माझा बाप
बाप नावाचा माणूस
एकटाच लढत असतो
सर्वांनी ओलांडला तरी तो मात्र
उंबरठा सांभाळत असतो.
जागोजागी खचलेल्या भागात
फक्त एके ठिकणी
उंचवटयाचा भाग होता
त्याच्या पाठीला पाठ लावून
मी विश्रांती घेतो
कारण, तो माझा बाप होता.
छत सांभाळता संभाळा
ज्या दिवशी माझा बाप
कमरेतून वाकला
त्याच दिवशी
मला जगण्याचा अर्थ कळला.
त्याने कधीच स्वत:चा
गवगवा केला नाही
की तो उदंड झाला नाही
माझ्यासाठी तो कधीच
स्वतःच्या अस्तित्वाने जगला नाही.
निघून गेले सारे असे
हात रिकामे होते
त्याची आठवण म्हणून
रेषांचे दोन रेघोटे होते.
गरजेपुरते माझ्या बापाला
सर्वांनी गरीब गाय म्हटले
गरज संपताच
खाटिकाच्या खुंटीला बांधले.
कुणाला न बोलता
जेव्हा बाप आतून रडला
त्याचा खचलेला बांधा पाहून
मी ओलाचिंब डोळा मिटला.
आंगळलो बापाला मी
तो पारंब्यांसारखा होता
त्याचा स्वतःमध्ये नाही
तर, पिल्लामध्ये जीव होता.
कधी कधी त्यालाही
डोळ्यातले भाव लपवता येत नाहीत
बाप म्हणून पाहिले गेल्याने
साधे रडता सुद्धा येत नाही.
माझे पोट भरता भरता
एक दिवशी बाप उपाशी होता
विचारले तर म्हणाला
तोही माझ्याच
कर्तव्याचा एक भाग होता.
पोटाची कळही तो
डोळ्यातून ओळखायचा
ताठ कण्याचा बाप माझ्यासाठी
कित्येकदा मान ही वाकवायचा.
त्याने सन्मान पाहिला नव्हता
ना आनंद पाहिला होता.
आयुष्याशी झगडत-झगडत फक्त
आता त्याचा साचाच राहिला होता.
अंधारातला उजेड म्हणून बा
डोळ्याची दिवटी करायचा
माझ्या पोटात घास टाकून
तो स्वतःची भूक भागवयाचा.
वाळणाच्या दोरीगत नशीब
बापाला झुलवत होते
त्याच्या पिल्लाच्या सावलीसाठी
त्याने शरीराचे कवच केले होते.
बा नेहमी मला
जत्रेला घेऊन जायचा
जग दावल्याचा आनंद
माझ्या डोळ्यात पाहायचा.
आता मीही बापाचा
एकलेपणा जाणला होता
वरवर हसणारा बाप
आतून खूपच दुखरा होता.
आयुष्याची प्रत्येक लढाई
बाप एकटाच लढला
भरल्या घरात राहून
कोपर्यातच विरला.
माझ्यावरील प्रत्येक संकटात
तो खिंड म्हणून लढला
अनंत वार झेलण्यासाठी
ढाल होऊन जगला.
दिवसभराचा कणखर बाप
रात्रीला मात्र हळवा व्हायचा
पापणीतल्या अश्रूंसारखाच
तो ही अलगद बरसायचा.
कधी कधी वाटते
खरेच बाप काय असतो?
ज्याला कळले नाही त्याला तर
तो फक्त प्रश्नच असतो.
वाळक्या पानासारखा बाप ही
नंतर सुरकुतून गेला
फक्त माझ्यासाठीच निर्जीव म्हणून
देठाला चिकटून राहिला.
त्या दिवशी बापाने भाकरी थापली
कळू नये म्हणून,
आईच्या नावाने सांगितली
बोललो नाही बापाला,
पण, त्या भाकरीची चव
थोडी वेगळीच लागली.
पिकलेल्या पानाच्या देठागत
बाप अगदीच सुकला
जगण्याच्या प्रत्येक आनंदाला
तो वंचित राहीला.
सुख वाटता वाटता
माझा बाप रिक्त राहून गेला
जीवनाच्या प्रत्येक पायरीवर
तो मुक्त होत गेला.
बापचा संवाद नेहमी
थोडकाच राहायचा
बोललेला प्रत्येक शब्द
काळजात रुजायचा.