बुंदी लाडू
जिन्नस :
हरबरा डाळीचे पीठ - १ वाटी
साखर -दीड वाटी
पाणी
तेल
बदाम - ५-६
पिस्ते -५-६
काजू - ५-६
२ झारे (एक तळण्याकरता, एक बुंदी पाडण्याकरता)
क्रमवार मार्गदर्शन :
एका पातेलीत डाळीचे पीठ भिजवावे. थोडे थोडे पाणी घालून डाळीचे पीठ भिजवा. डाळीचे पीठ भिजवताना अजिबात गुठळी होता कामा नये. एकसंध गंधासारखे पीठ भिजवा. पीठ सहज ओतता आले पाहिजे इतपत पातळ भिजवा. साधारण दाट बासुंदी असते इतके पीठ पातळ हवे. दुसर्या पातेल्यात साखर घाला. साखर बुडून थोडेसे वर पाणी राहील इतके पाणी घाला व मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. सारखे ढवळत राहा. हे मिश्रण पूर्ण उकळून त्यावर बुडबुडे येतील व थोड्यावेळाने एक तारी पाक होईल. एक तारी पाक झाला की लगेच गॅस बंद करा.
मध्यम आंचेवर कढई तापत ठेवा. त्यात तळण तळण्याकरता जितके तेल घालतो तितके तेल घाला. तेल व्यवस्थित तापू दे. तेल तापले आहे की नाही हे पाहण्यासाठी हाताने थोडे भिजवलेले पीठ घाला. ते वर येऊन तरंगले की तेल बरोबर तापले असे समजावे. आता कढईवर झारा ठेवून त्यात वाटीने झारा भरेल इतके पीठ घाला. झार्यातून आपोआप बुंदी तेलात पडतील. त्या पडल्या की लगेच झारा पाण्याने स्वच्छ करून घ्या. आता दुसर्या झार्याने बुंदी निथळून घ्या व लगेचच गरम पाकात घाला. अशा प्रकारे सर्व बुंदी पाडून त्या लगेच गरम पाकात घाला. प्रत्येक नवीन बुंदी पाडण्यासाठी झारा स्वच्छ हवा. सर्व बुंदी पाडून झाल्या की लगेच पाकातल्या बुंदी डावेने ढवळून घ्या. बुंदी पाकात मुरतील. पाकबुंदीचे मिश्रण कोमट झाले की त्यात बदाम, काजू, पिस्ते यांची पूड घाला. पूड भरड असावी. लाडू वळा. या मिश्रणाचे ८ ते १० लाडू होतील.


मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.