बंध माळेचे
डायरीचे पान मिटवून भैय्याजींनी एक दीर्घ निश्वास सोडला. आजचा नामजप पूर्ण झाला होता. तसे म्हटले तर अजूनही जास्त करता आला असता. पण आज नको. आज रविवार असल्यामुळे सुशांत घरीच होता. एरवी तो कामावर गेला आणि छोट्याला शाळेत पोहचवले की घरात फक्त भैय्याजी, बायको-प्रमिला आणि सून. कसा शांत आणि भरपूर वेळ मिळायचा. भैय्याजी नाम-सागरात, किंवा एखाद्या पुस्तकात स्वत:ला बुडवून घेत. सासू-सुनेची स्वयंपाकघरातील आवराआवर संपली, की पूर्ण घर नि:स्तब्धतेच्या डोहात बुडून जायचे. अशा वेळी नामस्मरण करताना कशी वेगळीच अनुभूती यायची! रविवारी घरातील सगळे उगाच प्रचंड उत्साहाने कोलाहल करीत असायचे. सुशांतची छोट्या अनुपबरोबर मस्ती सुरू असायची. सुवर्णा- भैय्याजींची सून- ह्या दोघांनी केलेला पसारा पुन्हा पुन्हा आवरून ठेवायची. रविवार म्हटले की कुठून येवढा उत्साह येतो लोकांना कोण जाणे! काय असे मोठे सोने लागून गेले असते रविवारला! खरे तर इतर दिवसांसारखाच आणखी एक दिवस! पण रविवार म्हटला की सगळ्यांची जास्तच घाईगर्दी असायची. त्या गोंगाटात भैय्याजींचा नामजपाचा कोटा काही पूर्ण होऊ शकायचा नाही.
म्हणून सकाळी लवकर उठूनच त्यांनी आजचे जपाचे ध्येय पूर्ण करून टाकले होते. ते डायरीत लिहून भैय्याजी डायरी व्यवस्थित कपाटात ठेवतच होते, तोच नातू अनूप आजोबांच्या खोलीत मुसंडी मारून आला. त्यांच्या हातातील डायरी खाली पडली. "अरे काय गोंधळ लावला आहे!" ते लटकेच ओरडले. अनुप कुठला उत्तर देतोय! त्याने खाली पडलेली डायरी उचलली आणि सुसाट समोरच्या खोलीत पळाला. "आजोबांची डायरी.. आजोबांची डायरी!" भैय्याजी त्याच्या मागे धावत गेले. प्रमिलाबाई ओरडल्या, "अहो हळू, हळू! हे काय वय आहे का तुमचं नातवाबरोबर दंगामस्ती करायचं!" अनुपने डायरी सरळ बाबांच्या हातात दिली आणि सुरक्षितपणे आईच्या बाजूला उभा राहिला.
भैय्याजी फुरगंटून कोचावर बसले. सकाळचे अकरा वाजून गेले होते. अजून सगळे पारोसेच बसलेले दिसत होते. टीव्ही वर स्पायडरमॅन उलट्यासुलट्या उड्या घेत होता. तेही कोणी पाहात नव्हते. कडांना ओघळ सुकलेले चहाचे कप टेबलावर तसेच पडून होते. बिस्किटांचा चुरा ठिकठिकाणी सांडला होता. वर्तमानपत्राची पाने जमिनीवर फडफडत होती. “मला पूर्ण पेपर व्यवस्थित घडी करून दे बरं!” भैय्याजींनी नातवाला बजावले. अनुपने लगेच त्याच्या मताने व्यवस्थित घडी करून आजोबांच्या हातात दिली.
“आजोबांचा जप झाला वाटतं?” प्रमिलाबाई चहाचे कप उचलता उचलता म्हणाल्या. भैय्याजींना पसारा बिलकूल पसंत नाही हे त्यांना माहित होते. एरवी स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर असलेली सून, रविवारी मात्र "आज माझी सुट्टी" म्हणून एकाही कामाला हात लावित नसे. स्पष्ट शब्दात "तुम्ही आज कामे करा." असे सासूला न सांगताही सांगण्याची तिची ही पद्धत होती. प्रमिलाबाईं रविवार काय किंवा इतर दिवशी काय, सुवर्णाला घरकामात शक्य तितकी मदत करण्यात कसलीच कसर करीत नसत.
