चार भिंती

चार भिंतींच्या बाहेर ....
उतरत चाललेली धुंद संध्याकाळ,
पाऊस मुसळधार,
तृप्त धरा अन् झाडे हिरवीगार.
समुद्राला भिडलेल्या आभाळावर
जांभळी, करडी, राखी नक्षी,
घराकडे परतणारी चिंब भिजली माणसं
घरट्याकडे परतणारे इवले इवले पक्षी.
पाखरांच्या चोचीत धान्याचा एक दाणा,
माणसांनी जपलाय मनात
एक कोंब अंकुरताना,
सगळी सृष्टी सुखावलीय बघून
काळे मेघ बरसताना.
चार भिंतींच्या आत ....
बसलोय मी एकटाच
कण्हत, कुढत, चिडत,
स्वतःवरच रागवत.
काहीच करायला नसल्याने
कागदावर अक्षरे खरडत.
वाट बघतोय तिची
डोळ्यांत आणून प्राण,
अन् एकटाच बसलोय तुडवत
एकटेपणाचे रान.
पण,
चार भिंतींच्या पलीकडे ....
दूर कुठेतरी, बसली असेल ती,
इकडेच येणार्या गाडीत,
निरोप मिळताच धावत सुटेल
पत्ता माझा काढीत.
पाऊसही थांबलाय आता
समंजसपणे माझ्यासाठी.
ती इथे पोचल्यावर,
मला घट्ट भेटल्यावर,
लागेलच त्याची गरज
आमचं नातं फुलण्यासाठी

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.