म्हशीची खोड

डॉ.श्रीराम दिवटे

रशियन बाहुल्याआजकाल गावाकडे बहुतेकांच्या दारात किमान एक तरी म्हैस झुलताना दिसते. फार पूर्वी हत्ती झुलायचा, आता म्हैस. रंग, रुप, देहात थोडेफार साम्य असले तरी दूध देण्याच्या प्रश्नाचाच काय तो फरक. काळी म्हैस पांढरे दूध देते हे कळायला मानवाला कित्येक वर्षे घालवावी लागली असतील. कारण म्हैस ही बोलून चालून वन्य प्राणी. ती आपली वन्यता कशी सोडेल? तिच्या आचळांना पारड्यांच्या ओठांची सवय. ती माणसाला हात लावून देईल कशी? त्यात तिची कास म्हणजे अतिसंवेदनशील क्षेत्र. तिथे थोड्याशा परक्या स्पर्शानेही दंगल उडते.

याबाबतीत म्हशी हुशार असतात. त्या आपला नेहमीचा गवळी बरोबर ओळखतात. त्यामुळेच कोणाही ऐर्‍यागैर्‍याला म्हशीच्या खाली बसण्याचीच नव्हे, वाकून पाहण्याचीही परवानगी नसते. जर का कोणी आततायीपणा करुन नियम तोडला, तर त्याचे दाभाड फुटलेच म्हणून समजा. परपुरुषाने परस्त्रीकडे भलतीच मागणी केल्यावर जसे त्याचे थोबाड चपलेने रंगेल तसाच हा प्रकार. कोणतीही म्हैस परक्या व्यक्तीच्या हाती आपली आचळे सहजासहजी सोपवित नसते. तिला त्या नवख्या माणसाची सवय लावून द्यावी लागते.

अशाच एका मालकांकडे एक उमदी, दुभती म्हैस होती. तिला 'पिळणे', म्हणजे दोहणे त्यांना भारी आवडे. म्हशी पिळणे हा कोणाचा छंद असतो तर कोणाचा धंदा. तसा ह्यांचा छंदच. रोज ते म्हशीला सकाळ संध्याकाळ पिळीत. त्यांच्या हातांचा लळा म्हशीला असा काही लागला की ती कोणालाच आपल्या पुढ्यात उभे ठाकू देत नसे. मागे बसून कास धरणे तर फार दूरची गोष्ट.

एकदा मालकांना राजकीय दौर्‍यासाठी पंधरा दिवस बाहेरगावी राहावे लागणार होते. त्यांना चिंता पडली आता म्हैस पिळणार कोण? दौर्‍यावर जायला आठेक दिवस अवधी होता. मग त्यांनी एक शक्कल लढवली. दूध काढताना ते बाईसाहेबांना सोबत घेत. अर्धे पिळून उरलेले अर्धे बाईसाहेबांना पिळायला देत व त्या दूध काढू लागल्या की स्वतः म्हशीच्या कानाजवळ जाऊन गाणे म्हणत- "दे गं, दे गं दुधू बाई, तुला खायला कमी न्हाई." मालकाचा आवाज ऐकून ती बाईसाहेबांना दूध काढू देऊ लागली. मालकांना बरे वाटले. ते दौर्‍यावर निघून गेले. मात्र जाताना त्यांनी आपल्या गड्याला एक युक्ती पढवून ठेवली होती. ती अमलात आणायला गडी एका पायावर तयार होता...

त्याच संध्याकाळी बाईसाहेब बादली घेऊन म्हशीखाली बसल्या अन् गडी मालकाचे कपडे घालून म्हशीला थोपटीत गाऊ लागला- "दे गं, दे गं दुधू बाई.." पण म्हैस काही दूध देईना. कारण ती हुशार होती. "ह्ये बेणं मालकाची कापडं घालून भलत्याच रंगात येऊन दुधू दे म्हणतंय." तिने ताडले. ती काही दूध घालायला कबूल होईना. बाईसाहेब आचळे दाबून दाबून कंटाळल्या. शेवटी गड्याने आपल्या मोबाईल वरुन थेट मालकालाच फोन लावला. (आजकाल गड्यांकडेच नव्हे तर भंगार उचलणार्‍या बायांकडेही मोबाईल नामक डबडे आढळते!)

मालक मुरब्बी राजकारणी होते. आख्खे राजकारण कोळून प्यालेले. त्यापुढे म्हशी पिळणे काहीच नाही. त्यांनी गड्याला मोबाईलचा स्पीकर चालू करुन म्हशीच्या कानाजवळ न्यायला सांगितला. गड्याने तसे केल्याची खात्री पटताच मालकांचा आवाज म्हशीच्या कानात घुमला- "दे गं, दे गं दुधू बाई, तुला खायला कमी न्हाई.." अन् काय आश्चर्य! म्हशीच्या आचळातून दुधाच्या धारा कोसळू लागल्या! गड्याने व बाईसाहेबांनी सुटकेचा निश्वास टाकला. मग पंधरा दिवस हाच उपक्रम चालू राहिला. परंतु मालक महोदयांची यामुळे फार मोठी गोची झाली. दूध काढण्याची वेळ झाली की त्यांना निर्मनुष्य माळरान गाठावे लागे. कारण चारचौघांत फोनवर म्हणण्यासारखे ते गाणे खचितच नव्हते.