"आज रविवार म्हणजे भैय्याजींचा जप झालेलाच असणार." सुशांतने भैय्याजींच्या डायरीत ओझरते पाहात म्हटले.
भैय्याजींनी लगेच त्याच्या हातातली डायरी काढून घेतली. ती आयुष्याची पुंजी हातात घट्ट धरून ते बसून राहिले.
“मी म्हणते, जप जरूर करावा. पण त्याची बॅंक बुकं अगदी व्यवस्थित लिहून कशाला ठेवायली हवीत? देवाला काय माहीत नाही? तो बरोब्बर हिशेब ठेवतो." प्रमिलाबाई स्वयंपाकघरात कप ठेवून येता येता पुटपुटल्या.
"अगं आई, देवाला कळावं म्हणून थोडीच हिशेब लिहिलेत डायरीत? जसे सगळे जण आपापले बॅंक बॅलन्स गोंजारत बसतात ना, तसंच आहे ते. त्यात त्यांना आनंद मिळतोय तर मिळू दे ना!"
आता पर्यंत ३.८ कोटी जप झालाय. माळेचे मणी कुरवाळतांना भैय्याजी आठवू लागले. अध्यात्माची आवड तर आधीपासूनच होती. काहीही झाले तरी रोजची देवपूजा, आरत्या, स्तोत्रपठण त्यांनी कधी चुकविले नाही. कामासाठी फिरतीवर असायचे त्यावेळी देखील मनातल्या मनात रोज सगळे म्हणून व्हायचे. निवृत्त झाल्यानंतर एका सत्संगात कोणीसे सुचवले, "भैय्याजी, तुम्ही दहा कोटी नामस्मरणाचा संकल्प का सोडीत नाही? सहज होऊ शकेल तुमच्याने." ते सुरू केले तेव्हापासून भैय्याजींना तो एक छंदच लागला. पूर्वी कामाची ध्येये असायची. आता हे एक ध्येय डोळ्यासमोर ठेवल्यामुळे उरलेला मार्ग चालायला कारण मिळाले. गुरूमंत्र आधीच घेतला होता. त्याचाच जप रोज करायचे ठरवले. रोज कमीत कमी किती तास, किती माळा, सगळा हिशेब डायरीत लिहून ठेवायचा एक चाळाच लागला. प्रत्येक दिवस उत्साहात उगवू लागला आणि समाधानात मावळू लागला.
"हो ना आई! रोजचा हलकाफुलका व्यायाम, व्यवस्थित आहार, आणि नामस्मरण. किती सुंदर लाईफ़स्टाईल आहे भैय्याजींची. त्यामुळेच प्रकृती देखील अगदी छान राहिली आहे." सुवर्णाने कोचाच्या हातावर टिचकी मारली.
भैय्याजी मनोमन सुखावले. परवा भाटकरांना हार्ट अटॅक येऊन गेला. हा दुसरा होता. आपल्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहेत. आणि नाडकर्णी? फिरायला येतात तेव्हा सतत आजारपणाच्या कुरबुरी ऐकवत बसतात. श्रीगुरूंना माझ्याकडून दहा कोटी जप पूर्ण करवून घ्यायचाच आहे. तो होईपर्यंत ते मला काहीही होऊ देणार नाहीत. माळ खिशात ठेवीत भैय्याजी उठले. आपल्या खोलीत जाऊन माळ आणि डायरी उशीखाली ठेवून अर्धवट सोडलेले पुस्तक त्यांनी उघडले.
--------------------------------------
"अगं माझी माळ दिसत नाहीये?" प्रमिलाबाईंना बोलावीत भैय्याजी ओरडले.
