगितल्याबरोबर आम्ही खट्टू झालो.
आम्ही खरोखरीच काहीतरी जुने असे बघायला म्हणून मुद्दाम आलो आहोत हे पाहून त्याने आम्हाला गावातला 'चालतो आंबो' अगदी आवर्जून पहायला जाण्यास सांगितले. नुसत्या नावावरून तसा नीटसा अर्थबोध होत नव्हता. तिथे पोचल्यानंतर दुरून तीनचार झाडांच्या समूहासारखे असे काहीतरी दिसले. जवळ गेलो तेव्हा फांद्यांची टोके जमिनीला टेकलेली होती आणि तिथून नव्या फांद्या फुटलेल्या दिसल्या. आम्ही सगळेजण तो समूह चारी बाजूने पाहात होतो, पण नुसत्या पाहण्याने कळत नव्हते. तेवढ्यांत तिथून जात असलेल्या एका माणसाला विचारले. त्या भल्या गावकर्याने काही शहरी माणसे 'चालतो आंबो' पाहण्यासाठी दुरून आलेली पाहून मुद्दामहून वेळ खर्च करून, झाडाजवळ नेऊन, नवे झाड, जुने सुकुन मरून गेलेले झाड दाखवून झाडाच्या चालण्याचे वैशिष्ट्य समजावून सांगितले आणि ते झाड कोणत्या दिशेने तिथपर्यंत आले ते दाखवले. त्या झाडाला फुटणार्या फांद्या आकाशाच्या दिशेने वर जात नाहीत तर कमानीसारख्या वाढतात आणि जमिनीला टेकतात. फांदी जमिनीला टेकली की तिथे ती रुजते आणि तिला मुळे फुटतात आणि नवे झाड निर्माण होते. नवे झाड वाढले की मागचे जुने झाड मरून जाते. नव्या झाडाच्या फांद्या जमिनीला टेकल्या की पुन्हा एका नव्या झाडाचा जन्म होतो आणि जुन्याचा मृत्यू. अशा रीतीने त्या झाडाने गेल्या शेकडो वर्षांत शेकडो फुटांचा प्रवास केला आहे. पूर्वी ते किनार्याच्या जवळ होते. आता किनार्यापासून बरेच आत आले आहे. असा प्रवास चालू असताना त्याला आंबेही येतात. त्याच्याकडे पाहताना मनांत विचारांची गर्दी उसळली. कोणत्या प्रेरणेने हे झाड असे प्रवासाला निघाले असेल? संकटापासून स्वत:चा वाचवण्यासाठी की तिथून वस्ती उठवून निघून गेलेल्या त्याच्या मालकाच्या शोधासाठी? तसे असेल तर त्या मूळ झाडाच्या आणि त्याच्या मालकाच्या वंशजांची भेट कधी नि कुठे होणार? आणि त्यासाठी त्याच्या प्रवासाची रीतही किती न्यारी!
त्या आंब्याबरोबर तिथल्या गावकर्यांचेही तितकेच कौतुक केले पाहिजे. त्यांचे उत्पन्न आपल्या पोटापुरते. असा प्रवास करत असताना ते झाड कोणाच्या ना कोणाच्या शेतातून गेले असेल, तेही वर्षानुवर्षे. त्यामुळे त्याचे थोडेतरी नुकसान झाले असणार. त्याने नुकसान सोसले पण झाड तोडले नाही. त्याच्या स्थलांतराच्या आंतरिक प्रेरणेचा आदर करत, त्याच्या भावना समजून घेऊन, हे जगावेगळे झाड त्यांनी आपल्या गावांचे वैभव समजून त्याची जपणूक केली आहे.
तिथे जाणार्या सर्वांनीच त्यांच्या जपणुकीची तितकीच कदर करावी. झाड अगदी आवर्जून पहावे, पण त्याच्या पानालाही हात न लावता !