माझा तुझा
श्वास मिसळेल माझा तुझा देह उजळेल माझा तुझा
आज बाहूमध्ये आपल्या चंद्र उगवेल माझा तुझा
चिंब होतील क्षण लाजुनी
एक थरथर तनी अन मनी
शब्द होतील सारे मुके स्पर्श बोलेल माझा तुझा
रात्र नाजूक ही एवढी
की फुलाची जशी पाकळी
आज अंगावरी रात्रिच्या श्वास उमटेल माझा तुझा
घट्ट होईल जेव्हा मिठी
विश्व जाईल मागे किती
आज गगनासही दूरच्या हात लागेल माझा तुझा