पुलाखालुनी बरेच पाणी
"हैक्क्या डबे-बाटली
जुना-पुराना लोहा-लोखंड्"
रणरणून अंगावर आली
जुनीच हाळी
किती नव्याने
आठवले की
खूप साचले जुनेपुराणे कपडेदेखील
माळावरच्या ट्रंकेमध्ये
-- जुनेपुराणे कपडे केवळ ?
की अजून आहे शिवाय काही? --
जे काही ते सारे सारे एका जर्मल डब्ब्यासाठी आहे बहुधा
एप्रिलातल्या भर मध्याह्नी
पांदीमधला टिटवी टिटीव टिटीव करतो
चुकला आहे रस्ता माझा
हा आहे हंगाम विणीचा
सळसळणार्या पानांमधुनी
विविधभारती ऐकत फिरतो आहे वारा
उघडे ठेवुन तोंड आपुले
घोरत आहे वड म्हातारा
भूले-बिसरे गीत कुणास्तव
एक थेंब ओघळण्यासाठी
असा थबकला युगांपासुनी
एकच क्षण पण
सुकून गेला
लयीत इतक्या संथ वाहते नदी दूरवर
जळी मिसळले रंग केशरी गडद रुपेरी तिन्हिसांजेचे
पुलाखालुनी बरेच पाणी वाहुन गेले, जाते आहे