सगळीकडे शोधून झाले. माळ काही दिसली नाही. ह्या अनुपचेच हे उपद्व्याप असणार. खेळायला घेऊन कुठेतरी टाकून दिली असेल. अनुप बिचारा 'आजोबा मी खरंच नाही घेतली' म्हणत राहिला. अगदी व्हॅक्युम क्लीनरची बॅग उघडूनही पाहून झाले. पण माळ सापडेना.
"अहो तुम्हाला सवयच आहे. जिथे जाता तिथे माळ घेऊन जाता. पण परतताना तिथेच सोडता."
"मी कधीच इकडे तिकडे सोडीत नाही हं. उगाच काहितरी बोलू नको."
"भैय्याजी, मी तुम्हाला नवीन माळ आणून देतो." सुशांत म्हणाला. "नाहितरी जुनीच झाली होती ती. दोराही कुजका झाला असेल."
"जुनी असली, तरी त्या माळेवर माझा आत्तापर्यंतचा जप वाहिलेला आहे. जुनी म्हणशील, तर मीही जुना झालोय. माझाही धागा कमजोर झालायं. मग आता तो देखील नवीन आणून देणार?"
तीन दिवस भैय्याजींचा जप झालाच नाही. व्यायाम पण करावासा वाटला नाही. सुवर्णाने शेवटी मनावरच घेतले. ती माळ पलंगाच्या पायामागे आहे असे वाटले. जराशी ओढली तर थोडीच पुढे आली. "पलंग उचलावा लागेल. मी सुशांतला बोलावते." ती बाहेर गेली, तशी भैय्याजींनी वाकून माळ थोडी आणखी ओढली, तर दोनच मणी हातात आले. कच्चा धागा तुटला होता.
पलंग उचलून सगळे मणी बाहेर काढले. स्वच्छ करून नवीन दोर्यांत ओवून झाले. पण डायरीतला जपाचा आकडा स्थिरच राहिला. माळेचे ३.८ कोटी श्वास एका झटक्यात ओघळून हवेत मिसळले. दहा कोटीचे ध्येय ठेवले होते. ते पूर्ण होण्याआधीच माळ तुटली. श्रीगुरूंनी हा कसला संकेत दिला असेल? नेहमी फिरायला जाणे न चुकवणारे भैय्याजी निजून निजूनच होते.
नेहमी भेटणारे भैय्याजी फिरायला का आले नाहीत हे बघायला शेजारचे नाना घरी आले.
"काही उत्साहच वाटत नाही बघ ही माळ तुटल्यापासून. कदाचित ह्या माळेवर तेवढाच हक्क लिहिला होता. श्रीगुरूंची इच्छा! त्यांना माझ्याकडून दहा कोटी जप जर हवा असेल, तर आता तेच मला नवीन माळेत ओवून पाठवतील." भैय्याजी म्हणाले.
"दहा कोटीच काय भैय्याजी, तुम्ही पंधरा कोटी देखील कराल!"
भैय्याजी नुसतेच उदास हसले. आठवडा गेला. सुशांतने हट्टाने आणून दिलेली नवीन माळ पेटीत खुपसून ठेवली होती. पलंगावर पहुडलेल्या भैय्याजींकडे पाहून प्रमिलाबाईंच्या पोटात खोल खड्डा पडला. नव्याने ओवलेल्या जुन्या माळेचे मणी आणि भैयाजींच्या डोळ्यातले मणी दोन्ही एकमेकांपेक्षा अधिक कळाहीन दिसत होते. "अहो, जप बंद केलात तर केलात. निदान जरा घराबाहेर जात जा. सतत घरात बसून घुसमटता कशाला? काय येवढं त्या माळेचं लावून घेतलंय?" प्रमिलाबाईंनी एक दिवस भैय्याजींना बाहेर काढलेच. श्रीकृष्णराव देशमुख, म्हणजे डॉक्टरकाकांचे दासबोधावरचे प्रवचन ऐकायला मिळेल हे प्रलोभन भैय्याजी काही टाळू शकले नाहीत.
