वास्तव
किरमिजी रंगाचं, रोज उजाडणारं वास्तव.
पन्हाळीखाली पाण्याची वाट बघणारा तोच मी.
पखालीच्या पखाली वाहणारे अनंत लोक.
सगळ्यांच्या असण्याचे अनेक लौकिकार्थ.
दीर्घश्वसनाचे प्रयोग करीत उपमा शोधणारे शब्द.
मांडावे आणि विकावे या न्यायाची दुकाने.
गर्दीवरून रोज उडत जाणं.
गर्दीचं कधीच न होता येणं.
माणसांचे हिशेबच्या हिशेब.
हिशेबाखातरच माणसांची जमवाजमव.
पुड्यांमध्ये बांधत बांधत गोळा केलेलं, घरी जाईपर्यन्त सांडत सांडत जाणारं आयुष्य.
बघतोयस ना? जमणार आहे ना?
की निघायचंय?
गच्चीवरून मला बजावणारा एक वेगळाच मी.
आणि किरमिजी रंगाचं, रोज उजाडणारं वास्तव बघत
पन्हाळीखाली पाण्याची वाट बघणारा तोच मी.