दरम्यान ही बातमी पंचक्रोशीत पसरायला वेळ लागला नाहीच. मग अनेक पत्रकारांनी गडी, मोबाईल, म्हैस व बाईसाहेब यांची सचित्र चौकट पेपरांत छापून आणून मोठी वाहवा मिळवली. दौरा आटोपून मालक परतले. दररोजचे दिनक्रम पुन्हा सुरु झाला. परंतु काही दिवसांनी खुद्द बाईसाहेब आजारी पडून अंथरुणाला खिळल्या. आता मालकांची मोठी पंचाईत झाली. त्या दिवशी पुन्हा ते स्वतः म्हशीच्या पोटाखाली पिळायला बसले. तिथूनच गाणे म्हणत त्यांनी कास धरताच म्हशीने पाय झाडून तीव्र निषेध नोंदवला. तिला आता बाईसाहेबांच्या नाजूक बोटांची सवय झाली होती, चरबट हातांची तुटली होती. मालक वैतागले. अखेर त्यांनी डोके लढवले. गड्याच्या कानात ते काहीतरी बडबडले. गडी काही त्या गोष्टीला तयार होईना. मालक चिडले- "च्या मायला, इतकी दिसं तू माजी कापडं घालून सायबावानी हिंडलास. आता काय हुतंय घडीबर लुगडं गुंडाळून बसायला?"

आपली खात्यापित्या घरची नोकरी जाईल या भितीने तो तयार झाला. बाईसाहेबांचे लुगडे गुंडाळून तो म्हशीखाली बसला. मालक म्हशीला थोपटत गाऊ लागले- "दे गं, दे गं.." म्हशीने वळून पाहिले, "बाईसायेबच दिस्त्यात पर बोटं काई त्यांची न्हाईती." तिने बरोबर ताडले अन् ती ढिम्म उभी राहिली. मालक गाणे गाऊन थकले. गड्याने आचळाला हात लावला की म्हैस दचकून पाय झाडायची.

नंतर बोटांचा प्रताप मालकाच्याच लक्षात आला. काय करावे यासाठी त्यांनी डोके खाजवले. एक नामी उपाय सापडला. नुकत्याच कॉलेजात जाऊ लागलेल्या आपल्या पोराला त्यांनी हाक मारली. "आरं अये गण्या, भाईर ये. तुला येक जोखमीचं काम सांगतो. त्ये काम जर तू तडीस पाडलं ना तर उद्याच तुला पल्सार घिऊन दिन." पोरगा पळत आला. परंतु बापाने सांगितलेले काम करायला कां कूं करु लागला. अखेर पल्सारच्या आमिषाला बळी पडलाच.

आता लुगडे नेसून गण्या म्हैस पिळायला बसला. मालक गाऊ लागले. बादलीत दूध भरु लागले. कारण गण्याचे हात आईसारखेच मऊ होते. शेतीकामाची सवय नसल्यामुळे त्याच्या बोटांवर चिरांचा प्रादुर्भाव झाला नव्हताच. अशा प्रकारे गण्याला पल्सार तर मिळालीच पण म्हैस पिळायचे वाढीव काम करावे लागले.

आता असली अस्सल बातमी लपून राहते थोडी? ही "रियल स्टोरी" "कव्हर" करायला पत्रकार व छायाचित्रकार पुढे सरसावले. "बरं का गण्या, सांच्याला आपल्या म्हशीचा फोटु काढायला पेपरवाले येनार हायेत. कुटं जावू नगंस." मालक मोठ्या टेचात गण्याला बजावत होते. आपल्या म्हशीला सगळ्या पेपरांत स्थान मिळणार याचे केवढे कौतुक मालकांना होते. परंतु ते ऐकून गण्याच्या पायाखालची वाळूच सरकली. उद्या पेपरांत आपला लुगडे नेसलेला फोटो पाहून मित्र चिडवतील या धास्तीने गण्या पिछाडला. तो थेट दुसर्‍या दिवशीच टपकण्याच्या हेतूने घरातून पळाला.

संध्याकाळी पत्रकार, छायाचित्रकार आपापली जागा घेऊन कॅमेर्‍यांचे कोन जुळवीत म्हशीच्या आसपास गोळा झाले. सात वाजले, आठावर काटा गेला तरी गण्याचा पत्ता नाही. मालक वैतागले. पत्रकार खोळंबले. बघ्यांमध्ये चुळबुळ सुरु झाली. सरतेशेवटी बाईसाहेबांनाच सलाईन लावलेल्या हातासकट कसेबसे उचलून आणून म्हशीखाली बसवण्यात आले. सर्व तयारी झाल्यावर मालकांनी सूर धरला- "दे गं, दे गं दुधू बाई, तुला खायला कमी न्हाई.." आणि इतका वेळ तुंबवलेला पान्हा म्हशीने चळाचळा बादलीत सोडला!

गाणारे मालक, सलाईन लावून अवघडलेल्या स्थितीत दूध दोहणार्‍या बाईसाहेब अन् तल्लीन होऊन पान्हवणारी म्हैस असे ते दुर्मिळ दृश्य कॅमेर्‍यांच्या क्लिकक्लिकाटात उजळून निघाले...

paNatee