"आता हे सफरचंदच बघा. कसं छान ताजं, टवटवीत आहे. भूकही लागलेली आहे. समजा हे मी आत्ता खाल्लं तर मला आनंद होईल. सुख मिळेल." आपल्या साध्या घरगुती शैलीत डॉक्टरकाका सांगत होते. "आत्ता सुख मिळालं म्हणून मी पुन्हा एक खाल्लं. थोडा आणखी आनंद मिळेल. समजा पुन्हा एक खाल्लं. आता मघायेवढंच सुख पुन्हा मिळेल का? शक्यच नाही. मग मला सांगा, सुख हे सफरचंदात आहे का? की आणखी कशात आहे? तुम्ही विज्ञानाला मानता. मग साधा तर्क बघा. सुख सफरचंदात असतं, तर जेव्हा जेव्हा मी सफरचंद खाईन, तेव्हा तेव्हा सुख मिळालं पाहिजे. आपल्याला कित्येक प्रश्न भेडसावत असतात. पण योग्य तर्क आपण वापरीत नाही म्हणून चुकीचे निष्कर्ष काढून सुखाऐवजी आपण दु:ख मिळवतो. सफरचंद हे साध्य नव्हे. ते साधन आहे. साधन सुख देत नसतं. जगातली सगळी साधनं नाशिवंत असतात. ते जोपर्यंत तुमच्या दिमतीला आहे, तोपर्यंत रामकृष्णहरी! त्याचा नाश झाला तरी रामकृष्णहरी!! साधन नाही, पण साध्य सुख देऊ शकतं, किंवा सुख देतं असं वाटतं म्हणा हवे तर! साध्य असं निवडावं की जे नाशिवंत नसेल. असंच साध्य शाश्वत सुख देऊ शकतं."
डॉक्टरकाका अगदी साधेसुधे आणि मनाला पटणारे बोलत होते. हा इतका सोपा तर्क आपल्याला कसा सुचला नाही? माळ केवळ नाशवंत साधन होते. ते तुटणारच. माझे ध्येय त्यामुळे मी का विसरलो?
घरी गेल्यावर भैय्याजींनी अनुपला बोलावून "तुला नेहमी माझी माळ खेळायला हवी असते ना? ही घे." म्हणत जुनी माळ त्याच्या हवाली केली. आपली प्रिय डायरी अगदी छान बांधून कपाटात ठेवून दिली. सरळ एक नवीकोरी डायरी उघडून त्यावर श्री गणेश लिहीले. सुशांतने आणून दिलेली नवीन माळ खुंटीवरून काढली आणि आठ दिवसांनंतर प्रथमच नेहमीचा जपाचा आकडा पूर्ण केला. मनात आकडेमोड केली. आधीचे ३,८२,१६००० अधिक आज केलेले, म्हणजे एकूण.... ३कोटी,८२लाख ... किती बरे.......छे छे! जुने ते सगळे गेले. रामकृष्णहरी! नवीन माळ, नवीन मोजणी. म्हणजे माझा आकडा पूर्ण करायला इथला मुक्काम आणखी वाढणार! स्मितमुखाने त्यांनी आजच्या तारखेत नोंद केली- "आत्तापर्यंतचा जप- फक्त ३०००. ध्येय आकडा- दहा कोटी. पूर्ण करण्याची अंदाजे तारीख......"
रविवारी सकाळी नाश्त्यानंतर दिवाणखान्यामध्ये नेहमीप्रमाणे गप्पांचा अड्डा रंगला होता. आजचे जपाचे ध्येय दुपटीने पूर्ण झाल्याच्या खुषीत भैय्याजी देखील गप्पांमध्ये रमले. स्पायडरमॅन वीस मजली इमारतीवर सरसर चढला, तेव्हा त्यांनी अनुपच्या बरोबरीने जोरजोरात टाळ्या वाजवल्या. कडांवर ओघळ सुकलेले चहाचे कप आत न्यायला निघालेल्या प्रमिलाबाईंना त्यांनी हात धरून खाली बसवले. "अग ते काम-बिम राहू दे आज. आज रविवार आहे ना! "
हातातील नवीन कोर्या माळेतील मणी भैय्याजींच्या डोळ्यात चकाकून गेले असे प्रमिलाबाईंना वाटले.

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.